समयीच्या शुभ्र कळ्या

समयीच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायाशी पडते

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे
मागेमागे राहीलेले माझे माहेर बापुडे

साचणार्‍या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची

थोडी फुले माळून ये, डोळा पाणी लावून ये
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये

हासशील हास मला, मला हासू ही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का जुना


कवी - आरती प्रभू

1 टिप्पणी: