देवांनो..!

या इकडे अन माझ्यासोबत जरा बसा रे देवांनो..
ही धर्माची लफडी सोडा..जरा हसा रे देवांनो !

मंदिर-मस्जिद करता करता माणूस पागल झाला..
हृदयी त्याच्या तुम्ही एकदा जरा धसा रे देवांनो !

कुणी ओढतो रेष मधे अन..देश वेगळा होतो..
त्या रेषेचे घाव मनातून जरा पुसा रे देवांनो !

इथला सैनिक, तिथला दुश्मन.. अर्थ बदलतो सारा..
रंगासोबत न्याय बदलतो.. असा कसा रे देवांनो ?

'तो' येण्याची पुन्हा नव्याने बोंब कशाला मारू ?
सांगून सांगून थकला माझा खुळा घसा रे देवांनो !



कवी - ज्ञानेश वाकुडकर

रडू नका बापू..!

बकरी तुमची खतम केली..आम्ही कापू कापू
रडू नका बापू आता.. रडू नका बापू !

काळ आता बदलून गेला.. गणितं ही न्यारी
बापू तुम्ही समजून घ्याहो..खरी दुनियादारी !
माल दिसल्याशिवाय हल्ली..पिकत नाहीत शेते
कमिशनच्या विना बापू हसत नाहीत नेते !
गब्बर झालेत हपापाचा माल ढापू ढापू !
रडू नका बापू..आता रडू नका बापू !!

बघा बघा बापू कुठे निघाला जमाना
चरखा सोडा , पंचा सोडा..'हायटेक' व्हाना !
काहीतरी करू बापू..हुशारीने वागू
सरकारकडे तुमच्यासाठी कोळसा खदान मागू !
तुम्ही फक्त हो म्हणा..मिळून नोटा छापू..
रडू नका बापू असे..रडू नका बापू !



कवी - ज्ञानेश वाकुडकर

'पाली','मुंग्या' आणि 'आपण'..!

मेघांचे फसवे वादे.. हा फसवा फसवा वारा
हा पाऊस खोटा खोटा .. ह्या फसव्या फसव्या धारा
ही बंजर बंजर राने.. ही पंजर पंजर पाने
मातीच्या गर्भामध्ये.. पाण्याविन कुजले दाणे
सुकली धरणे, ठणठण विहिरी.. अजून फोडती टाहो
'पालींच्या' मुतण्याला मी..पाऊस म्हणावा काहो?

ही संदूक संदूक सत्ता..हे बंदूक बंदूक नेते
'द्यूत' नाही खेळलो तरीही.. 'शकुनी'च अजूनही जेते!
मग अवती भवती भिंती.. ह्या सवती सवती भिंती
एखादी तुटता तुटता .. डझनानी उगवती भिंती!
घरात भिंती, ऊरात भिंती..अंगण शाबूत राहो
पालींच्या मुतण्याला मी .. पाऊस म्हणावा काहो?

ह्या भजल्या भिजल्या 'मुंग्या'..ह्या विझल्या विझल्या 'मुंग्या'
प्रलयाच्या असल्या वेळी.. ह्या घोरत निजल्या 'मुंग्या'
ह्या टपल्या टपल्या 'पाली'..ह्या लपल्या लपल्या 'पाली'
भिंतीवर फोटो मधुनी.. ह्या आम्हीच जपल्या 'पाली'
'मुंगी' 'मुंगी' पुन्हा जागवू ..सोबत माझ्या याहो
पालींच्या मुतण्याला मी .. पाऊस म्हणावा काहो?




कवी - ज्ञानेश वाकुडकर

विसरत चाललेलं बालपण...


उंच उंच इमारतीत हरवलेलं बालपण...
पुस्तकांच्या बोझा खाली दाबलेलं बालपण...
मैदाना पेक्षा जास्त,
कॉम्पुटर मध्येच गुंतलेलं बालपण...
अन हळू हळू,
नात्यान पासून दूर चाललेलं बालपण...

समुद्र किनारी बुडणारा तो सूर्य न पाहिलेलं बालपण...
मित्रांच्या खांद्यावर डोकं ठेवून न बसलेलं बालपण...
मित्रांमध्ये कधीच न रमलेल बालपण...
अन पडत्या त्या पाऊसात,
त्यांच्याच बरोबर,
कधीही न खेळलेलं बालपण...

सार्यांच्याच अपेक्षा ऐकत आलेलं बालपण...
अपेक्षांन खालीच दाबत चाललेलं बालपण...
आयुष्याच्या खड्डतर वाटेवर, एकटच पडलेलं बालपण...
अन ह्या सार्यान मध्ये...
स्वःताच स्वतःला ,
विसरत चाललेलं बालपण...
स्वताःच स्वतःला ,
विसरत...
... चाललेलं...
... बालपण ...


कवी - ह्रषिकेश व्हटकर

हे लाघवी खुलासे..

हे लाघवी खुलासे..आले तुझे थव्याने..
देतेस का कबुली..पुन्हा अशी नव्याने ?

घडले असेल काही..अंधार जाणतो ना..
दावू नये हुशारी..बेकार काजव्याने !

हंगाम पेरण्याचा होता कुठे परंतू..
आधीच चिंच खावी का गे तुझ्या मनाने ?

साधेच बोलतो मी..त्याचाच 'वेद' होतो..
समजेल ना तुलाही..सारे क्रमाक्रमाने !

आहे तसे असू दे..होते तसे घडू दे..
हा श्वास चालतो का..तुझिया मनाप्रमाणे ?
 
 
कवी - ज्ञानेश वाकुडकर

शेवटी...!

'हेच' चाले पहा शेवटी..
'तेच' झाले पहा शेवटी !

सभ्य मी, संत मी, चांगला..
लोक 'साले' पहा शेवटी !

शब्दकोशात नाही मजा..
हे कळाले पहा शेवटी !

ज्या घरासाठि भांडायचो..
ते जळाले पहा शेवटी !

शेवटी काय सारे 'झिरो'..
'ते' म्हणाले पहा शेवटी !

कैकदा मी मला पेरले..
पिक आले पहा शेवटी !


कवी - ज्ञानेश वाकुडकर

अहवाल..!

हे हळूच किलकिलती ..झोपेचे दरवाजे..
हा श्वास म्हणावा की..आभास तुझे ताजे ?

उजवे, डावे, मागे..सारेच बुरुज गेले..
किल्ल्यात फितुरीचे हुंकार कसे वाजे ?

हे युद्ध कुणी जिंको..हे युद्ध कुणी हारो..
कानून तुझा चाले..आम्ही कसले राजे ?

सारेच तुझे आहे..अहवाल पहा ताजा..
जोडून तुझ्यापुढती..बघ नाव दिसे माझे !

आभाळ उडाले का ? वाराच तसा आला..
रेषेतून जगण्याचा..इतिहास कुठे गाजे ?

झाले ते झाले ना..तू लोड नको घेवू..
मुर्खाला सांग जरा..का गाल तुझा लाजे..?


कवी - ज्ञानेश वाकुडकर