सौदा - भाग ५

अनघाने डोळे उघडले तेव्हा क्षणभर आपण कुठे आहोत याची जाणीव तिला होईना. क्षण दोन क्षणांनी आपण आपल्याच बेडरूममध्ये असल्याचं तिला जाणवलं. समोर दिलआंटी बसून सटासट स्वेटर विणत होत्या. अनघाकडे त्यांचं लक्षही नव्हतं. हळूहळू अनघाला मागल्या प्रसंगांची आठवण होऊ लागली तशी तिचा हात आपसूक पोटाकडे गेला. पोटाचा वाढलेला घेर तिला जाणवला नाही.
“माझं बाळ...” अशक्तपणामुळे तिच्या तोंडातून आवाज फुटत नसला तरी दिलआंटींच्या डोळ्यांनी हालचाल टिपली होती.
“अरे डिकरी.. तू जागी झालीश... थांब मी सर्वांना बोलावते.” दिलआंटी पटकन उठून उभ्या राहिल्या.
“माझं बाळ..” अनघा पुन्हा पुटपुटली पण तोपर्यंत दिलआंटी खोलीच्या बाहेर पडल्या होत्या.
दिलआंटी, परांजपे मामा-मामी आणि विक्रम लगबगीने बेडरूममध्ये आले तेव्हा अनघा उठून बसायचा प्रयत्न करत होती. “हं, हं झोपून राहा. अद्याप अशक्तपणा आहे.” विक्रम पुढे होत म्हणाला.
“माझं बाळ कुठे आहे मामी?” अनघाने विक्रमचा हात झिडकारला.
“अनघा, मी काय सांगते ते ऐक. तुझं बाळ गेलं. जन्मत:च मृतावस्थेत होतं. डॉक्टरांनी कसलीही कसर ठेवली नव्हती पण तुझ्या नशिबात बाळ नव्हतं.” मामींचा आवाज कोरडा होता.
अनघाला ते ऐकून धक्का बसला तरीही धीर करून ती म्हणाली,“खोटं! बाळाची तब्येत उत्तम होती. तुम्ही मारलंत त्याला. बळी घेतलात माझ्या बाळाचा. शी:! त्या अर्भकाची दया नाही आली का तुम्हाला कोणाला? क्रूर... क्रूर आहात तुम्ही आणि विक्रम तू... किळस वाटते मला तुझी.”
“अनु, अगं हा वेडेपणा प्लीज पुरे कर. आम्ही कोणीही बाळाला काहीही केलेलं नाही. त्याचं नशीब. तेवढंच आयुष्य होतं त्याचं.” विक्रम म्हणाला पण त्याने अनघाची नजर चुकवली.
“खोटं, खोटं. तू मारलंस बाळाला. हव्यासापायी. नोकरी, प्रमोशन, पगार, तुझं करिअर हेच हवं होतं ना. त्यापायी तू मित्तलांना वाटेतून काढलंस. श्रद्धा मला मदत करत्ये म्हटल्यावर तिला दूर केलंत. बाबांची तब्येत बिघडली. सर्व प्लॅन्ड होतं. स्वार्थी! स्वार्थी आहेस तू.” अनघा रडत म्हणाली.
“अनघा, शांत हो.” मामांनी आवाज वाढवून सांगितलं. “तुझं बाळ गेलं यात कोणी काहीही केलेलं नाही. कोणाचाही दोष नाही. तुम्ही दोघे तरुण आहात. आणखी मुलं होतील तुम्हाला. हा काही जगाचा अंत नव्हे. सावर स्वत:ला. आराम कर.”
“अनु, मामा योग्य ते सांगाताहेत. अगं, आपण आणखी २ मुलं जन्माला घालू.” विक्रम अनघाला म्हणाला.
“नाही... कधीच नाही. मला तुझं तोंडही बघायचं नाही विक्रम. तू सौदा केलास. आपल्या बाळाचा. आपल्या पोटच्या गोळ्याचा.” अनघाने तोंड ओंजळीत खुपसलं आणि ती रडायला लागली.
