आप्पा महाराज

नाम जपता जपता

'जे जे रामकृस्न हरी'

आप्पा महाराज गेले

गेले आज देवाघरी

जसा पुत्रू 'रामदास'

आन सून 'सीतामाई'

तसा लोकावरी जीव

मनीं दुजाभाव नहीं

उभ्या गांवाचे कैवारी

खरे रामाचे पुजारी

आप्पा महाराज गेले

सोडीसनी देवाघरी

आंसू लोकाचे गयाले

जशा पावसाच्या सरी

आप्पा महाराज गेले

गेले आज देवाघरीं

आप्पाजींची दयामाया

किती पार नहीं त्याले

तुम्ही इचारा इचारा

'बावजीच्या समाधीले

तुकाराम, मुक्ता जना'

मरीसनी रे जगले

आतां कसं म्हनू तरी

आप्पा महाराज मेले?

किती भजन किर्तन

रामनामाची लहेर

केलं रामाचं मंदीर

संत लोकाचं माहेर

राम लक्षूमन सीता

बसवले रे मंदीरीं

त्याले सोन्याचा कयस

जागा संगमरवरी

दरसाल दहा दिसा

येतो उच्छावाले भर

वाहनावर्‍हे बशीसनी

येती दहा अवतार

दाही सरता वहनं

आली एकादशी मोठी

मंग सवारला रथ

झाली गांवामंधी दाटी

चार फोडले नारय

अरे, चार्‍ही चाकावरी

सर्व्या मयांतले फुलं

चढवले रथावरी

रस्त्यावर शीपडल्या

लाखो पान्याच्या घागरी

रथ चाले घडाघडा

लागे चाकाले मोगरी

सर्व्या बजाराचे केये

माझ्या रथाची वानगी

घरोघरीं ऐपतींत

मिये पैशाची कानगी

लोक आले दर्सनाले

लोक झुंड्यावर झुंड्या

रथापुढती चालल्या

किती भजनाच्या दिंड्या

ज्यांनीं केली कार्तीकीले

'जयगांवाची' पंढरी

आप्पा महाराज गेले

गेले म्हनूं कस तरी?


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

अनंत काणेकर


चांदरात


सांत्वन

शरीर हे गेले रोगांनी गांजून

काळीज जळून काळजीने

जीव करमाया निसर्गी जाईन

गुण मी गाईन प्रभुजीचे

घरी आईबाप, लहान भावंडे

वात्सल्याचे धडे देतात की

जिवलग माझा मित्र भेट देतो

जीव माझा होतो उल्हसित

काही नाही माझ्या सांत्वनाला उणे

म्हणून हे जिणे कंठितो मी


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

समयीच्या शुभ्र कळ्या

समयीच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायाशी पडते

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे
मागेमागे राहीलेले माझे माहेर बापुडे

साचणार्‍या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची

थोडी फुले माळून ये, डोळा पाणी लावून ये
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये

हासशील हास मला, मला हासू ही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का जुना


कवी - आरती प्रभू

गंध

हिरव्याशा गवतात
हळदिवी फुलें,
हलकेंच केसरात
दूध भरूं आले.

उभ्या उभ्या शेतांमधें
सर कोसळली,
केवड्याची सोनफडा
गंधें ओथंबली.

बकुळीच्या आसपास
गंधवती माती,
उस्कटून रानपक्षी
काही शोधिताती.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - जोगवा

जोगवा

गंध