विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोड गोड देशि जरी आता ॥धृ।।

दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायहि विविध विविध विषय भोवताली
गुंतता तयांत कुठें वचन आठवीता ? ॥१॥

स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशहि वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केविं जसा होता ॥२॥

स्वत्वाचे भान जिथें गुंतल्या नुरावे
झुरणारे हृदय तिथे हे कुणी स्मरावे
होइल उपहास खास, आंस धरू जाता ॥३॥

अंतरिची आग तुला जाणवूं कशाने?
बोलावे न वेदनाच वचन दुःख नेणे
याकरता दृष्टिआड होऊं नको नाथा ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा