पोवाडा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पोवाडा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नाना शंकर शेट

दैववान नाना शंकर शेट विजाति । केली केवढी उभय वंशात उभयता ख्याती ॥ध्रु०॥

ना कळे कोणाला विचित्र हरिची माया । क्षणमात्रे दीनावर लावील छत्र धराया ॥ बाबुल शेटिवर पडली कृपेची छाया ।

ते पुण्यवान ती धन्य पवित्र जाया ॥ शंकर शेट आले पोती किर्त कराया । झाली प्राप्त अचल लक्ष्मी आरोग्य काया ॥चाल॥

वाढली मान-मान्यता जगामध्ये मोठी ॥ पाहिल्या पडे श्रम केवळ धनाची कोटी ॥

नावडे गोष्ट कल्पांती कोणाची ओती ॥चाल॥

कडकडीत कठीण मर्जी । जसा फर्जी निर्भय गर्जुन बोले ॥ संतत संपत अनुकुळ । नाही प्रतिकुल । या भरपणांत डोले ॥

बाच्छाय आपल्या घरचे । लाल हरीचे । त्या योग्य तसे तोले ॥चाल॥

बहु बळे संपदा मिळवली ॥ मुळापासून औदसा पळवली ॥ विष्णु सहित लक्ष्मी वळवली ॥चाल॥

अहा रे ! शंकर शेट धनाज ॥ भाग्यवान भोळे महाराज ॥ कुटुंबसंरक्षणाचे जहाज ॥

डामडौल नाही काही मिजाज ॥ दीन दुबळ्याचे गरीब नवाज ॥ शरण आल्याची राखुन लाज ॥ आगोदर त्याचे करावे काज ॥

मोठ्या मोठ्याचा जिरवुन माज ॥ हरीस आणिले शेट बजाज ॥ पैलापूर मुंबईत आज ॥चाल॥

जेव्हा टिपूवर इंग्रज गेले ॥ तेव्हा शेट सवे नव्हत नेले ॥ परंतु भर्णै येथुन केले ॥ समय रक्षिले ज्यांनी अशेले ॥चाल॥

म्हणून साहेब बहुत चाहाती ॥ करून गौरव धरावे हाती ॥ काढुन टोपी उभे की राहती ॥चाल॥

देशावर चालता हुंड्या ॥ इतर गाई तर गरीब भुंड्या ॥ अपराधावर धरून पुंड्या ॥ घरी चढवाव्या ॥चाल॥

भलत्याचे पडेना तेज फिटेना भ्रांती । यासाठी लोक भरदिसास हिसके खाती ॥१॥


कवी - अनंत फंदी

प्रभात पोवाडा

शूर मर्द महशूर देश दख्खनचे सरदार,

मानकरी बारगीर बाणेदार शिलेदार.

गावगावचे मिळोनि भरली मजलस भरदार,

कवन कोणते गावे करितो फिकीर शाहीर.

रूप भयंकर, सुंदर, वाग्बळ थोर जोरदार,

पुराणकाळाचे अंगावर झगे चमकदार.

पूर्वकवीश्वर तेही सादर सदरेला झाले,

सिद्धरसाची गिरा तयांची नागर वच बोले-

"विचार करणे कशास" म्हणती "कवन म्हणायाचा?

काय शिरस्ता तुम्हा न ठावा शाहिरपेशाचा?"

चिरंजीव गत शाहीरांनो ! हीच धरून शिस्त

विद्यमान शाहीरमंडळी जाते नेमस्त.

यशःप्रशस्त्या, विजयकथा, ते समरचमत्कार

वीरपुरुष पुरुषार्थ निर्मिले आपण साचार.

अजब, मातबर, अगाध याहुनि भारदस्त काही

फिरोनि ऐसे, मान्य अम्हाला की होणे नाही.

गतास वंदुनि, गफलत सोडुनि, निजमार्गे चालू

वर्तमानकाळाची बाजू आम्ही सांभाळू.

चौशतकांची दीर्घ झटापट ही चालू आहे,

महाराष्ट्रजनसागर सगळा खळबळला आहे.

हिंदूयवनशीलातिल जो जो भिन्न भाव आहे

त्या दोहोतिल उत्तमतेचा हा झगडा आहे.

भरतखंड रणाअखाडा, झुंजार मल्ल दोन्ही,

निर्वाणीची दारुण त्यांची चाले झोंबी ही.

स्वदेशजनधर्माचा जीर्णोद्धार करायाते

झुंज मातबर सभोवार ही घनचक्कर होते.

हुल्लड हल्ला दौड गराडा घाला अवचीत,

शिकस्त खाणे, दुष्मन करणे चौमुंडी चीत,

मोड पळापळ झोड, जयाची आशा हिरमोड,

फसली मसलत, अंगा आली बाजू बिनतोड,

वीर यशस्वी, वीर अपेशी, वीर रणी पडला,

सामाज नावाजितो कडाकुन या सकळीकाला.

सर योद्धे करितात लढाई कमाल शर्थीने.

पतन सोशिती त्याहुन जास्ती जबर्‍या हिमतीने.

यास्तव आम्ही हार मानितो जीतीसम थोर

रणखंदाळी कडेविकट ही गातो घनघोर.

जीव कुडीसम शाहीराची मर्दाची जोडी

एकामागे दुजा तगेना लगे प्राण सोडी.

सभाजनांनो ! असे प्रार्थना तुम्हा शाहिराची

खबरदार होऊन खबर ऐकावी दुनियेची.

नुरो पैरवी पृथ्वीवरती हिंदूंची काही

जणू मनसुबा असा करी की सालिम दुनिया ही.

चौकिपहारे उत्कर्षाच्या ठेवुन हमरस्ती

हिंदुस्थानी बंदी केली हिंदूला पुरती.

कहीकवाडा वाढुन किंवा वेठबिगारींनी

पोट भरावे दुनिया म्हणते हरदम हिंदूंनी.

विसर विसर मस्तानी दुनिये ! तुझी बात पहिली

नजरबंद हिंदूंची आता नजर खुली झाली.

हिम्मत हिकमत धमक जोम निर्धार तडफ नेट,

धाडस धोरण हुरूप अक्कल पोच अटोकाट.

स्फूर्ति कल्पना प्रताप अघटित घटनासामर्थ्ये

पूर्वी होती, आता असती बघता सत्यार्थ्ये.

समुळ बुडावा हिंदू मर्जि असेल देवाची,

राजी आम्ही. करून जाऊ करणी मर्दाची.

जनचित्ताचे समुद्रमंथन दिशा दक्षिणेने

चालविले बहु काळापासुन हिरशी चुरशीने.

’स्वतंत्रता’ शिरताजरत्‍न वर उदरांतुनि येई

चतुर मराठ्याकरी प्रबल अभिमाने ती देई.

काळ मागला शोधुन बघता दृष्टीला दिसतेः

एके वेळी एक राष्ट्रची इतरांचे नेते;

पुढिल पिढ्यांना मानवतेच्या आस-भरोशाला

एका वेळी जामिन एकच देश होत आला.

देश मराठा लोक मराठा कुल वरकड देशा

नेता जामिन आज एक हा, नाही अंदेशा.

जय अपजय या स्वातंत्र्याचे युद्धी येतो की,

म्हणाला नकळे याचा शेवट कैसा होतो की.

कोण यशस्वी युद्धे झाली मागे सर्वस्वी ?

काय जगी निर्भेळ यशस्वी सांगा आम्हासी ?

आर्यराष्ट्र कृतकार्य कधी का ते होते झाले ?

कार्य निसर्गाचे का सांगा पूर्णतेस आले ?

विजयाचेही पोटी मोठी कार्ये उद्भवती

अधिक झटापट करणे लागे ज्यांच्या सिद्ध्यर्थी.

जनचित्ताला खळबळणारे एक ध्येय काही

जगदन्तापर्यंत टिकेसे कायमचे नाही.

ग्रहगोलांच्या निर्मळ ज्योती खुल्या हवेवरती

अंतराळागर्भांतुन पोहत पृथ्वीसह जाती.

काय तयांचे रहस्यमय ते साध्य न हे कळते

अचाट सुखमय आहे ’काही ते’ निष्ठा म्हणते.

जीवितगंगा त्याच एक आनंदसमुद्राते

प्रचंड वेगे गाठायाते धूमधडक जाते.

दैव मानवा साध्य सहज ते मिळवुनिया देते,

विपरित होता हिसकुन नेते असे असेना ते.

देशकार्य मागल्या पिढ्यांचे थांबुन का पडले?

धडे मागले गडी मराठे विसरुन का गेले ?

वृद्ध शुद्ध हतबुद्ध आपले कोणी का झाले ?

रस्ते भुलले, चळू लागले मागे रेंगळले ?

सरा पुढे पिळदार मराठे गति दुसरी नाही

तरुणाविण तो कार्यभार मग कोण शिरी वाही ?

उठा उठा नरनारी ! आता रात्र होय सरती

सूर्योदयकाळाचे शाहिर ललकारी देती.

नाथोदय चिन्हिता कंचुकी गात्री तटतटली

कणोकणी वसुधाङ्गी चंचल विद्युत्‌ संचरली.

सौंदर्याचा चढतो जणु की सत्यावर उजळा

लोकनाथ तो उदया येतो, वंदू या त्याला.

महाराष्ट्रपार्वती उग्रतप आजवरी तपली

परम कृपेची पाखर तिजवर परमेश्वर घाली.

दुःस्वप्नाची निशा चेटकी ओसरून गेली

उत्कट उत्कंठेने जनता उत्साहित झाली.

महाराष्ट्रभाग्याची आता पहाट ही फुटली

दैन्यकाळिमा मराठमंडळवदनाची फिटली.

वैगुण्याच्या हिडिस ढगांनी दिग्बंधन होता

अवनति वाहुन चहोकडोनी शिगेवरुन जाता,

किरण पूर्ण तेजाचा कोणी कडकुन निकडीने

करित चुराडा त्यांचा येतो भूवर धडक्याने.

महाराष्ट्रभाग्याची आता पहाट ही फुटली

दैन्यकाळिमा मराठमंडळवदनाची फिटली.

वैगुण्याच्या हिडिस ढगांनी दिग्बंधन होता

अवनति वाहुन चहोकडोनी शिगेवरुन जाता,

किरण पूर्ण तेजाचा कोणी कडकुन निकडीने

करित चुराडा त्यांचा येतो भूवर धडाक्याने.

महाराष्ट्रभूमंडन कंकण बांधुन विजयाचे

राय शिवाजी आला; वंदू चला चरण त्याचे !

स्थापायाला स्वराज्य दंडायाला मत्ताला

मदत करी तुळजा; हा राजा अवतारी झाला.

डाव मांडिला पांची प्राणा लावुन पैजेला

कोण जिवाचे साथी ? या ते साहस कर्माला.

स्थैर्याचे धैर्याचे क्षत्रिय वृत्तीचे असती

वाण सतीच त्यांनी घ्यावे हे उचलुन हाती.

पुरुषार्थाची एक सिद्धि की सर्वस्वी घात

साहसात या शिवरायाची तुमच्यावर भिस्त.

अमर्याद सत्ताबळ अगणित दळबळ शत्रूला

रणोन्माद उद्दाम जिद्द बेहोष करी त्याला.
विक्रमसागर त्याचा बुडवी उत्तर देशाला

लोट तयाचे धडका देती दक्षिण दाराला.

थोप थांबवायाला ती सह्याद्रि पुढे सरला

प्रचंड तो गिरिराज खरा पण आला टेकीला.

करुन चढाई फौजा आल्या भिडल्या दाराला

गड किल्ले कापती साहता त्यांच्या मार्‍याला.

महाराष्ट्रधर्माचे आहे क्षात्रकर्म बीज

'आब आज जाताहे' राखा भाई हो ! लाज.

शत्रुसंघ पाहता दाट बेछूट शूर होती

शिरा शिरा ताठती, अचाट स्फुरणे संचरती.

समरशूर गर्दीत एक बेधडक भिडुन मिसळे

शत्रुभार संहारकर्म विक्राळ परम चाले.

तुच्छ तनुब्रह्माण्ड चंड संग्रामकैफ चढतो

प्रशंसिता तुंबळ त्वेष लंगडा शब्द पडतो.

डंक्यावरती टिपरी पडली; हुकुम जमायाचा.

चला मराठे चला ! वख्त हा आणीबाणीचा.

हेटकरी मावळे, देशमु, पांडे रणबहिरी,

दरकदार, रामोशि, धारकरि सराईत भारी;

एक एक हंबीर वीर हा वर्णवे न काही

जय करण्याची चिंता अंबा जगदंबा वाही.

स्वधर्मकाव्यज्योति अखंडित तुम्हामुळे जळती,

राख तयांची होती सुरता तुमच्या जर नसती.

प्रबळ शत्रु खेटता तेज ये मुळचे प्रगटोनी

चला दाखवा तया मराठी भाल्याचे पाणी.

धर्मशिळेवर पाय ठेविला तो मागे घेणे

पूर्वजास ते उणे, आपुले हसु होइल तेणे.

पहा पहा ते पितर आपले काय बरे म्हणती-

"आभाळातुन पडला का हो ! तुम्ही धरेवरती ?

"भरीव छात वळीव भुज हे दिले तुम्हा आम्ही

"स्वोदपूर्तीकरिता केवळ आणु नका कामी.

"डोळे वाणी अमुची बघते वदते त्यात तुम्ही

"जीवलतेची नवती अमुची फुलली, तेच तुम्ही.

"स्वप्नाजागरी पडछायेसम आम्ही सांगाते

"करित मोकळे आहो तुमचे विजयाचे रस्ते."

काल बदलला, ध्येय बदलले, पूर्वपुण्य फळले;

अभिनवभारत जन हो ! आता जन्माला आले.

चित्र मागले तुम्हापुढे मी एक उभे केले

ओळख तुमची पटते का हो वदा त्यात पहिले.

चढती दौलत, बढता होवो वेल मराठ्यांचा

जय मराठे ! जय मराठे ! जय बोलो त्यांचा !

नव्या उमेदी, नवे जिव्हाळे, नव्या मराठ्यांचे

नवे भरोसे, नवे कवन हे नव्या उमाळ्याचे


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ
प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …(३)
आला बेगुमान नाही त्याला जाण
शिवाजी राजाच्या करामतिची
त्याशी नाही जाणीव शक्तिची
करील काय कल्पना युक्तिची हा जी जी जी …(३)

महाराजानी निरोप घेतला …(२)
न दंडवत घातला भावानीला
तसाच आई जिजाऊला
वकुत ह्यो वंगळ त्यों कसला
पानी आल आईच्या डोळ्याला
न सरदार लागला रडायला
अहो हे हे हे सरदार तर रडतीलच
पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला
अन गाई बघा लागल्या हम्बराया
असला बेहुद वकुत आला
दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा
अहो राजा हो जी र दाजी र जी जी …(३)

खानाच्या भेटीसाठी ...(२)
महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता
भेटीसाठी छान उभारीला
नक्षीदार शामियान्याला
अन अशा ह्या शामियान्यात
खान डौलत डुलत आला …(२)
सय्यद बंडा त्याच्या संगतीला
शिवबाच्या संगती महाला
म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा
राजाला पाहून खान म्हणतो
आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ
खान हाक मारीतो हसरी …(२)
रोखून नजर गगनी
जी र जी जी …

पण आपला राजा ...(२)
काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता
राजा गोर पहात त्याची न्यारी
चाल चित्याची सावध भारी
जी र जी जी ...

खानान राजाला आलिंगन दिल
अन दगा केला
खान दाबी मानी मान्याला …(२)
कट्यारीचा वार त्यान केला …(२)
गर खरा आवाज झाला
चिलाखत व्हत अंगाला
खानाचा वार फुका गेला
खान यडबडला
इतक्यात महाराजानी
पोटामधी पिसवा ढकलला
वाघनखांचा मारा केला
हे टरटरा फाडल पोटाला
हे तडा गेला खानाचा कोथळा
बाहिर आला जी र जी जी …(३)

प्रतापगडाचे युद्ध जाहले ...(३)
रक्त सांडले पाप सारे गेले
पावन केला क्रुष्णेचा घाट …(२)
लावली गुलामिची हो वाट …(२)
मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …(३)


चित्रपट : मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
गीत : शाहीर अद्न्यातदास
संगीत : सुहास बावडेकर
गायक : नंदेश विठ्ठल उमप