बहिणाबाई चौधरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बहिणाबाई चौधरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अरे संसार संसार

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !

कवियत्री - बहिणाबाई चौधरी

कशाला काय म्हणूं नही ?

बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं|

हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनूं नहीं||

नही वार्‍यानं हाललं
त्याले पान म्हनूं नहीं|

नहीं ऐके हरिनाम
त्याले कान म्हनूं नहीं||

पाटा येहेरीवांचून
त्याले मया म्हनूं नहीं|

नहीं देवाचं दर्सन
त्याले डोया म्हनूं नहीं||

निजवते भुक्या पोटीं
तिले रात म्हनूं नहीं|

आंखडला दानासाठीं
त्याले हात म्हनूं नहीं||

ज्याच्या मधीं नही पानी
त्याले हाय म्हनूं नहीं|

धांवा ऐकून आडला
त्याले पाय म्हनूं नहीं||

येहेरींतून ये रीती
तिले मोट म्हनूं नहीं|

केली सोताची भरती
त्याले पोट म्हनूं नहीं||

नहीं वळखला कान्हा
तीले गाय म्हनूं नहीं|

जीले नहीं फुटे पान्हा
तिले माय म्हनूं नहीं||

अरे, वाटच्या दोरीले
कधीं साप म्हनूं नहीं|

इके पोटाच्या पोरीले
त्याले बाप म्हनूं नहीं||

दुधावर आली बुरी
तिले साय म्हनूं नहीं|

जिची माया गेली सरी
तिले माय म्हनूं नहीं||

इमानाले इसरला
त्याले नेक म्हनूं नहीं|

जल्मदात्याले भोंवला
त्याले लेक म्हनूं नहीं||

ज्याच्यामधीं नहीं भाव
त्याले भक्ती म्हनूं नहीं|

त्याच्यामधीं नहीं चेव
त्याले शक्ती म्हनूं नहीं||


- बहिणाबाई चौधरी

मानूस

मानूस मानूस

मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा

गायम्हैस देते दूध
मतलबासाठीं
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालये
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

पेर्ते व्हा

पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
आभायात गडगड,
बरस बरस
माझ्या उरी धडधड!

पेरनी पेरनी
आता मिरुग बी सरे.
बोलेना पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनी.
ढोराच्या चारनी,
कोटी पोटाची भरनी


कवियत्री - बहीणाबाई चौधरी