मनोहारिणी

पदन्यास लावण्यप्रान्ती ही करिते रमणी;

तारामंडित निरभ्रांबरी जशी रम्य रजनी !

शुभ्र कृष्ण वर्णातिल सारी मोहकता आली

नेत्री, गात्री, एके पात्री, ह्रदयंगम मेळी.

सम्मीलित ती कान्ति दिसे अति शान्त सरस नयना,

शशिकरंजित रजनीसम, जी प्रखर दिना ये ना.

उषा किरण, की अधिक झाक, जर या रूपी पडती

अनिर्वाच्य ती संगमशोभा अर्धी तरि जाती !

कृष्णकेशपाशावरी येती श्याम श्याम लहरी,

शुभ्र तेज मुखसरसिरुहावरि सुरुचिर लास्य करी.

मृदुमंगल मधुभाव आननी जे मुद्रित होती-

किती शुद्ध, किती रुचिर, उगम निज ते प्रस्फुट करिती

मृदुल कपोली हास्य मनोहर जे क्रीडा करिते,

भास्वत्‌ भाली शान्त तेज जे संतत लखलखते.

मूकचि त्यांच्या वक्‍तृत्वाने हिजविषयी पटते

साक्ष मनोमय पवित्र चारित्र्याची ह्रदयाते.

निर्वैर भूतमात्राच्या ठायी हिची चित्तवृत्ति

निर्व्याज प्रेमलभावाची ही रमणी मूर्ति.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

आम्ही

अस्ताव्यस्त इतस्तता पसरली हाडे, युगे लोअली,

होते कोण कसे न आठवण ही कोणा जरा राहिली;

गोळा होउनि ती पुनश्च उठती, शून्ये बसू लागती,

होते कोण, किती असे जगऋणी, प्रत्यक्ष ते सांगती.

हे फुंकीसरसे घडोनि आमुच्या एकाच ये अद्‌भुत,

सामर्थ्ये पुरवीत आजवरती आलो जगा शाश्वत;

अंगा फासुनि राख खंक बनलो आम्ही फिरस्ते जरी,

आज्ञा केवळ एकटीच अमुची राणीव विश्वी करी.

श्रीरामात पहा प्रताप अमुचा, ऐश्वर्य कृष्णी पहा,

रुद्री उग्र कठोरता, सदयता बुद्धात साक्षात पहा;

ते आम्हीच महंमदास दिधली खैरात पैगंबरी,

ते कारुण्यहि आमुचेच उठवी जे ख्रिस्त मेल्यावरी.

भावी सत्कवि, ते चिकित्सक पटु, प्रख्यात अध्यापक

मंत्री नाविक वीर दार्शनिक ते व्युत्पन्न वैज्ञानिक;

आहे ह्या घडवीत आज अमुची चिच्छक्ति या भारती

मत्तां मर्दुनि द्यावया अभयता संत्रस्त भूताप्रति.

हिंदूस्तान पहावयास अमुच्या नेत्रे शिका, या कसे,

रोखायास तुम्हांस शक्ति मग या जंजाल काला नसे !

होते सृष्टि नवी, कलेवर जुने टाका, तुम्ही व्हा तसे,

हे ना होय तरी मरा ! न तुमची कोणास पर्वा असे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

गिरीगान

उदयगिरीवरच्या पृष्ठी उदयोन्मुख सारी सृष्टि.

नित्यविकासपरायणता ही काळावर दे सत्ता.

ब्रह्मांडा घालुनि फेरी वायूंचा येती लहरी.

लपेटती त्या रणत्करा कणखर शैलाच्या शिखरा.

तेजाच्या लहरी येती उन्नतवक्षी आदळती,

परावृत्त तेथुनि होती भोताली प्रान्तोप्रान्ती.

अस्फुट वर्णाच्या पंक्ति अव्यक्तातुनि कोसळती,

उघडपणे रूपा येती हिमस्नात कलिकांवरती.

नेत्रास न अग्रे दिसती आढ्य द्रुम जेथे असती,

गवताचे छोटे पाते उत्साहे तेथे डुलते.

प्रचंड खगपंक्ती जेथे आकाशा फोडित जाते.

पतंग तेथे निःशंक फडकावी चिमणे पंख.

तुंगनगोत्संगी ललिता गंधलता दिसती झुलता,

कुसुमित कोरांटिहि पसरी निजरंगच्छबि-तनुलहरी.

एकेका हिमबिंदूची पाकसुरत लावण्याची

अत्यद्‌भुत अंतःसृष्टि गिरिशीखरी येते दृष्टी.

गत झाले ज्यांचे प्राण त्यास मिळे पुनरुत्थान

या शाश्वत प्राणागारी ऐश्वर्याच्या माहेरी.

विद्युन्मय स्वातंत्र्याचे श्वास वाहती अद्रीचे.

विशालता ही विकसविते व्यक्तिदृष्टिसंकोचाते.

परम सूक्ष्म अंतःकरणी निजकिरणी साक्षी कोणी.

रेखी दिव्ये; काही ती साम्राज्ये होउनी येती.

तडिलुताहास्यप्रभव उग्रवीर्य मारुतदेव

अजस्रबल वीरप्रवर दानवहंता वज्रधर

वरुण, सोम, पावक तरुण, अरुणादिक निजजनकरुण

सुरगण ते अनुदिन रमती गिरिशिखरश्रेणीवरती.

पुरा आर्यशस्त्रा यांनी विजय दिले संपादोनी,

ज्ञान देउनी अपरिमित त्रस्त जगा केले मुक्त !

उषःकाल तो आर्यांचा जनिता परमाश्चर्यांचा.

महोदार नवघटनेचा मानववंशविकासाचा.

भाग्याची ही उषा पुनः जरी प्राप्त व्हावी अपणा,

चला जाउ या गिरिगहनी महा सिद्धिमुलस्थानि !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

तू देशी न तुझे

तू देशी न तुझे, कशास मग मी द्यावे तुला आपले

दे माझे परतोनि चित्त मज जे ठायी तुझ्या गुंतले.

छे ! ते ठेव तसेच. नाहक नको तो शीण का की, हटे

माझे चोरुनि चित्त नेतिल पुन्हा डोळे तुझे चोरटे.

एका संकुचितान्तरी उगिच का चित्तद्वया दाटणी

दोघांना मिळणी जरी न घडते एकान्त एकासनी ?

कोठे ते सदयत्व सांग, ह्रदये फोडोनिया, आपणा

ठेवाया सजलीस दूर जरि तू स्नेहानुबंधाविना ?

वाटे प्रीति मला महा बिकट ही कूट स्वरूपे असे.

ती निर्धार मनास एकहि धरू देना. करावे कसे ?

भासे, आकळिले रहस्य सगळे प्रेयप्रमेयातले

तो तो चंचल होउनी मन पुनः शंकेमुळे गोंधळे.

चिन्ते, यास्तव जा त्यजून मज, तू खेदाहि जा, या क्षणी.

नाना व्यर्थ करूनि तर्क तुमच्या संगे झुरावे कुणी ?

माझे लंपट चित्त- तेवि सखिचे माझ्या ठिकाणी-असे

ऐसे भावुनि वाट पाहिन तिची निःशंक मी मानसे.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

विचारतरंग

नीलप्रभ निर्मल गगनी विशुद्ध वाहे सुरतटिनी

पारावारि समवटुनी रमती विबुधरमणरमणी.

चंद्र सुधामय पुष्करिणी गगनाला शोभा आणी

दीप्तींची लेवुनि दुकुले तारांगण तेथे जमले.

क्षुब्धार्णव जल मग्नाला दाखविती हे मार्गाला

भोगाचा कर्तव्याचा मेळ मनोहर हा साचा !

वाटे, तारा होवोनी विचारावे अवघ्या भुवनी

धरणीच्या ह्रदयावरती ठेउनि कर हसवावी ती !

विहंगमोत्तम की व्हावे आकाशी वरवर जावे !

नूतन नूतन प्राम्ताते आक्रमुनी जावे वरते.

उदयगिरीच्या पलीकडे बालरवीचा किरण पडे

प्रथम करुनि त्याला प्रणती शुभवार्ता कळवू जगती-

"घोर निशा संपुन गेली ! मंगल वेळ जवळ आली !

खंत सोडुनी कामाला लागा, रवि उदया आला

हताश जे झाले स्वजन चैतन्याचे संचरण

करणे त्यांच्या देहात भाग्य हे थोड्यांना प्राप्त !

सोप्या सोप्या शब्दांनी, स्फुर्तिसूत्राने गुंफोनी,

मंजुळ मंजुळशी गाणी रचुनी रसिकान्तःकरणी

हळू शिरावे चोरोनी जावे मीपण लोपोनी,

हौस मनी ही असे परी टीका तीते विफल करी !

अंतःकरणपटावर ती आत्यंतिक वेगे उठती

दिव्य लेख उन्मेषाचे धरावया ते स्मृति काचे.

बुद्धीच्या भिंगावरती बिंबित ज्या प्रतिमा होती

शब्दचित्र त्यांचे कसले नकळे काढिल मन दुबळे

सरस्वती कंठा भरण वाचुनि हे वरचे कवन

गद्गद वदला हासोन धन्य कवी ! कविता धन्य

शब्दचमत्कृति यात नसे, गांभीर्याचा लेश नसे,

सत्याचाही गंध नसे हनुमंताचे पुच्छ जसे !"

वानर होता नर झाला ग्रहण लागले ग्रहगोला

धूमकेतु गगनि आला विषय असे घ्या कवनाला.

सिद्धान्त घेउनि शास्त्रांचे करा कथन त्या सत्यांचे

पुरे पुरे कल्पना पुरे काळ मागला आज सरे.

थांबा थांबा रसिकवरा ! गदारोळ हा पुरे करा !

प्राण कल्पना काव्याला न कळे हे मतिमंदाला

एक न धड भाराभर ती चिंध्यांची खोगिरभरती

तुटपुंज्या ज्ञाने फुगती रसज्ञ अपणाला म्हणती.

पंडितपन ते रसिकपण बहुधा असती ही भिन्न

दोहोंचा अन्वय एकी सांप्रत दुर्मिळ ह्या लोकी !

महाराष्ट्र कवि परंपरा खंड न पडला तिला जरा

उणीव रसिकांचीच परी आज भासते खरोखरी.

भौतिक शास्त्री या काव्यी कल्पनाच वैभव मिरवी

अभेद मज दोहोत दिसे कोण शहाणे, कोण पिसे ?

जे जे विश्वी ज्ञेय असे त्यात कल्पना मात्र वसे

करा कल्पना वजा बरे म्हणजे बाकी शून्य उरे

संगम ह्रदयंगम साचा मृणाल अलि या युगुलाचा

अथवा सज्जन रसिकाचा सहजमनोहर कवितेचा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

अनुकार

दोष कुणाला ? एकदा निखालस बोल.

भूभृत्कटकावृतवनखंडी,

कटु वाग्‌जल्पनतांडव मांडी,

प्रतिध्वनिप्रति परिसुनि सांडी,

निज भानाला. एकदा निखालस बोला.

अंतर्वीणातंतुततींना

कठोर हस्ते करी ताडना,

कर्कश रव कर्णी पडताना

येत रळीला. एकदा निखालस बोला

निःस्वार्थी सारस्वत तीर्था

पंक त्यावरी फेकी जाता,

कोणी या स्वैरास वारिता

निंदी त्याला. एकदा निखालस बोला.

प्रकृति-सद्‌भिरुचीचे युग्म

आहे प्राक्तन संस्कारासम.

विसरुनि तद्वैचित्र्य मनोरम

कोपा आला. एकदा निखालस बोला.

व्यासोच्छिष्ट जरी जग सारे

का झाले होतात पसारे ?

उष्ट्या जगती जन्म हरे ! रे !

का सर्वाला ! एकदा निखालस बोला.

विश्वविभूषण पुष्प हवे ना ?

दुखवुनि लघुगुरु तरुलतिकांआ

न मिळे ! आता पुरे विघटना.

जीव तान्हेला ! एकदा निखालस बोला.

अमोघ बळ शब्दांचे पाही,

आत साठवी अनन्तासही

शब्दे शब्द कसा मग जाई

हा हारीला ? एकदा निखालस बोला.

अंधार नगरचा उलटा न्याय,

अदंड्य दंडा भाजन होय;

पय घटिका परी, घड्याळ, हाय !

खाई टोला. एकदा निखालस बोला.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

नागेश

स्वैरालापमनोज्ञभावनिवहा तारस्वरे क्षेपुनी,

टाकी त्या मधुरे निनादनिकरे दिक्प्रांत संव्यापुनी,

तो प्रेमाकुल कोकिल स्वरमणीसाठीच ह्या रंजना

आरंभी यदि, काय ते न करिते सानंद अन्या जना ?

का होतोस विषण्ण काव्यविटपाग्रारूढ हे कोकिला ?

लागावा तुज वामने वद कसा पाषाण जो फेकिला ?

पादाघात- सरागवीक्षण - सुहास्यालिंगन -प्रोक्षणी

आहे वाग्वधुने सुमान्वित तुझा उद्यान केला क्षणी.

माते रानवटास ये न विविधालंकारनामावलि

गुंजा-कांचन-काचर‍त्‍न-निचये हो वा न हो वाकली

व्यापारी जन आदरोत असली लेणी; मदीयांतरी

आहे ती रुचिरा निसर्गमधुरा नागेशवागीश्वरी !

आहे भुषणहीन वाग्वधु तुझी ना व्यंजना का मुळी ?

हे आश्चर्य ! वधू विरक्त न कधी म्या ऐकिली पाहिली !

मुग्धा शास्त्र विदग्धधींस न पुसे, ते पूज्य हे तो खरे

व्हावी ही गुरुमंडळी पण- ? पुढे बोलू कशाला पुरे !

टीकाकारमतानुसार रचना जाता करू सत्वर

रम्योद्यान उजाड रान अवघे होईल, शंका नको !

व्हावा नष्ट ’विशेष’ इष्ट न मुळी वैचित्र्य याच्यामुळे

त्यांना काय रुचे मला न बहुधा त्यांचे न त्यांना कळे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