बालगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बालगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गाडी

घडाडधड खड खड खड
झुक झुक गाडी चालली
दोहीकडे झाडं पहा
कशी पळू लागली

खडाडखड धड धड धड
किती हिची गडबड
गप्प बसणं माहीत नाही
सारखी हिची धडपड

सों सों सों सों वारा येतो
डोळयात जाते धूळ
वेडयासारखी पळत सुटते
लागलंय हिला खूळ

दंगा करीत शिट्टया फुंकीत
गाडी सुटते पळत
तरी हिला मुळीच कसा
मार नाही मिळत?

साबणाचे फुगे



जादूची बाटली
त्याच्यात पाणी
फुगे आत
ठेवले कोणी?

काडीवर बसून
बाहेर येतात
रंगीत झगे
बघा घालता

वार्‍यावरती
होतात स्वार
किती मजेचे
रंगतदार

हात लावता
फट्ट फुटले
बघता बघता
कुठे पळाले?

जिराफदादा जिराफदादा
खरंच का रे
उंच मान करून
मोजतोस तारे?

द्वाडपणा केलास
बाप्पानं धरला कान
म्हणून का उंटदादा
वाकडी झाली मान?

चित्तेदादा चित्तेदादा
काळे डाग कसे
शाईने अंगावर
पाडलेस का ठसे?

चिऊताई

चिऊताई चिऊताई
चिंव चिंव चिंव

मी पुढे पळते
तू मला शिव

टुण टुण टुण
चल मार उडी

चल आपण खेळू
दोघी फुगडी

भुर्र भुर्र भुर्र
उडून नको जाऊ

चल ये खेळू
देते तुला खाऊ

लवकर उठ
बघ आली माऊ

पटकन पळ
तुझाच होईल खाऊ


माकडदादा माकडदादा
हूप हूप हूप
उडया चला मारुया
खूप खूप खूप
ससेभाऊ ससेभाऊ
पैज लावू चला
पहा कसा धावतो
हरवा पाहू मला!

बेडूकराव बेडूकराव
नका मारू बुडी
तुमच्याहून बघा
लांब मारीन उडी
हसता काय सारे
मारीत नाही गप्पा
दुध पितो म्हणून
जोर देतो बाप्पा

कवियत्री: माधुरी भिडे

घरटा

चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?

कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?

नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी

कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?

नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही

कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?

नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?

आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?

गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला

चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?

काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला

चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?

पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा

जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला

राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना

कवी - बालकवी

फुलपांखरूं

फुलपांखरूं !
छान किती दिसतें । फुलपाखरूं

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं

पंख चिमुकलें । निळेजांभळे
हालवुनी झुलतें । फुलपांखरूं

डोळे बरिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं

मी धरुं जाता । येई न हाता
दूरच तें उडते । फुलपांखरूं

कवी- ग.ह.पाटील

मी जर राजा झालो

मी जर झालो एक दिवस
सारेजण हुकुम मानतील माझा
सर्वांना माझा एवढा वाटेल धाक
ऐकतील निमूट मुठीत धरून नाक!

आईला म्हणेन, जेवण नको वाढू
उघड सारे दबे, काढ चिवडा-लाडू!

ताईला म्हणेन, आरशात नको पाहू
उटसूट सिनेमातली गाणी नको गाऊ!

दादाला म्हणेन, घोळवीत शीळ
मिशीला उगीच भारू नको पीळ!

बाबांना म्हणेन, बाजारात जाउन
माझ्यासाठी छानसा स्कूटर या घेउन!

मुलांना म्हणेन तुम्ही पतंग उडवा
गुरूजींना म्हणेन, तुम्ही गणित सोडवा!

मी जर झालो एक दिवस राजा
खरे सांग बारे, किती येइल मजा!

- शांता शेळके

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय ....

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय...
आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय...
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय

नसतो कुठला होमवर्क न असतो कुठला त्रास
ऑफिस मधुन आल्यावर नसतो कुठला क्लास
घरी येउन आरामात टी . व्ही . पहात रहायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

सगळे असतात फ़्रेंड आणि टिचर कुणीच नसतात
चॉकलेट देणार् या काकानां बाबा बॉस म्हणतात
छान छान बॉस कडुन रोज चॉकलेट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

कॉमप्यूटरवर बसुन कसल काम करतात ?
कॉमप्यूटरवर तर नुसतेच गेम असतात
रोज रोज गेम खेळुन टॉप स्कोरर व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

ऑफिसमध्ये जाउन भरपूर मज्जा करतात
तरीच बरं नसल तरी ऑफिसला जातात
ऑफिसला जाउन मला पण खेळायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

ऑफिसच्या रिसेस मध्ये हॉटेल मध्ये जातात
हॉटेल मध्ये जाउन मस्त चमचमीत खातात
बरगर , पिज्झा , फ़्राईस आणि आईसफ्रूट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

महिन्याच्या शेवटी ह्यांना केवढे पैसे मिळतात !
देव जाणो येवढ्या पैशांच हे काय करतात ?
मला तर महिन्याला फक्त एकच खेळण घ्यायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय ....

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय ....

वेडा बाळू

"शाळेत नाही जाणार,
येतं मला रडू
आई मला शाळेत
नको ना धाडू!"

कोण बरं बोललं,
रडत हळूहळू
दुसरं कोण असणार?
हा आमचा बाळू.

आई मग म्हणाली:
शहाणा माझा राजा
शाळेत गेलास तर,
देईन तुला मजा.

घरी बसलास तर,
हुशार कसा होशील?
बाबांसारखा कसा,
इंग्लंडला जाशील?

आपला रामा गडी,
शाळेत नाही गेला
म्हणून भांडी घासावी,
लागतात ना त्याला?

तू कोण होणार?
डॉक्टर का गडी?
बाबांसारखी ऐटबाज
नको तुला गाडी?

मुसमुसत बोलला,
बाळू आमचा खुळा

"होईन मी गडी,
नको मला शाळा."

ताई

ताई म्हणे मोठी
आणि मी म्हणे लहान
जिथे तिथे जेव्हा तेव्हा
ताईचाच मान

नवीन पुस्तकं ताईला
पेन्सिल पण तिलाच
किती मोठी झाले तरी
मी लहान सदाच!

ताई सारखी मोठी होणार
नवे फ्रॉक तिला
"बरोब्बर" होतात म्हणे
जुने फ्रॉक मला

अस्सा अगदी राग येतो
पण उपयोग काय होणार?
अगदी म्हातारी झाले तरी
मी लहानच राहणार.

परी

परी असते गोरी
परी असते खरी
परीच्या गळयात असते
सोन्याची सरी

परी हासते गालात
परी नाचते तालात
परी अशी चालते
आपल्याच तोर्‍यात

परी असते इवली
चिमणीशी भावली
अंग तिचे मऊ जणू
साय असे लावली

काल मला दिसली
खिडकीमध्ये बसली
खरं सांगते परी
मला बघून हसली

मोठी झाली म्हणजे

मोठी झाले म्हणजे
होणार मी आई
मंडळात जायची
सारखी माझी घाई

मोठी झाले म्हणजे
मी बाई होणार
चष्म्यावरून अश्शी
रागानं पाहणार

मोठी झाले म्हणजे
होईन भाजीवाली

म्हणेन "घ्या हो घ्या हो.
ताजी भाजी आली."

मोठी झाली म्हणजे
बोहारीण मी होईन
नव्या छान भांडयांनी
पाटी माझी भरीन

नकोच पण मोठी व्हायला
लहानच मी राहणार
मोठेपणी सारखा सारखा
खाऊ कसा मिळणार?

शाळेत गेलं माऊचं पिल्लू....

माऊचं पिल्लू गोडुलं
शाळेत एकटंच गेलेलं

बॅग, टिफिन नव्हतं नेलं
मजेत खेळत बसलेलं

टीचर म्हणाली - "हे रे काय ?
अस्से शाळेत चालणार नाय
आईला जाऊन सांग नीट
सारं कसं हवं शिस्तीत.."

"आई आई ऐकलंस काय
बॅग, टिफिन, बूट न टाय
हेच नाही तर बरंच काय"

"माहित आहे सगळं मला
उद्या देईन सगळं तुला.."

जामानिमा सगळा करुन
ऐटीत निघाले पिल्लू घरुन

सुट्टीत जेव्हा टिफिन उघडला
वर्गात एकच गोंधळ माजला

उंदीरमामा निघाले त्यातून
पळाले सगळे ईई किंचाळून

शाळेला आता कायमची बुट्टी
पिल्लाची घरात दंगामस्ती

माऊच्या डोळ्यावर छान सुस्ती
डब्याची संपली कटकट नस्ती....