थोडं कन्फ्युजन

झंप्या: ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?

पंप्या: अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.

झंप्या: म्हणजे?

पंप्या: अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.

झंप्या: हात्तिच्या…एवढंच ना.

पंप्या: हो रे…पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.

पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी




गीत    -    कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा
संगीत    -    वसंत प्रभू
स्वर    -    लता मंगेशकर

आता उठवू सारे रान

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल सारे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण

शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण


कवी - साने गुरुजी

कोणिकडे जादुगारिणि ?

कोणिकडे जादुगरिणि; आज सांग धावा ? ध्रु०

दडपित कां तरुणमनें चरण हा पडावा ?

आज खैर मज न दिसे बघुनि तुझ्या भावा,

ही गहिरी नजर जहर,

कवणावरि करिल कहर ?

तरुण कवण लक्षिशि जो चरणिं लोळवावा ? १


कवी - भा. रा. तांबे
जाति - परिलीना
राग - भैरवी
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
दिनांक - सप्टेंबर १९२९

शुभं भूयात्

आज नृपराज ये दिव्यनिधि घरिं खरा
आर्त हांकेसरशि येशि देवी घरा ||ध्रु||०

शून्य जग तुजविणें विभव सारें सुनें
उगवतां तूं फुटे जीवनाचा झरा ! १

येइं येईं म्हणुनि सोत्कंठ बहुजनीं
बाहिलें ती महा- लक्ष्मि आली घरा ! २

आज चिंतामणी पाहिला लोचनीं
परिस लाभे अहो भाग्य येईं करा. ३

देवि मांगल्य तूं सत्य तूं सौख्य तूं
काय आतां उणें धन्य झाली धरा. ४

आज झालों कृती धन्य ही संसृती
नव फळांहीं भरो तव मळा नृपवरा ! ५

दणदणो दुंदुभी देव गाउनि नभीं
अक्षता वर्षुनी प्रीति येवो भरा. ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - रुद्र
ठिकाण - लष्कर- ग्वाल्हेर
दिनांक - १६ फेब्रुवारी १९४१

वायो, खुणव तीस

येतां तुझ्या दारिं मी वाट चालोनि
चालें पुढे, येथ थांबोनि थांबोनि. ।।ध्रु०।।

असशील तूं आंत घरकामधंद्यांत,
रेंगाळी कुणि दारिं, तुज भान कोठोनि ।।१।।

छुमछुम तुझे पाय स्रवतात नव राग,
कुणि भाग्यवंतास सुख आंत ऐकोनि ।।२।।

डोळे तुझे जेथ पडति घरामाजि
सौभाग्य अरुणास त्या ठायिं नाचोनि ।।३।।

मी मात्र या दारिं घोटाळिं आशाळ,
कीं ढुंकशिल काय येथोनि तेथोनि ।।४।।

चाले असें येथ हें रोजच्या रोज,
सांगेल तुज कोण दारीं उभे कोणि ।।५।।

मी टाकितों येथ काळीज हें फूल;
वायो ! खुणव तीस, ने वास वाहोनि ।।६।।


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - बागेसरी कानडा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ८ जानेवारी १९३६

आबाद

अजून सगळे नाटक आहे
डोळ्यांपुढून डोळ्यांवरून
अजून नाही कुणां काही
आपादमस्तक टाकीत चिरून

कुठे काही सलते, तेव्हा
खाजवाखाजव वरच्यावरून
कोण करतो झगझग साली
मर्मापर्यंत आत शिरून

जखम झाली तरी आपले
पाणी फक्त गालावरून
फार फार तर ओठापाशी
कंठापाशी जाते जिरून

कोण उगाच मरते तेव्हा
आरडाओरड होते दुरून
झिंदाबाद मुर्दाबाद
सर्व आबाद होते फिरून


कवी - वसंत बापट