“ठीक! अनघा, तू बरी हो. मी तुला दिल्लीचं तिकिट काढून देतो. आईबाबांना भेटून ये. तुला आणि त्यांनाही बरं वाटेल पण त्यासाठी आधी चालण्याफिरण्याची शक्ती मिळव.” विक्रम शांतपणे म्हणाला.
पुढले ४-५ दिवस अनघा झोपूनच होती. मामी कर्तव्य म्हणून जेवण करून देत होत्या पण त्या आणि दिलआंटी पहिल्यासारखं अनघाचा ताबा घेतल्यागत वागत नव्हत्या. बहुधा, त्यांच्या दृष्टीने अनघाची गरज संपली होती. आता डोकावल्याच तर जेवणाचा डबा देण्या-नेण्यापुरत्या. विक्रमही ऑफिसला जाऊ लागला होता. अनघात आणि त्याच्यातले संबंध तुटल्यासारखे झाले होते. बोलणं जवळपास खुंटलंच होतं. आठवड्याभरात अनघा घरातल्या घरात हिंडूफिरू लागली होती. थोडंफार कामही करू लागली होती. तिचं मन अद्याप सावरलं नसलं तरी अजून आठवडाभराने इथून निघून जायचा बेत तिने नक्की केला होता.
तिच्या बाळाला जाऊन १०-११ दिवस होत आले होते. विक्रम ऑफिसच्या कामानिमित्त दोन दिवस बंगलोरला गेला होता. त्या दिवशी सकाळी दूधवाल्याने बेल वाजवली तशी दुधाची पिशवी आणायला अनघा बाहेर गेली. पिशवी उचलताना एक आगळा आवाज तिच्या कानावर पडला... मजल्यावर कुणीतरी तान्हं बाळ रडत होतं.
अनघा मनातल्या मनात चरकली. ’हे भास थांबायला हवेत. हे रडणं नाही ऐकू शकत मी.’ तिने घाईघाईत आत येऊन दरवाजा लावून घेतला आणि ती पुन्हा येऊन पलंगावर पडली पण तिच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळू लागला होता. तिचे कान पुढला पूर्ण दिवस त्या रडण्याची चाहूल घेत होते. विचारांनी डोकं शिणून गेलं होतं, “माझं बाळ जिवंत आहे. या लोकांनी त्याला अद्याप जिवंत ठेवलं आहे. एखाद्या मुहूर्तावर ते त्याचा बळी... शी शी... मला बाळाला वाचवायला हवं. या सर्वांच्या तावडीतून सोडवायला हवं.” तिने एकदोनदा दरवाजा उघडून कानोसा घेतला पण तिला दिवसभरात कसलाही आवाज ऐकू आला नाही. कदाचित भास असावा...
त्या रात्री विक्रम बंगलोरहून परतला तेव्हा त्या दोघांमध्ये संभाषणही झालं नाही. दुसर्‍या दिवशी मजल्यावर वर्दळ असल्याचं तिला जाणवत होतं. बहुधा परांजप्यांकडे माणसं येत होती. काहीतरी कार्यक्रम असावा पण मग मला कसं नाही कळवलं? अनघाचं मन पुन्हा शंकाग्रस्त झालं. ’आज माझ्या बाळाचं काहीतरी...’ ती दिवसभर दरवाजापाशीच घुटमळत होती. सकाळी एकदा तिला रडण्याचा अस्पष्ट आवाज ऐकू आला पण भास की सत्य हे तिला ठरवता येत नव्हतं.
दुपारचे तीन वाजले असावे. अनघा दारापाशीच कान लावून उभी होती. शेवटी तिने मनाचा हिय्या करून परांजप्यांची बेल वाजवली. दरवाजा दिलआंटींनी उघडला. “तू इकडे काय करते अनघा?” अनघाने उत्तर न देता दिलआंटींना बाजूला सारलं आणि ती तडक आत घुसली. आत अनोळखी वीस-पंचवीस माणसं होती त्यात डॉक्टर मखिजा होते. विक्रमही होता. तो तिथे असल्याचं तिला आश्चर्य वाटलं नाही पण सर्वात आश्चर्याची गोष्ट होती ती म्हणजे तिथे ती तिला सतत दिसणारी वृद्ध बाईही हजर होती. फरक एवढाच होता की आज ती अनघसोबत इतरांनाही दिसत होती. खोलीच्या कोपर्‍यात जमिनीवर पद्मासन घालून ती बसली होती आणि तिच्या बाजूला पाळणा होता.... बाळाचा पाळणा! अनघाच्या बाळाचा पाळणा.
अनघाला पाहून खोलीत कुजबूज सुरू झाली. “अनघा, तू परत जा. तुझं इथे काही काम नाही.” परांजपेमामा अनघाचा रस्ता अडवून म्हणाले.
“बाजूला व्हा. तुम्ही माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करून इथे ठेवलं आहे. मी त्याचं रडणं ऐकलं आहे. मला माझ्या बाळाला भेटू द्या.” अनघा रागाने म्हणाली पण परांजपेमामा तसूभर हटले नाहीत.
“परांजपे, रस्ता सोडा तिचा. आई आहे ती बाळाची. ये अनघा, बघ बाळाला. जवळ घे त्याला. त्यालाही आईची गरज आहे.” ती वृद्ध बाई धीरगंभीर आवाजात म्हणाली. “ये. घाबरू नकोस. आता सर्व कसं व्यवस्थित झालं आहे.”
सर्व काही इतकं सरळ आणि सोपं असेल असं अनघाला वाटलं नव्हतं. ती थोडी पुढे सरली तशी परांजपेमामा तिच्या वाटेतून बाजूला झाले. “तुम्ही माझ्या बाळाचं काय करणार आहात? प्लीज त्याला मारू नका. त्या जिवाने अजून डोळेही उघडले नसतील. मला माझं बाळ परत द्या. आम्हाला इथून जाऊ द्या.” अनघाने रडवेल्या आवाजात विनंती केली.
“अनघा, तुला कोणी सांगितलं आम्ही बाळाला मारणार म्हणून? किती दिवस झाले, एकच धोशा लावला आहे. पुरे झालं. आज आनंदाचा सोहळा आहे. उज्जैनहून खास महायोगिनी भानुमती येथे आल्या आहेत.” मामी अनघाला म्हणाल्या.
“तिला येऊ द्या पुढे. ये अनघा,” महायोगिनींचा धीर गंभीर आवाज पुन्हा घुमला. अनघा पुढे झाली. “बस! बाळ तुझंच आहे आणि स्वस्थ आहे, सुदृढ आहे पण त्याला बघायच्या आधी तुझ्याशी काही बोलायचं आहे. बस इथे अशी.” साधारण दिसणार्‍या त्या बाईच्या आवाजात विलक्षण जादू होती. अनघा आणखी थोडी पुढे सरकली आणि खाली बसली.
“शिवस्वरूप भैरव जन्माला येणार हे सत्य गेली ४ वर्षे आम्ही जाणून आहोत. महायोगी कलकनाथांच्या निर्वाणाआधीच साक्षात भैरव जन्माला येईल हे वक्तव्य त्यांनी केलं होतं.” महायोगिनी थांबून अनघाकडे पाहत म्हणाल्या. त्या काय बोलताहेत त्याचा बोध अनघाला होत नव्हता. तिला काही समजून घ्यायचंही नव्हतं. तिला फक्त तिचं बाळ हवं होतं. मेंदू बधीर झाला होता. राहून राहून तिचं लक्ष पाळण्याकडे जात होतं.
“त्यांचा जन्म पुन्हा या पृथ्वीवर व्हावा या साठी एका पुरूष आणि एका खास स्त्रीचा समागम होणे आवश्यक होते. तो होताना तंत्रविद्येचे प्रयोगही त्यांच्यावर होणे आवश्यक होते. जिच्या पोटी हा गर्भ राहिल ती स्त्री वैशाख अमावास्येच्या दिवशी जन्मलेली हवी. तिच्या गर्भाची देखरेख आम्ही जातीने करणार होतो. बदल्यात त्या जोडप्याचा उत्कर्ष आम्ही कबूल केला होता. परांजप्यांची जुनी शेजारीणही वैशाख अमावास्येची. ती स्वखुशीने तयार झाली... आयुष्यात मोठा पल्ला गाठायचा होता तिला...पण आयत्या वेळेला तिने पड खाल्ली. तिला मूल नको झालं आणि आम्हाला ती...” सोनियाचं काय झालं असावं याचा अंदाज अनघाला आता येत होता. ती गप्प राहून ऐकून घेत होती.
“विक्रमच्या रूपाने आम्हाला हवा तसा भक्त भेटला.” महायोगिनींनी मंद हास्य करून विक्रमकडे पाहिलं तशी त्याने मान झुकवली. “तुझाही जन्मही वैशाख अमावास्येचा. सर्व गोष्टी जुळून आल्या. गर्भधारणेसोबत विक्रमला आयुष्यात हवं ते मिळत गेलं आणि आता पुढेही मिळत राहिल. पैसा, हुद्दा सर्व काही येत राहिल. फक्त या अर्भकावर हक्क आमचा. साक्षात भैरव परत आला आहे.” शेवटचं वाक्य महायोगिनी ठसवून म्हणाल्या तशा जमलेल्या लोकांनी “जय भैरवनाथ”चा घोष केला.
“मी तुझ्या गर्भारपणात सतत तुझ्यासोबत वावरत होते. तू आणि बाळ दोघे आम्हाला महत्त्वाचे. त्याची काळजी घ्यायला मी सतत तुझ्या सोबतीला होते. आम्ही तुझे कायम ऋणी राहू, अनघा. साक्षात भैरवनाथ परत आला आहे. भैरव स्मशानात राहतो. रात्री बाहेर पडतो. नरमुंड बाळगतो. नग्नावस्थेत मानवी रक्षा शरीराला फासून अंधारात मार्गक्रमण करतो. सर्व सिद्धिंचा पालक, तंत्रविद्येचा अधिकारी... जय भैरवनाथ!” महायोगिनी एका तालात, आपल्याच धुंदीत बोलत होत्या.
“तुम्ही माझ्या बाळाचं काय केलंत? मला माझ्या बाळाला बघायचं आहे.” अनघाने मनाचा हिय्या करून तोंड उघडलं.
“ते बाळ तुझं नाही. ते बाळ आता आमचं आहे. आम्हा सर्वांचं... आम्हा कपालिकांचं पण तू आई आहेस त्याची. तू त्याची क्षुधापूर्ती करू शकतेस. त्याला दूध पाजून तृप्त करू शकतेस. आमच्या मार्गावर आमच्या सोबत चालू शकतेस. विक्रमही आमच्यासोबत आहे. तूही ये. हे बाळही आहे.” महायोगिनी गंभीर परंतु आर्जवी स्वरात म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यात दुसर्‍याला भुरळ घालण्याचा गोडवा होता.
अनघा गोंधळून गेली. तिच्या खांद्यावर कुणाचातरी हात पडला तशी तिने नजर वर करून पाहिलं. विक्रम होता.
“अनु, महायोगिनी बरोबर सांगत आहेत. आपल्या आयुष्यात झालेले चांगले बदल तू पाहिले आहेस. हे बाळ त्यांचं आहे. मी कबूल केलं होतं की पहिलं मूल तुम्हाला देईन... पण तूही आमच्या सोबत ये. आम्हाला साथ दे. बाळाला आपलंसं कर.”
अनघाच्या अंगावर शहारा आला पण तिने मान खाली घालून निमूटपणे हलवली. “मला बाळाला बघायचं आहे. ते सुखरूप आहे ना, विक्रम?”
“तूच बघ अनघा. ते कसंही असलं तरी तुझं बाळ आहे आणि आम्हा सर्वांना प्रिय आहे.” विक्रम म्हणाला.
अनघा पाळण्याच्या दिशेने पुढे सरकली. 'कसं असेल बाळ? काळं, कुरुप, नाकी-डोळी बटबटीत? कसंही असलं तरी माझं बाळ आहे. माझ्या पोटचा गोळा. मी आई आहे त्याची. नऊ महिने पोटात वाढवलं आहे. मला साथ द्यायला हवी. माझ्या बाळासाठी. कोणजाणे कदाचित मी त्याला या सर्वांपासून दूर घेऊन जाण्यात यशस्वीही होईन.' पाळण्याजवळ जाणार्‍या प्रत्येक पावलासरशी अनघाचा विरोध गळून पडत होता.
ती धडधडत्या हृदयाने पाळण्यात डोकावली. कपड्यात गुंडाळलेलं तिचं बाळ पाळण्यात स्वस्थ झोपलं होतं. गोरं, डोक्यावर काळंभोर जावळ, लालचुटुक ओठ. इतर १०-१२ दिवसांच्या कोवळ्या अर्भकांसारखंच दिसत होतं. बाळाला बघून अनघाचा उर भरून आला होता, ते सर्वसाधारण बाळ आहे हे पाहून तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि ती झरकन पुढे सरकली. पाळण्यातल्या निर्धास्त झोपलेल्या जिवाला तिने थरथरता हात लावला. बाळाचा पहिला स्पर्श. त्याची उब तिच्या हातांना जाणवत होती. तिचे डोळे भरून आले. थरथरत्या हातांनीच तिने बाळाच्या सर्वांगावरून हात फिरवायला सुरुवात केली.
तिच्या हाताचा स्पर्श झाला तशी बाळाची झोप चाळवली. कपड्यातल्या त्या इवल्याशा बोचक्याने हालचाल करून आपली झोपमोड झाल्याचे दाखवले आणि हाताला झटका लागल्यागत अनघा मागे झाली. बाळाने झोपेतून डोळे उघडले होते पण... पण तिथे डोळे नव्हतेच. होते ते फक्त रिकाम्या खोबणींत चमकणारे लाल ठिपके. ते ठिपके अनघाकडे रोखून बघत होते. १२ दिवसांच्या त्या अर्भकाने जांभई दिली आणि अनघाला त्याच्या बोळक्यात बत्तीस दातांचं दर्शन झालं.
"अरे देवा! हे काय केलंत तुम्ही माझ्या बाळाचं?" अनघाला आपल्या पायांतलं त्राण जातं आहे याची जाणीव होत होती. ते घर, ती माणसं, पाळणा सर्व आपल्या भोवती गरगर फिरतं आहे असं अनघाला वाटू लागलं आणि ती धाडकन तिथेच कोसळली.
कोणीतरी तिच्या तोंडावर पाणी मारत होतं. तिने डोळे उघडले तेव्हा विक्रम आणि परांजपे मामी तिला उठवत होत्या. “इट्स ओके अनघा. डोळे उघड. सावर स्वत:ला” विक्रम तिला सांगत होता पण तिच्या कानावर शब्द आपटून मागे फिरत होते. क्षणभराने तिने स्वत:ला सावरलं आणि ती निग्रहाने उठून उभी राहिली.
“मी उचलून घेऊ बाळाला? त्याला छातीशी धरायचं आहे.” ती शांत आवाजात म्हणाली.
“जय भैरवनाथ! जय भैरवनाथ! जय भैरवनाथ!” उपस्थितांनी संतोषाने एकच जयघोष केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा