aarti prabhu लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
aarti prabhu लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ही निकामी आढ्यता का?

ही निकामी आढ्यता का? दाद द्या आणि शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरीतो का? चोरीता का व्हाहवा

मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली
न्या तुम्ही गाणे घराला फुल किवा पाकळी

दाद देणे हे ही गाण्याहून आहे दुर्घट
गुंफणे गजरे दवांचे आणि वायूचे घट

नम्र व्हा अन सूर जाणा जीवघेणा रंग हा
साजरा उधळून आयु हो करावा संग हा

चांदणे पाण्य्तले की वेचीत येईल ही
आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही

ना परंतु सूर कोण लावीत ये दिपसा
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा


कवि - आरती प्रभू

आसवांचा येतो वास

कसे कसे हसायाचे
हसायाचे आहे मला

हासतच वेड्या जीवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे
कुठे? कुठे आणि केव्हा?
कसे आणि कुणापास?
इथे भोळया कळयांनाही
आसवांचा येतो वास

गीतकार :आरती प्रभू
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

नक्षत्रांचे देणे

गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निमार्ल्य, आणि पानांचा पाचोळा


कवी / गीतकार : आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें
गायिका  : आशा भोसले
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर

सप्रेम द्या निरोप

तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे
निद्रीस्त शांतकाय आता पडून आहे
गुंफून शेज त्याची हळूवार पाकळ्यांनी
हा वेल मोगय्राचा पानी मिटून आहे
अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला
सारा गुलाब आता रोखून श्वास आहे
जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे
अस्फुट गीत मंद हूरहूर बोलताहे
वनवेळू वाजताहे एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी निश्वास टाकताहे
वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे
बोले अखेरचे तो: आलो ईथे रिकामा
"सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे"


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

नाही कशी म्हणू तुला

नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परी सारे हलक्याने आड येते रीत
नाही कशी म्हणू तुला, येते जरा थांब
परी हिरव्या वळणांनी जायचे ना लांब

नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परी नीट ओघळेल, हासतील कोणी
नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परी नको अधरांचा, मोडू सुमडाव

नाही कशी म्हणू तुला, जरा लपू छपू
परी पाया खडे कांटे, लागतात खुपू
नाही कशी म्हणू तुला, विडा रे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी


गीतकार :आरती प्रभू
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर.

तू

तू तेव्हा अशी,
तू तेव्हा तशी,
तू बहराच्या बाहूंची.

तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.

तू काही पाने,
तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची.

तू नवी जुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या गं डोळ्यांची.

तू हिर्वीकच्ची,
तू पोक्त सच्ची,
खट्टीमिठ्ठी ओठांची.

तू कुणी पक्षी:
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

जाईन दूर गावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

दु:ख ना आनंदही

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.

एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.

प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.

याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें