मुंबईत मजा गमतीची ।

.... अहो तें सगळें खरें !
पण माझ्या मागची ही व्याद टळेल, तेव्हं तुमची मुंबई, आणखी तिची मजा ना ?
तुमची शपथ, मला अगदीं त्रास आला आहे !
वर्ष होत आलें, पण माझी बायको बाळंतरोगानें आपली अधिकाधिक कुजतेच आहे !
अहो, मी म्हणतों, एकदां बरें तरी व्हावें, किंवा कायमचें मरुन तरी जावें !
प्लेगचीं माणसें नाहीं, कशी चोवीस अगर छत्तीस तासांत निकाल !
- रागावूं नको तर काय करुं ? सगळें जग लोटलें आहे मौज पाह्यला !
फार लांब कशाला ? माझ्या शेजारचाच तो गणू शिंपी.
घरांत बायको एक दिवसाची बाळंतीण, गावांत तर प्लेगचा कहर, असें असून घरांतली दोन मोठीं भांडी घेतली, तीं माझ्याकडे आणून ठेवलीं, पंधरा रुपये घेतले, आणि लागलीच पठ्ठ्या मुंबईस चालता झाला !
- कां ? आहे कीं नाहीं ?
नाहींतर आम्ही, बसलों आहोंत कीं नाहीं असे रडत !
- नाहीं ? नाहीं, आपणच सांगा की, अशी मौज, अशी लाइट, कधीं या जन्मांत तरी फिरुन आपल्याला पाह्यला सांपडेल का ?
- अहो बाबूराव, मी चांगले ठरविलें होतें कीं, बेळगांवास जावें, चंद्राजीला घ्यावी, आणि तसेच मुंबईस परस्पर चालते व्हावें !
पण म्हण आहे ना, कीं माणूस योजितो एक, आणि देव घडवून आणतो दुसरेंच !
चांगला बेळगांवास जायला निघालों, तोंच आमच्या बाईसाहेबांची प्रकृति एकाएकी बिघडली, आणि काय ?
घटकेंत जीव जातो, घटकेंत येतो, असें आतांशा चार दिवस सारखें चाललें आहें !
शपथ !
मी तर अगदी रडकुंडीस आलों आहें बुवा !...

म्याऊं - म्याऊं - म्याऊं !

.... देवा !
माझीं पिलें भुकेनें कशीं व्याकूळ रे झालीं आहेत !
तीन वाजून गेले, पण अजून यांच्या पोटांत, घासभर कीं रे अन्न केलें नाहीं !
बाळांनो !
उगी, नका रडूं !
मी पुनः खालीं जातें - अगदी हलूं नका. या गलथ्यांतच अमळ एकमेकांशी खेळत बसा !
- स्वयंपाकघरांत जातें, आणि कांहीं उष्टें अन्न पडलें असेल, तें माझ्या बाळांकरितां घेऊन लवकर येतें !
जाऊं ?
- आज घरांत येवढें काय आहे ?
काय सांगूं तुम्हांला !
मुलांनो, आज किं नाहीं माझा वाढदिवस
- माझ्या पूर्वजन्मीच्या मनुष्यदेहाचें वर्षश्राद्ध आहे !
खरें म्हटलें, तर हें माझेंच घर
- हीं माझींच मुलें,
- पण या घरांतल्या मुलांना काय ठाऊक कीं, मी त्यांचीच आई आहें म्हणून !
त्यांना वाटतें
- त्यांनाच काय ?
- सर्व जगाला वाटतें की, आपले सगळे पूर्वज स्वर्गाला जातात म्हणून !
पण किती तरी ठिकाणी, मनुष्यदेहाचें जीर्ण वस्त्र फेंकून देऊन पशुपक्ष्यांचें कातडें अंगावर घेऊन आम्ही !
- आम्ही आपल्या मुलांलेंकरांभोंवती प्रेमानें वावरतों, त्यांची सेवा करतों
- आणि उलट त्यांच्या लाथाबुक्क्यांचे - चाबकांचे - तडाखे सोशीत धाय मोकलून रडत कीं रे असतों !
पण बाळांनो, जगाला निव्वळ देह - कातडें - माती !
- प्रिय आहे !
आत्म्यावर जगाचें खरें प्रेमच नाहीं !
जोंपर्यत मी मनुष्यदेहानें नटलें होते, तोंपर्यंत ही घरांतली माझींच मुलेंलेंकरे कशीं मजवर प्रेम करीत होतीं !
पण मी मांजर होऊन घरांत फिरुं लागल्यापासून, मला कोणी जवळसुद्धां उभें राहू देत नाहीं !
देवा !
आज माझाच वाढदिवस, आणि मलाच का रे अन्न - पानांतलें घासभर उष्टें अन्नसुद्धां मिळूं नये !
पण या घरांतल्या मुलांना तरी काय ठाऊक कीं, मी त्याचीच आई आहें ?
तसें असतें तर मघाशीं मी नुसती स्वयंपाकघरांत डोकावलें मात्र, तोंच ' रांडे ! नीघ ! ' असें म्हणून माझ्या वेणूनें - प्रत्यक्ष माझ्या लेंकीनें !
- ताडकन् माझ्या डोक्यांत लाटणें फेंकून कशाला बरें मारलें असतें !
- बाळांनो ! नका रडूं !
मी आतां खाली जाऊन येतें !.....

जातिभेद नाही कोठें ?

.... ही अशी लटपट नको आहे !
म्हणे पुष्कळांचें मत आहे कीं, ईश्वरानें जातिभेद निर्माण केला नाहीं म्हणून !
असेल !
एका पुष्कळांचें जसें हें मत आहे, तसेंच जगांतल्या दुसर्‍या पुष्कळांचेंही मत आहे कीं, ईश्वरानेंच जातिभेद निर्माण केला आहे !
- मी असें विचारतों कीं, आपल्या मानवसृष्टीखेरीज इतर जीवसृष्टींत परमेश्वरानें जातिभेद निर्माण केला आहे कीं नाहीं ?
- फार कशाला ?
या वनांतलीच मौज पहा कीं, अहो, कांहीं झाडांना नुसतीं सुवासिक फुलेंच आहेत, तर कांहीं दिखाऊ - पण अत्यंत सुंदर - अशाच फुलांनीं नटलेलीं आहेत !
पहा, तो आम्रवृक्ष पहा !
त्याला सुवासिक मोहरकी आहे व गोड फळेंही येतील !
बिचार्‍या सुरुच्या झाडांना तर फुलेंही नाहींत आणखी फळेंही नाहींत !
पण त्यांची, वायूच्या लहरीमध्यें डुलत डुलत स्वर्गाला जाऊन भिडण्याची धडपड अव्याहत चालू असते कीं नाही ?
तसेंच पक्ष्यांचे ! कोणी गाणारे आहेत, कोणी सुंदर आहेत, तर कांही
- पहा ती घार !
ओहोहो !
आकाशांत उंच भरार्‍या मारीत चालली आहे !
- हो, मग, मी तरी तेंच म्हणतों कीं, पशूंमध्येंही हाच प्रकार आहे !
अहो इतकेच नाहीं, पण गुलाबाच्या झाडामध्येंसुद्धां किती तरी जाती आहेत !
मला सांगा, सगळ्या जगांत पोपट तरी एकाच जातीचे आहेत का ?
मुळींच नाहीं. अहो, प्रत्यक्ष माणसाला कोठें नको आहे जातिभेद ?
हो, आपल्यालाच मी असें विचारतों कीं, तुम्ही आपल्या बागेंत नुसती गुलाबाचींच झाडें कां नाही लावीत ?
पाहिजे कशाला जाई - जुई - मालती - मोगरा !
- तें कांही नाहीं !
माणसाचा स्वभावच हा कीं, आपल्या वर्तनांतील दोषांचा डेरा कोणाच्या तरी माथी तो आदळीत असतो !
- वा ! काय कोकिळा मधुर गात आहे !
का हो त्रिंबकराव, आपल्याभोंवती मधून मधून जें एवढें गवत पसरलें आहे, त्यामध्यें रडून रडून वाळलेली एक तरी गवताची पात तुम्हांला दिसत आहे का ?
तीं नारळाचीं झाडें आमच्यापेक्षां कां उंच आहेत, आणि आम्हांला तूं इतकें उंच कां करीत नाहींस ?
- अशी यांची ईश्वराजवळ चालू असलेली ओरड तुम्हांला कोठें ऐकूं येत आहे का ?
कोकिळा गात आहे म्हणून इतर पक्षी गायचे थोडेच थांबले आहेत !
आपल्या बंधूजवळ जितका मोहोर आहे तितका आपल्याजवळ नाहीं, म्हणून हा आम्रवृक्ष मत्सरानें सुकून गेला आहे का ?
सांगा, अगदी लहानशा गवाताच्या पातीला जितका आपल्यांतील ईश्वरी तेजाविषयीं अभिमान वाटतो, तितकाच, उंच हात पसरुन आपल्या लहान भावंडांना वारा घालणार्‍या त्या नारळाच्या झाडालाही वाटतो !
जगाचें सौंदर्य वाढविण्याची परमेश्वरानें आपल्यावर सोंपविलेली कामगिरी, जितक्या उत्साहानें व कळकळीनें तें गुलाबाचें फूल बजावीत आहे, तितक्याच उत्साहानें व कळकळीनें हें झेंडूचें फूलही नाहीं का बजावीत?
- हें पहा !
या आनंदानें स्मित करणार्‍या व शांत वनांत दुःखाचा एक तरी सुस्कारा ऐकूं येत आहे का ?
- नाहीं तर आपल्या शहराकडे नजर फेंका !
जिकडे तिकडे मीपणाची आग भडकून त्यांत तडफडून - भाजून - निघणार्‍या तूंपणाच्या हदयांतून अव्याहत बाहेर पडणार्‍या धुराचें
- त्रिंबकराव !
- कसें हें आच्छादन पसरलें आहे !
- काय म्हटलेंत ?
हा सगळा धूर जातिभेदानें घुमसणार्‍या तंट्यांतून बाहेर पडत आहे ?
- नाहीं ! तसें नाहीं ! अहो !
ईश्वराला जाणूनबुजून पायांखाली तुडवून सर्व जगाचा मी एकटा मालक असावा, या इच्छेनें अनावर होऊन, एकमेकांवर टाळकीं फोडून घेणार्‍यांच्या मेंदूतून या वाफा निघत आहेत
- वाफा !
' मी ! मी ! ' अशी रणगर्जना जिकडे तिकडे ऐकूं येत आहे !....

कोकिलाबाई गोडबोले

.... मेले हात धुऊन पाठीस लागले आहेत जसे !
काडीइतकें सुद्धां कार्ट्यापासून सुख नाहीं !
- कस्सें, करुं तरी कसें आतां !
जेवा मुकाट्यानें !
नाहीं तर चांगली फुंकणी घालीन पाठीत एकेकाच्या !
- काय, काय म्हटलेंस गण्या ?
- मेल्या !
मी मोठमोठ्यांनें ओरडते का ?
- ऊं !
- चूप ! ओक्साबोक्शी रडतो आहे मेला !
जीव गेला ?
का घालूं आणखी पाठींत ?
- काग वेणे ?
गप कां बसलीस ?
- भाकरीवर तूप हवें ?
- मेलें माझें तोंड नाही धड आतां !
बापानें ठेवलें आहे तूप तुझ्या टवळे !
तूप पाहिजे नाहीं ?
हें घे !
- गप्प !
नाहीं तर आणखी रपके घालीन चांगले !
- मिटलें का नाही तोंड ?
का अस्सा आणखी !
- हात तुला घातले चुलींत नेऊन अवदसे !
- कोण आहे ?
कोण हांका मारते आहे बाहेर ?
- आहेत हो, आहेत !
आलें, आलें !
- या पोरट्यांच्या गागण्यानें अमळ ऐकूं येईल तर ना ?
लग्न होऊन घरांत आल्यापासून सारखी पाहत आहें, रात्रंदिवस मेला जंजाळ पाठीमागे !
- सांडलेंस पाणी ?
- बाई ! बाई !
भंडावून सोडलें आहे या पोरट्यांनी - !
पहा, आहे ? नीट मुकाट्यानें जेवायचें, त्या मिटक्या रे कशाला वाजवायच्या ?
- थांब !! हा झारा तापवून चांगला चरचरुन डाग देतें तोंडाला !
- दळिद्री कारटी !
खाऊन पिऊन मेली झालीं आहेत पहा कशीं !
मरुं घातली आहेत जशीं !
- आलांत ? आज लवकर येणें केलें ?
स्वारीचें भटकणें लवकरच संपलें म्हणायचें !
रोज उठून तीं मेलीं मंडळें का फंडळे !
कर्माची करा आपल्या मंडळें !
- उद्यां जा तर खरे, कीं ही सगळी कारटी आणून तिथें उभी करते अन् पहाते तमाशा !
- आलें हो, आलें ! - केव्हांच्या त्या मुरलीबाई हांका मारीत आहेत, तेव्हां अमळ
- ऐकलें का ?
 - असें घुम्यासारखें बसायचें नाहीं !
संभाळा या कारट्यांना, नाहीं तर मेली आग लावून देतील घरादाराला !
- आलें बाई !!....

वर्डसवर्थचें फुलपांखरुं

ओ !
स्प्लेंडिड !
ब्यूटिफुल !
- छे !
वर्डसवर्थची कविता म्हणजे काय ! - मौज आहे !
फारच सुंदर, फारच उत्कृष्ट !
या महाकवीचें अंतःकरण किती प्रेमळ - अगदी मेणासारखें आहे नाहीं ?
आनंदामध्यें इकडून तिकडे धिरट्या घालणार्‍या सूक्ष्म अशा किड्याला अगर मुंगीला, किंचित् कोणी अडथळा केला, तर या कवीच्या हदयाला लागलीच चटका बसून, अश्रूंनी डबडबलेले नेत्र त्याच्या कवितेंत ठिकठिकाणी कसे स्पष्ट दिसतात !
- हीच पहा की ' फूलपाखरुं ' ही कविता - किती बहारीची आहे !
ही एकच काय, वर्डसवर्थच्या सर्वच कविता गोड, मधुर, रसानें भरलेल्या आहेत !
- म्हणे माझी बहिण एमिलाईन आमच्या बागेंत बागडणार्‍या फूलपाखराला
- त्याच्या पंखावर बसलेली धूळ प्रेमानें हळूच पुसावयालासुद्धां बोट लावीत नसे ! कां ?
तर आपल्या नखाचा स्पर्श होऊन त्या बिचार्‍याचा नाजूक पंख कदाचित् दुखावेल
- आणि त्याच्या आनंदाचा विरस होईल ! अहाहा !
वर्डसवर्थ कवीची सृष्टि, म्हणजे जिकडे तिकडे आनंद आहे !
धन्य तो कवि, आणी धन्य तो इंग्लंड देश !
खरोखर, अशा कवीच्या अघ्ययनानें खडक देखील मेण होऊन जाईल ! मग माणूस तर
- अरे ! हें काय ?
या पुस्तकांत हा ढेंकूण कोठून आला ?
- हा थांब चोरा ! पळून जातोस काय ?
अस्सा ! बरा सांपडलास !
आतां जा कसा पळून जातोस तो !
तरी म्हटलें सकाळी येवढें चावत काय होतें !
द्यावें याला खिडकीवाटें टाकून नाहीं ?
- नको नाहीं तर, तसें नको !
 कारण, हा पुनः घरांत येऊन चावेल !
चिरडून टाकूं ? इश !
हाताला उगीच घाण येईल अशानें !
मग ?
- हां हां !
या दिव्यांतल्या चिमणीवाटें द्यावा आंत फेंकून !
म्हणजे चांगला भाजून मरेल !
पहा, पहा !
कसा चिकटून बसला आहे तो !
पडतो आहे का खालीं ?
- स्स् ! हाय !
बोट जेवायची तयारी झाली !
- चला तर लवकर,
- आपल्याला काय, जेवण झाल्यावर आणखी वर्डसवर्थ वाचूं !....

चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच

काळी आहें का म्हणावें मी ?
कशी गोरी गोरीपान आहें !
- हो हो !
आतां आमच्या चिंगीला सरी करायची, बिंदल्या करायच्या, झालंच तर बाळे, साखळ्या, सगळे सगळे दागिने करायचे ते !
- कसा छानदार मग परकर नेसायचा, पोलकें घालायचें, अन् ठुमकत शाळेंत जायचें, नाहीं बाई ?
 - शहाणी होईल बबी माझी !
मोठीं मोठीं बुकं वाचील !
अन् मग महाराज छोनीचं आमच्या लगीन !
- खरचं सोने, तुला नवरा काळा हवा, कीं गोरा ?
- का..... ळा ! - नकोग बाई !
छबीला माझ्या कसा नक्षत्रासारखा, अगदी चित्रासारखा नवरा मिळेल हो !
- अस्से थाटाचें लगीन करीन, कीं ज्याचें नांव तें !
आहात कुठें !
हजार रुपये हुंडा देईन, हजार !
ताशे, वाजंत्री, चौघडा - हो हो तर !
बेंडबाजासुद्धां लावायचा !
वरात पण वरात निघेल म्हणावें !
नळे, चंद्रज्योती, झाडें यांचा काय लकलकाट होईल !
- पण खरेंच गडे चिंगे, तूं मग भांडायसवरायची नाहींस ना ?
जर का घरांत भांडलीच, तर पहा मग !
माणसाला कसं मुठींत ठेवायला हवें बरं का !
संसार पण संसार झाला पाहिजे !
आणि हें बघ, आपलें आधींच सांगून ठेवतें, पहिलें तुझें बाळंतपण कीं नाहीं, इथें व्हायला हवें !
पुढची करा हवीं तर खुशाल आपल्या घरी !
- मोठी दैवाची होईल चिंगी माझी !
पुष्कळ मुलं होतील माझ्या बबीला !!
- पण काय ग, तुला मुलं झालेली आवडतील, का मुली ?
मुली !
- नको ग बाई, कारट्यांचा मेला तो जंजाळ !
एकापेक्षां एक, असे सगळे मुलगे होतील म्हणावें, मुलगे !
- तसेंच, गाडी - घोडे, कपडालत्ता, कश्शा कश्शाला म्हणून कांही कभी पडायचं नाहीं !
- बरं बरं ! इतक्यांत नको कांहीं चढून जायला !
मोठा दिमाख दाखवते आहे मला !
- पहा, पहा ! फुगते आहे पहा कशी !
- पण कार्टे, बोलूं तर नकोस माझ्याशीं कीं अस्सा हा गालगुच्चा .... अग बाई !
.... हें ग काय ! कसें सोन्यासारखें बोलतें आहें, अन् तुं आपली .... नाय .... नाय .... उगी, उगी माझी बाय ती ....

बोलावणं आल्याशिवाय नाहीं !

सांगूं तरि आतां किती जणांना ?
येतो तो हेंच विचारतो !
- असतील !
चार नाही छप्पन्न नोटिसा निघाल्या असतील !
करायचय काय मला त्यांच्याशीं !
जायचं असेल, त्यांनी जावं खुशाल !
मी थोडाच जातोंय तसा !
- अरे राह्यलं ! नाहीं, तर नाहीं !
इथं थोडंच माझं कांहीं अडलं आहे !
हपापलेली चार खतरुड पोरं गोळा करा, आणि हव्वं तें करा म्हणावं !
- नाही सगळ्या गॅदरिंगच्या नाटकाचा बट्याबोळ झाला, तर नांव कशाला !
- अबे जारे !
मोठा शाळेचा मला अभिमान सांगतो आहे !
आम्हांला तेवढा अभिमान असावा !
आणि शाळेला ?
तिनं हवं तसं आम्हांला लाथाडावं होय ?
- अलवत ! नाहींच भागायचं नुसल्या नोटिशीनं !
कांही थोडीथोडकी वर्ष नाहीं कामं केलेली मीं !
अन् तींही पुनः अशीं तशीं ?
- चौथींत आल्याबरोबर धडाक्याला कॅन्यूटचं काम !
सारख्या टाळ्या !
तीच तर्‍हा दुसर्‍या वर्षी !
पुढें पांचवीत येतांच .... अश्वत्थाम्याचें काम !
जो कांहीं त्यांत माझा आवाज लागला, तसा अद्याप एकाचाहीं कोणाचा लागला असेल तर शपथ !
- दोन रे का ?
पांचवीत तर ओळीनें तीन वर्ष कामं केली मीं !
अन् सहावीतली दोन ठाउकच आहेत तुम्हांला !
- नाहीं, संभाजीचं काम तें दुसर्‍या वर्षी ! वा !
त्या वर्षी तर किती जणांनीं आंत येऊन सांगितलं कीं, धंदेवाल्यापेक्षाही तुझं काम छान झालं ! '
- अरे त्या वर्षी तर स्पेशल पदक मिळालं मला !
- तेंच पुनः सातवींत आल्यावर !
पहिलंच अगदी सीझरचं काम - दुसर्‍याला चांगलं दिलेलं .... पण त्याचं काढून मुद्दाम मला दिलं !
नाटक पाह्यला कोणी युरोपियन आला होता, त्यानं काम पाहून .... विशेषतः ऍक्सेंटस ऐकून .... तोंडांत बोट घातलं म्हणतात !
- पुढं दुसर्‍या वर्षी ?
- हां बरोबर ! धुंडिराजाचं काम !
- तेव्हां तर काय .... हंसता हंसतां पुरेवाट झाली लोकांची !
अन् सगळ्यांत बाबा कळस झाला गेल्या वर्षी !
- शॉयकॉलचं काम !
- पाहून लोक इतके चिडले कीं, एकनं तर चकचकीत घोंडा मारला स्टेजवर !
- तेव्हां बोला आतां !
इतका जिथं माझा अनुभव .... आणि दर्जा वाढलेला, तिथं असल्या फासक्याफुसक्या नोटिशीनं जायचं !
- साफ नाहीं यायचा तसा मी !
मास्तरचा जर येवढा ऐटा आहे .... सांगितलं ना !
मास्तरांवाच जर इतका तोरा आहे, तर साफ यायचा नाहीं मी बोलावणं आल्याशिवाय....