कोणी नको अन् कांही नको, देवता तूं एकली !

हृदय जीतें अर्पिलें हें होउनी बद्धांजली !

वाटभर गे हा फुफाटा; पाय जाती पोळुनी;

सौंदर्य तूझें – सावली ही ! सार्थ झाली चालणी.

आग पोटी भावनेची ! ‘घाल तुकडी भाकरी’,

– हीहि परि गे, याचना ना आज तूझ्या मंदिरी.

मन्मनाच्या माळरानी भावना-झुडुपें जिथे

तग न धरती, प्रेम-तरु गे, फोफावणें कैचा तिथे !

जीविताचें ऊन विश्वीं जोंवरी हें तापतें,

फक्त तूझ्या दर्शनाची ही पिपासा लागते.


सौंदर्य-देवि सुहास, तूं ! मी फक्त आतुर दर्शना;

मेल्यावरी तर हीहि गे, उरणार नाहि तहान ना ! 

 सुन्न झालें मन, सुन्न भावना या,

भोवताली पसरली रात्र-छाया;

पावसाचा चुकविण्या मार घेती

पांघरूनी अंधार घरें रस्तीं.

“- व्यर्थ येतां का ? प्रेम कधी माझें

– शक्य नाही” – उतरिलें तिथे ओझें

बंद दाराशीं मग मुग्ध भावनांचे;

आणि धरिला मम मार्ग सिधा….

पावसाळी अंधार गारठ्यांत

काकडूनी हम-मार्ग-दिवे जात;

चिंब ओला जाहलों आणि थेट

दारूगुत्त्याला दिली प्रथम-भेट !

भेट शेवटली तशी प्रथम तीच,

झोपडीला परतावी माय-खेच.

माय असते, बाईल जरी नाही,

प्रेमवंतां तशि प्रेमवंचितांही.

दिवस झाले कित्येक त्या प्रसंगा;

आज आलों शोधीत गेह-रांगा;

बंद आहे तव दार; परि ओझें

आत नेलें उचलुनी कुणीं माझें !

 हां हां थांब ! नको सुहास, गमवूं तोंडातली मौत्तिके,

“देवाच्या घरचाच न्याय असला !” प्रश्नास दे उत्तर.

“झाला खेळ, अता पुरे !” वद असे धिक्कारुनी कौतुके,

जातांना उपहास-हास्य-ध्वनिही पाडीत कानांवर.


काळी भीषण रात्र कापित निघे हृत्स्वामिनी भेटण्या

काळा फत्तर तोंच होउनि पडे तारा सहाऱ्यावर.

स्वर्गाच्या मग मंदिरी चमकती जेव्हा सख्या चांदण्या,

किंचित् हासुनी तारका खुणविते – “आता कळे अंतर !”


झाला अंक समाप्त एक ! बदले ही भूमिका, वेष हा;

मी रस्त्यातिल गे भिकार कवि, तूं प्रासादशृंगीं रहा !

 आता अंत कशास पाहसि ? अता आभाळलें अंतरी;

विश्वाची घटना मला न उमगे; मानव्यता दुर्बळ.

केलें पाप असेल जें कधिं तरी मी जन्मजन्मांतरीं,

प्रायश्चित्त तदर्थ ना म्हणुनि गा, पाठीवरी हे वळ ?


न्यायाच्या निज मंदिरांत बसुनी साक्षीपुराव्याविना,

किंवा काय गुन्हा असेल घडला सांगीतल्यावाचुन,

न्यायाधीश असेल मानव तरी शिक्षा सुनावीत ना;

देवाच्या परि न्यायरीति असलें पाळील का बंधन !


होवो तृप्त – तथास्तु ! – निर्घृण प्रभो, ही न्यायतृष्णा तुझी;

फासाला चढल्यावरी नच दया याची, जरी पामर;

भूतां अप्रतिकारिता भ्रमविते यंत्रापरी शक्ति जी,

तीतें एक सहिष्णुता अचल अन् निःशब्द हे उत्तर.


किंवा हार्दिक बेइमान ठरतो नित्यांतला सत्क्रम,

तेथे प्रेमच एकनिष्ठ घडते अक्षम्य दुर्वर्तन !

 मायावी गुजगोष्टि गुलगुल मुदे; आलंगनी तत्पर;

किंवा चुंबनलोलुप स्मित सदा ओठांवर नाचरे !

झाली दंग सुहास, प्रेम-युगुलें ऐशी मजेखातर;

– विश्वाच्या बगिच्यांत हीं भिरकिती कालांबरी पाखरे.


हासे ज्या क्षणभंगुरत्व विजयें वाखाणुनी कौतुकें,

लीला या लटक्या बघून निमिषोत्फुल्ला सुदैवानिलें;

माझेंही तुज प्रेम काय गमलें या टर्फलांसारिखे,

ज्यांच्यातील जिवंत जीवनरसा सौख्ये असे शोषलें ?


नाही -! मद्हृदयीं सुरा खुपसतां मी आत्महत्येस्तव,

रक्ताची चिळकांडि ही उसळुनी एका कमानींतुन

येवोनी भिजवील कोमल तशा या शुभ्र पायां तव;

अन् तो स्त्रोत अखंड वाहिल तसा दिक्काल ओलांडुन.


घेतां आचमुनी पवित्र जहरी ही रक्तगंगा लव,

विश्वाचे अभिषिक्त देव तरुनी होतील ते – मानव.

 जा जाई आता, परतुनि कां हाससी ?

कां उगाच वळवुनि मागे

आपुली नजर, भारिसी ?


स्थितधी नजरी मी, मानी तरि मानिनी,

नच अवाक्षरही एका,

काढीन कधी भाषणीं.


ये वीणारव मधु, मंजुळ पवनांतुनी,

डबडबती ऐकुनि डोळे

कारुण्य-सुधा-सिंचनीं.


परि एकहि भोळा अश्रू जो तेथुनी

पडणार, तोंच घेईल

हृदयाग्नि तया शोषुनी.


धगधगित निखारा हृदयीं हा कोंदुनी,

मत्प्रसन्नवदनीं छाया

वरि शीतल चंद्राहुनी.


ही पाझरते तव शांत शरच्चन्द्रिका !

निशिगंध दरवळे भोती,

पुलकिता मार्ग-वालुका.


अदृश्य अप्सरा अवनीवर येउनी,

घुमविती निशा-संगीत

या मिटल्या पुष्पांतुनी.


मी मानव ! – दुर्बळ ! – दिव्य, धवल माधुरी !

व्याकळून हृदयीं येतां

स्मृति होइल तव अंतरिं .


हृतकंप ! – तरल भावना ! गोड ती स्मृति !

परि निष्ठुर जबरेने मी

गाडीन गाढ मी विस्मृतीं.


बंबाळ जखम आतली दाबतों अशी,

बेहिम्मत आर्तरवाने

रडतील रडो दीनशीं.


निष्प्रेम-निराशा-दुःसह जीवन तरी,

याचना न केविलवाणी

मम वदेल कधी वैखरी.

 झाली चूक ! – क्षमस्व ! वेड असलें जन्मांतुनी लागतें,

तेंही एकच वेळ ! नेत्र उघडे ठेवून ना दोनदा :

मौर्ख्याचा जगणें कलंक न असा लावून घेतां कदा,

सर्वांनाच कुठे शहाणपण हे देवाघरीं लाभतें !

ज्यांना संकट,