चिरवियुक्ताचा उद्‍गार

वृष्टीमागुनि चन्द्रकान्तिधवला ती ये शरत्‍ सजिरी,
तैसा रम्य वसन्त तीव्र शिशिरामागूनि तो येतसे,
सूतिक्लेश सरे अनन्तर सुखा तें तान्हुलें देतसे,
पाणी ओसरतां समग्र भरती येते पुन्हा सागरीं.

द्युत्याविष्कृति मोक्षकाल करितो खग्रास झाल्यावरी,
कृष्णानन्तर शुक्ल पक्ष चढती तो कौमुदी घेतसे,
प्रातः काल सुरेख गाढ रजनीमागुनि तो होतसे,
होता दारुण कल्प-अन्त फिरुनी सृष्टि स्मिता आदरी !

या गोष्टी गणणें असे सुलभ गे त्यांला जयाच्या मनीं
आशातन्तु नसे अजूनि तुटला; ते भाग्यशीली खरे !
कान्ते ! मत्सम मे परन्तु असती जे या अभागी जनीं,
त्यांची वाट विपत्समाकुल जगीं होणार कैशी बरें ?

उत्कंठाज्वलनें तुझा विरह हा टाकी मला पोळुनी
या गोष्टी गणतां निराश ह्रदयीं माझ्या भरे कांपरे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
-  शार्दूलविक्रीडित
- मुंबई १५ नोव्हेंबर १८९२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा