एक झाड

एक झाड कमरेमध्ये वाकलेल
पक्षी मोजता-मोजता हिशोब चुकलेल
मुळात चुकल काय…
चुकल काय…चुकल काय
मुळात चुकल काय…पाह्यला झुकलेल

एक मासा पाण्यामुळे पिडलेला
स्वत: मध्ये खोल खोल बुडलेला
रडता येत नाही…
येत नाही..येत नाही…
रडता येत नाही…म्हणून चिडलेला

एक आभाळ उंच उंच टांगलेल
खाली बघून खोल खोल भ्यालेल
ढगात खूपसून मान
खूपसून मान…खूपसून मान
ढगात खूपसून मान धपकून बसलेल

एक शून्य काना कोपरा नसलेल
बेरीज वजा गुणत भागत बसलेल
वेड्या सारख
वेड्या सारख…वेड्या सारख
शून्यात बघत हसलेल

एक मी सार सार बघणारा
दिसतो जिथे कधीच तिथे नसणारा
माझ्यात सारे…माझ्यात सारे
माझ्यात सारे…माझ्यात सारे
माझ्यात सारे…सार्‍यात माझे पाहणारा

एक झाड कमरे मध्ये वाकलेल
एक मासा पाण्यामुळे पिडलेला
एक आभाळ उंच उंच टांगलेल
एक शून्य काना कोपरा नसलेल
एक मी सार सार बघणारा

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- कधी हे कधी ते
10/10/10:

कुणी काही म्हणा

कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा 
अनुसरले मी अपुल्याच मना

रीत म्हणा, विपरीत म्हणा 
दिले झुगारुनी आवरणा

रीती-कुरीती, नीती - अनीती 
आता उरली चाड कुणा? 
लोकलाज-भय धरू 
कशाला मागायाचे काय जना?

जळल्या साऱ्या आशा मनीच्या
पुसल्या उरल्या त्याही खुणा
जीव भरेना, हौस पुरेना
वाढतोच घरी काम दुणा 
यास्तव हा परपुरुष परिणिला 
मन मिनले गोविंदगुणा

रामचंद्र मनमोहन

रामचंद्र मनमोहन, नेत्र भरुन पाहिन काय?

सतत रमवि जे मनास, ज्यात सकल सुखनिवास सुधाधवल विमल हास अनुभवास येईल काय?

आई अंबे वसुंधरे, क्षमा नाम धरिसी खरे मम मानस-राजहंस पुनरपि मज देशिल काय?

जाउ तरी कोणास शरण, करील कोण दुःख हरण मजवरि होऊन करुण प्रभुचं चरण दावील काय?

अशनि राम, पाणि राम, वदनि राम,

नयनी राम

ध्यानी-मनी एक राम, वृत्ती राम जाणिल काय?

हा नाद ओळखीचा ग


त्यांच्याच पावलांचा, हा नाद ओळखीचा ग

कमलें सरांत फुलली, कुसुमें वनांत खुलली 
करण्यास मान त्यांचा

येतां सखा हसूं का? क्षण कांहीं वा रुसूं का?
रुसवा हसावयाचा

लटके रुसून काही, क्षण बोलणार नाही 
हा मान मानिनीचा

कवटाळिता तनूला, कुरवाळिता हनूला 
रुसवा टिके कशाचा?

विसरून जीवभावा, देईन आत्मदेवा 
तांबुल चुंबनाचा
विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोड गोड देशि जरी आता ॥धृ।।

दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायहि विविध विविध विषय भोवताली
गुंतता तयांत कुठें वचन आठवीता ? ॥१॥

स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशहि वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केविं जसा होता ॥२॥

स्वत्वाचे भान जिथें गुंतल्या नुरावे
झुरणारे हृदय तिथे हे कुणी स्मरावे
होइल उपहास खास, आंस धरू जाता ॥३॥

अंतरिची आग तुला जाणवूं कशाने?
बोलावे न वेदनाच वचन दुःख नेणे
याकरता दृष्टिआड होऊं नको नाथा ॥४॥

शाहीर

या महाराष्ट्र देशात ।उपजलो मीच शाहीर ।। ध्रु .||

राष्ट्रात नाद घुमविला । जवळचि अतां उद्धार
यापुढती काव्यश्रीला |चढवीन नवा शृंगार
शब्दसंघ फुलविन हर्षें ।स्वातंत्र्य तया मिळणार
हलवीन सर्व इतिहास
कांपवीन व्याकरणास
विश्रांति न संगीतास
मेलेले मुडदे म्हणती ।उपजलों मीच शाहीर

शाहिरा कशाला विद्या ।मळतसे काव्य विद्येने
जसजसें वाढतें ज्ञान ।तसतसे काव्य विलयाने
शाहिरें न म्हणुनि शिकावे ।असावे मस्त अज्ञानें
अज्ञानवारूवरि स्वार
गर्वाची करिं तलवार
होऊनिया बेदरकार
सर्वत्र गात सुटेन । उपजलो मीच शाहीर

कवि सर्व इतर ते कवड्या ।मी एकमात्र कलदार
कविता त्या म्यांच कराव्या ।फिरवाव्या दारोदार
पडद्यातिल कविता कसली । पाहिनाच जी बाजार
निर्लज्ज बनूनि फिरावे
दिसताच जमाव शिरावे
अपुलेंच काव्य भरडावे
करू शके कोण मजविण हें ।उपजलों मीच शाहीर

शाहिरें आपुलें काव्य ।म्हण म्हणता कधिं न म्हणावे
प्रेमें कुणी आग्रह करितां ।त्यांच्यावरि वसकन जावें
आपल्याच मग इच्छेनें ।भलतेंसें गात सुटावे
मग किटोत कान कुणाचे
काय होय आपणां त्याचे
हे वैभव शाहिरतेचे
हे वर्म जायला पटले ।तो तोच होय शाहीर

रागांची पर्वा कोणा ।तालाची वा दरकार
राग ताल दुसऱ्यासाठी ।मी न त्यांत सांपडणार
मी स्वयंभु शंभु वाटोळा ।मी असे स्वैर शाहीर
मज हसतो रसिक नव्हे तो
कवितेंत तालसुर बघतो
अर्थ वा पाहण्या धजतो
काव्यात अर्थ जो ठेवी । तो हाय कुठुनि शाहीर

कोणतेंहि मासिक उघडा ।मम दिसे त्यात कवि-कर्म
मम अखंड काव्यस्राव ।नच केवळ मासिक -धर्म
संपादकांस मज अथवा ।हें ठावें सगळें मर्म
शाहिरपण माझे उघडे
हाडांची करुनी काडें
बाडांवरि लिहिलीं बाडे
यावरिहि कोण मजलागीं ।म्हणणार नाहिं शाहीर ?

कविते! करिन तुला मी ठार

 कविते! करिन तुला मी ठार ।।ध्रु .||

पूर्व कवींनी तुज रस पाजुनि मस्त बनविलें फार

रस बिस आतां मम साम्राज्यी कांहिं न तुज मिळणार


अलंकार मद-मत्त जहालिस धुंदि उतरतों पार

मोडुनि तोडुनि फेकुनि त्यांना दृष्टि न दिसुं देणार


पदोपदीं अवसानीं तुझिया करुनी घातक वार

सुवृत्त अथवा सुपदा कशि तुं हेंचि आतां बघणार


पदलालित्यें जना भुलविलें केले नाना चार

भावाची बहु हाव तुला परि अभाव तुज करणार


नादांतचि रंगुनी गुंगविसि रसिका करिसी गार

नाद तुझा तो नष्ट कराया समर्थ मी साचार


समृद्ध अर्थें असा मिरविला आजवरी बडिवार

अर्थाचा परि लेश यापुढें तुजला नच मिळणार


कोशावरि तव भार सर्व परि लाविन त्यांचे दार

शब्दांच्याचि न कृतिच्या दैन्ये मळविन तव संसार


व्याकरणाच्या अंकी बसुनी शुद्ध म्हणविशी फार

ठार करुनि परी तया तुझ्यावर ओतिन अशुद्ध धार


अपशब्दांचा असा तुझ्यावर करितों बघ भडीमार

जरी न मेलिस तरि मेल्यापरि होशिल मग बेजार


देश धर्म वा वीर विभूती तुज न अतां दिसणार

आता वणवण घुबडासंगे करविन तव संचार


मजलागीं तूं कोण समजशी मी तों कवि कालदार

कालदारचि कां शाहीरांचा फर्स्टक्लास सरदार