लोककवी मनमोहन नातू




उत्कट भावगीतकार आणि बंडखोर कवी म्हणून जनसामान्यांच्या मनावर मोहिनी घालणारे लोककवी म्हणजे मनमोहन नातू . मनमोहनांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण लोककवी मनमोहन या नावानेच ते महाराष्ट्रला माहीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव या गावी दि. ११ नोव्हेंबर १९११ साली त्यांचा जन्म झाला.

शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा हा कवी. सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ऐकायला ताजीतवानी वाटतात. मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला हे त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं आजही नववधूला लाजवते. राधे तुझा सैल आंबाडा, बापूजींची प्राणज्योती... ह्या त्यांच्या गाजलेल्या रचना.

अतिशय साधं रहाणीमान असलेला हा कवी आपल्या कवितेत मनातील प्रतिबिब उभं करतो. ते लिहितात, राजकीय पुरुषांची कीर्ती, मुळीच मजला मत्सर नाही । आज हुमायुन बाबरापेक्षा, गलिब हृदये वेधित राही । युगायुगांचे सहप्रवासी, अफुच्या गोळ्या, उद्धार, शिवशिल्पांजली हे त्यांच्या नावावर असलेले काव्यसंग्रह.

सर्व विषयांना आपल्या कवितेत स्पर्श करणारा हा लोककवी पत्नीच्या निधनानंतर आपल्या भावना शब्दबद्ध करताना दिसतो. वृंदावनातील तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा, तर स्वतःबद्दलच्या भावना हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त करताना ते दिसतात. शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतची होता। फुले त्यावरी उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतची होता। अशा या लोककवीचे दि. ७ मे १९९१ ला निधन झाले.

शिरीष पै

कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करणार्या लेखिका शिरीष पै. गेल्या दहा हजार वर्षांत असं व्यक्तिमत्त्वं झालं नाही अशा व्यक्तिमत्त्वाच्या आचार्य अत्रे यांची शिरीष पै ही कन्या. दि. १५ नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला.

त्यांच्या घरातच साहित्य विविध अंगानी मुक्तपणे संचार करीत होतं. हे बाळकडू त्यांना बालपणापासून मिळत होतं. साहित्य विचाराचे संस्कार त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणामुळे सतत होत असले तरी शिरीष पै यांची स्वतःची अशी एक शैली आहे. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसन्न शैलीतील ललित लेखिकेने वाचकांना आनंद दिला.

तसेच त्यांनी लिहिलेल्या कवितांनी काव्यप्रकाराला न्याय दिला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत जपानी हायकूं हा प्रकार रूजविण्याचा मान शिरीष पै यांच्याकडे जातो.

लालन बैरागीण, हे ही दिवस जातील ह्या कादंबर्या त्यांन लिहिल्या. छोट्या मुलांसाठी आईची गाणी, बागेतल्या जमती या बाल साहित्याची निर्मिती केली तर चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती ही त्यांनी लिहिलेली नाटकं. ललित साहित्याची त्यांची पुस्तके गाजली. आजचा दिवस, आतला आवाज, प्रियजन, अनुभवांती, सय मी माझे मला.

आपल्या अफाट कर्तृत्वाच्या वडिलांचे चित्रण पप्पा आणि वडिलांचे सेवेशी... या दोन पुस्तकातून त्यांनी रंगवले आहे.

जीवनगाथा

१. दुनिया अफाट आहे
२. कुरणावरती
३. वाटते अलिकडे
४. मी जागी
५. भर दुपारच्या
६. निरोप घेऊन
७. काळोख जाहला

कुटुंब झाले माझे देव

अवघे कुटुंब झाले माझे देव !

माझे मातृदेव, पितृदेव

भार्या माझी देव, स्वर्गसुखठेव

चिमुकले देव बाळे माझी


स्वसा माझ्या देव, बंधु माझे देव

गुरु माझे देव, शिष्य देव

सोयरेधायरे सर्व माझे देव

मित्र माझे देव, शत्रु देव

देवांच्या मेळ्यात मीही एक देव

करी देवघेव आनंदाची !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

वाटसरू

वाटसरू आहे वाट मी शोधित

वाटाड्या, सोबत करी मला

'अंधार मनोरा' ज्याला म्हणतात

तिकडे ही वाट जात का रे ?

कितीक प्रवासी मार्गाने या गेले

पुन्हा नाही आले परतून

पदोपदी येते आडवे संकट

सर्वत्र कंटक पसरले

शेवट व्हायचा काय तो मी जाणे

तरी आहे जाणे मला प्राप्त !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

शुद्ध निरामय

शुद्ध निरामय, निर्व्याज आनंदा,

कोठे तू सुह्रदा गेलास रे?

जीवनामार्गात पसरे अंधार

तुटता आधार तुझ्या सख्या,

तुझिया सांगाती गेला तो उल्हास

उदास उदास भासे मला !

भविष्यकाळीच्या अंधुक साउल्या

मजल्या वाकुल्या दावितात

ये रे जिवलगा, धरी माझा हात

हासत सोबत करी मला


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

सहज

सहज मी मागे वळून पाहिले

चरकून गेले मन माझे !

विसरून गेले चेहरे कितीक

कितीक अंधुक ओळखीचे

होते मजकडे आशेने पाहात

मजला बाहत मूकपणे

सांगायाचे होते राहिले ह्रद्गत

नव्हते ते येत बोलायाला

वाईट वाईट वाटले मनाला

आणि ढळढळा रडलो मी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या