आईकरितां शोक

अन्तरले पाय तुझे हाय हाय माते ! ॥ध्रु०॥
मागें तव दर्शन मजलागुनी जहालें,
तदनन्तर लोटूनियां दिवस फार गेले:

फिरुनि तुझ्या चरणांतें
उत्सुक मी बघण्यातें
असतां, अन्तींहि न ते

दिसले कीं---अहह ! पूर येत लोचनातें !
अन्तरलें पाय तुझे हाय हाय माते !
फिरुनि तुझें कोठें तें तीर्थरूप पाहूं !
पादरजीं लोळुनि तव धन्य केंवि होऊं !

जनकामागें जागृत
जननी गे तूं दैवत
उरलिस, तीही साम्प्रत

गेलिस सोडुनि आम्हां दिन बालकांतें ।
अन्तरले पाय तूझे हाय हाय माते !
कठिण जगीं या बघती छिद्र काक सारे,
करुणेचें कोठेही नसे लेश वारें

तुझ्यासनें क्षमा दया
प्रीतिहि गेली विलया !
मदपराध घालुनियां ---

पोटीं, नुरलें कोणी प्रेम करायायें !
अन्तरले पाय तुझे हाय हाय माते !
कष्ट दिले तुजला मीं फार फार आई !
त्यांची मजकडुनि फेड जाहली न कांहीं !

दुर्भग मी असा असें,
म्हणुनि दुःख वाटतसे,
कठ फार दाटतसे !

रडतों गुडघ्यांत म्हणुनी घालुनी शिरातें !
अन्तरले पाय तुझे हाय हाय माते !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १९०१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा