शुभं भूयात्

आज नृपराज ये दिव्यनिधि घरिं खरा
आर्त हांकेसरशि येशि देवी घरा ||ध्रु||०

शून्य जग तुजविणें विभव सारें सुनें
उगवतां तूं फुटे जीवनाचा झरा ! १

येइं येईं म्हणुनि सोत्कंठ बहुजनीं
बाहिलें ती महा- लक्ष्मि आली घरा ! २

आज चिंतामणी पाहिला लोचनीं
परिस लाभे अहो भाग्य येईं करा. ३

देवि मांगल्य तूं सत्य तूं सौख्य तूं
काय आतां उणें धन्य झाली धरा. ४

आज झालों कृती धन्य ही संसृती
नव फळांहीं भरो तव मळा नृपवरा ! ५

दणदणो दुंदुभी देव गाउनि नभीं
अक्षता वर्षुनी प्रीति येवो भरा. ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - रुद्र
ठिकाण - लष्कर- ग्वाल्हेर
दिनांक - १६ फेब्रुवारी १९४१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा