गाणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गाणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

त्याचा पाऊस तिचा पाऊस

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात


कवी- सौमित्र

पाऊस

गार वारा हा भरारा, नभं टिपूस टिपूस
रानी वनी, पानोपानी, मन पाऊस पाऊस

माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास
मातीवर थरथरे, ओला सुवास सुवास

पावसाळी पायवाटा, जरा उदास उदास
दाही दिशांत पाखरे, जणू आभास आभास

रान मोकळे मोकळे, बघे भारुन नभास
त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास


गीतकार : सौमित्र
गायक : सौमित्र
संगीतकार : मिलींद इंगळे
चित्रपट : गारवा

सोबतीला चंद्र देते

सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते
तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते

चांदण्यांच्या पावलांनी मी तुझ्या स्वप्नात आले
या निळ्या बेहोष रात्री मी तुझ्याशी एक झाले
मीलनाला साक्ष होते ते तुला मी श्वास देते

संचिताचे सूर माझ्या एकदा छेडून घे तू
घाल ती वेडी मिठी अन्‌ एकदा वेढून घे तू
जन्मती हे सूर जेथे ते तुला आभास देते

तू कुठेही जा, सुखी हो, चंद्र माझा साथ आहे
गीत माझे घेउनी जा, प्राण माझा त्यात आहे
तृप्तिला हेवा जिचा ती लोचनांची प्यास देते


गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - लता मंगेशकर

आसवांचा येतो वास

कसे कसे हसायाचे
हसायाचे आहे मला

हासतच वेड्या जीवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे
कुठे? कुठे आणि केव्हा?
कसे आणि कुणापास?
इथे भोळया कळयांनाही
आसवांचा येतो वास

गीतकार :आरती प्रभू
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

नक्षत्रांचे देणे

गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निमार्ल्य, आणि पानांचा पाचोळा


कवी / गीतकार : आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें
गायिका  : आशा भोसले
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर

नाही कशी म्हणू तुला

नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परी सारे हलक्याने आड येते रीत
नाही कशी म्हणू तुला, येते जरा थांब
परी हिरव्या वळणांनी जायचे ना लांब

नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परी नीट ओघळेल, हासतील कोणी
नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परी नको अधरांचा, मोडू सुमडाव

नाही कशी म्हणू तुला, जरा लपू छपू
परी पाया खडे कांटे, लागतात खुपू
नाही कशी म्हणू तुला, विडा रे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी


गीतकार :आरती प्रभू
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर.

केळीचे सुकले बाग...

केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी

अशी कुठे लागली आग, जळति जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे

किती दूरचि लागे झळ, आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा

किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली

कवी    - अनिल
संगीत -    यशवंत देव
स्वर   -    उषा मंगेशकर

अजुनी रुसून आहे...

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ।

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे,
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरीला असा अबोला, की बोल बोलवेना ।

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे,
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना,
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ।

की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग,
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ।


कवी     –    अनिल
संगीत  –    पं. कुमार गंधर्व
स्वर     –    पं. कुमार गंधर्व

पायंजणा

त्या दिसा वडा कडेन गडद तिनसना
मंद मंद वाजत आयली तुजी गो पांयजणा

मौन पडले सगल्या रानां
शिरशिरून थांबलिं पानां
कंवळी जाग आयली तणा झेमता झेमतना

पैसुल्यान वाजलि घांट
दाटलो न्हयेचो कंठकांठ
सांवळ्यानी घमघमाट सुटलो त्या खिणा

फुललो वैर चंद्र ज्योती
रंध्रांनी लागल्यो वाती
नवलांची जावंक लागलीं शकून लक्षणा

गळ्यान सुखां, दोळ्यान दुकां
लकलकली जावन थिकां
नकळटना एक जालीं आमी दोगाय जाणा

वडफळांच्या अक्षतांत
कितलो वेळ न्हायत न्हायत
हुपले कितले चंद्रलोक इंद्रनंदना

तांतले काय नुल्ले आज
सगले जिणेक आयल्या सांज
तरीय अकस्मात तुजी वाजली पांयजणा

कानसुलांनी भोंवता भोंवर
आन्गार दाट फुलंति चंवर
पडटी केन्ना सपनां तींच घडटी जागरणा


गीत : बाकिबाब बोरकार (बा. भ. बोरकर)
संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी
स्वर : अजीत कडकडे