'पाली','मुंग्या' आणि 'आपण'..!

मेघांचे फसवे वादे.. हा फसवा फसवा वारा
हा पाऊस खोटा खोटा .. ह्या फसव्या फसव्या धारा
ही बंजर बंजर राने.. ही पंजर पंजर पाने
मातीच्या गर्भामध्ये.. पाण्याविन कुजले दाणे
सुकली धरणे, ठणठण विहिरी.. अजून फोडती टाहो
'पालींच्या' मुतण्याला मी..पाऊस म्हणावा काहो?

ही संदूक संदूक सत्ता..हे बंदूक बंदूक नेते
'द्यूत' नाही खेळलो तरीही.. 'शकुनी'च अजूनही जेते!
मग अवती भवती भिंती.. ह्या सवती सवती भिंती
एखादी तुटता तुटता .. डझनानी उगवती भिंती!
घरात भिंती, ऊरात भिंती..अंगण शाबूत राहो
पालींच्या मुतण्याला मी .. पाऊस म्हणावा काहो?

ह्या भजल्या भिजल्या 'मुंग्या'..ह्या विझल्या विझल्या 'मुंग्या'
प्रलयाच्या असल्या वेळी.. ह्या घोरत निजल्या 'मुंग्या'
ह्या टपल्या टपल्या 'पाली'..ह्या लपल्या लपल्या 'पाली'
भिंतीवर फोटो मधुनी.. ह्या आम्हीच जपल्या 'पाली'
'मुंगी' 'मुंगी' पुन्हा जागवू ..सोबत माझ्या याहो
पालींच्या मुतण्याला मी .. पाऊस म्हणावा काहो?




कवी - ज्ञानेश वाकुडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा