shanta shelke लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
shanta shelke लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

माझा घोडा

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !

सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !

- शांता शेळके

मी जर राजा झालो

मी जर झालो एक दिवस
सारेजण हुकुम मानतील माझा
सर्वांना माझा एवढा वाटेल धाक
ऐकतील निमूट मुठीत धरून नाक!

आईला म्हणेन, जेवण नको वाढू
उघड सारे दबे, काढ चिवडा-लाडू!

ताईला म्हणेन, आरशात नको पाहू
उटसूट सिनेमातली गाणी नको गाऊ!

दादाला म्हणेन, घोळवीत शीळ
मिशीला उगीच भारू नको पीळ!

बाबांना म्हणेन, बाजारात जाउन
माझ्यासाठी छानसा स्कूटर या घेउन!

मुलांना म्हणेन तुम्ही पतंग उडवा
गुरूजींना म्हणेन, तुम्ही गणित सोडवा!

मी जर झालो एक दिवस राजा
खरे सांग बारे, किती येइल मजा!

- शांता शेळके

मैत्रिण

स्वप्नातल्या माझ्या सखी
कोणते तुझे गाव?
कसे तुझे रंगरुप
काय तुझे नाव?

कशी तुझी रितभात?
कोणती तुझी वाणी?
कसे तुझ्या देशामधले
जमीन, आभाळ, पाणी?

लव्ह्याळ्याच्या मुळांतून
झिरपताना पाणी
त्यात पावले बुडवून तू ही
गुणगुणतेस का गाणी?

सुगंधित झुळका चार
केसांमध्ये खोवून
तू ही बसतेस ऊन कोवळे
अंगावर घेऊन?

काजळकाळ्या ढगांवर
अचल लावून दृष्टी
तू ही कधी आतल्याआत
खूप होतेस कष्टी?

कुठेतरी खचित खचित
आहे सारे खास,
कुठेतरी आहेस तू ही
नाही नुसता भास.


कवियत्री - शांता शेळके

कविता

शेवटची ओळ लिहीली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत....

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत,
अनुभवणारी एका उत्कट नात्याची
परिणती विपरीत

ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!


कवियत्री - शांता शेळके