वायो, खुणव तीस

येतां तुझ्या दारिं मी वाट चालोनि
चालें पुढे, येथ थांबोनि थांबोनि. ।।ध्रु०।।

असशील तूं आंत घरकामधंद्यांत,
रेंगाळी कुणि दारिं, तुज भान कोठोनि ।।१।।

छुमछुम तुझे पाय स्रवतात नव राग,
कुणि भाग्यवंतास सुख आंत ऐकोनि ।।२।।

डोळे तुझे जेथ पडति घरामाजि
सौभाग्य अरुणास त्या ठायिं नाचोनि ।।३।।

मी मात्र या दारिं घोटाळिं आशाळ,
कीं ढुंकशिल काय येथोनि तेथोनि ।।४।।

चाले असें येथ हें रोजच्या रोज,
सांगेल तुज कोण दारीं उभे कोणि ।।५।।

मी टाकितों येथ काळीज हें फूल;
वायो ! खुणव तीस, ने वास वाहोनि ।।६।।


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - बागेसरी कानडा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ८ जानेवारी १९३६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा