भल्या पहाटे निघून आले !

सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले !
घरातुनी चोरपावलांनी लपून आले.. जपून आले !

तुझ्याच स्वप्नात रात गेली…तुझ्याच स्वप्नात जाग आली…
तुझ्याच स्वप्नात जागणा~या जगातुनी मी उठून आले !

विचारले मी न अंबराला.. विचारले मी न वारियाला …
तुझ्या मिठीचा निरोप आला- मिठीत मी मोहरून आले !

अताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला
आताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले

गडे मला बोलता न आले, कुणीकुणी बोललेह नाही…
अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले !


कवी - सुरेश भट

अबोलाही तिचा बोलून गेला!

अबोलाही तिचा बोलून गेला!
मला काही तरी सुचवून गेला!!

कसा मी वेंधळा इतका कळेना;
मला जो तो पहा हटकून गेला!

जरासे दार झाले किलकिलेसे....
नको तो आत डोकावून गेला!

जणू मी झाड जे रस्त्यामधोमध!
मला रस्ता स्वत: छाटून गेला!!

न पासंगासही माझ्या पुरा तो....
तरी टेंभा किती मिरवून गेला!

फळांनी मी लगडलो....चूक झाली!
दगड जो तो मला मारून गेला!!

फुले तोडून गेला....दु:ख नाही!
पहा काटेच तो पसरून गेला!!

पहा लोंढाच आला सांत्वनांचा....
जखम प्रत्येक अन् भिजवून गेला!

निसटला भोवऱ्यामधुनी जरी तो;
किनारा शेवटी बुडवून गेला!

दऱ्या बाजूस दोन्ही, बिकट रस्ता....
सुरक्षित जो मला घेऊन गेला!

विचारांचा जथा आला अचानक!
मनाला पार भंडावून गेला!!

न इतके दु:ख ग्रीष्माच्या झळांचे!
मला पाऊस वेडावून गेला!!

मतांची भीक मागायास आला...
हरेकालाच गोंजारून गेला!

खिरापत वाटुनी आश्वासनांची;
गरीबांनाच तो चकवून गेला!

किती पेरून साखर बोलला तो!
शिताफीने किती फसवून गेला!!

अशी बरसात शेरांचीच केली!
सभेला चिंब तो भिजवून गेला!!

न केले काय गझलेस्तव तयाने?
उभे आयुष्य तो उधळून गेला!

गझलसम्राट ना झाला उगा तो!
गझल जगला, गझल पेरून गेला!!


कवी - प्रा.सतीश देवपूरकर
वृत्त - मृगाक्षी
लगावली - लगागागा/लगागागा/लगागा

माझिया डोळ्यात आसवे जगाची

माझिया डोळ्यात होती आसवे साऱ्या जगाची!
शेवटी साऱ्या नद्यांना ओढ असते सागराची!!

पावसाळी या हवेला मी तरी भुलणार नाही!
मी दिले सोडून आता वाट बघणे पावसाची!!

चार दिवसंचीच असते रोषणाई उत्सवाची!!
रोज थोडी रात्र येते, पौर्णिमेच्या चांदण्याची?

गारव्याला माझिया होते विषारी साप सुद्धा!
जिंदगी माझी जणू होती सुगंधी चंदनाची!!

पाय आपोआप माघारी घरी परतायचे हे.....
केवढी गोडी मनाला रेशमी या बंधनाची!


कवी - प्रा.सतीश देवपूरकर

नाहूनिया उभी मी ...........

नाहूनिया उभी मी सुकवित केस ओले
वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले.

अवकाश भारलेला माझे मला न भान,
अनिवार एक होती ओठावरी तहान
श्वासाचिया लयीत संगीत पेरलेले.........

साधुनी हीच वेळ ;आला कुठून वारा
सुखवित फूल त्याने लुटला पराग सारा
मग होय चंदनाचे; आस्तित्व तापलेले...........

दाही दिशात तेंव्हा आली भरून तृप्ती
अथांग तेवणारी होई निवांत ज्योती
येई न सांगता जे असले घडून गेले.........


कवी - सुधीर मोघे

घननीळ

घननीळ सागराचा घननाद येतो कानी
घुमती दिशा दिशात लहरीमधील गाणी

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत

आकाश तेज भारे माडांवरी स्थिरावे
भटकी चुकार होडी लाटात संथ धावे

वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा

जलधीबरोबरीचे आभासमान नाते
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे

सांनिध्य सागराचे आकाश पांघराया
परी साथ ना कोणाची अस्तित्व सावराया


कवी - विंदा करंदीकर

घाबरू नकोस

घाबरू नकोस
दारावरची अवेळी टकटक ऐकून
बघ दार उघडून…
अनाहूत अंगणात येऊन नाचणारा
मोर असेल कदाचित…किंवा
शेकडो वर्षांपूर्वी उगवता उगवता
जमिनीत गाडल्या गेलेल्या इच्छांमधून
उमललेल्या अनाम फुलांचा गंध असेल..!
किंवा असेल थकून परतलेला पक्षी
आकाश जाणण्याची इच्छा
व्यर्थ वाटायला लागली असेल त्याला
तुझ्या आस-याला आला असेल..!
किंवा असेल सकाळचं कोवळं ऊन
समुद्राच्या लाटांवर नाचून
काही निरोप द्यायला आलं असेल
दुपारच्या उन्हाची दाहक नजर चुकवून
रात्र व्हायच्या आत तुला भेटावं म्हणून आलं असेल..!
गोंधळू नकोस…
परकं कोणी नसेल तिथे…
शाश्वत सुख मिळवण्याच्या भ्रमात
लाख नाकारशील तू
अंतरंगी निनादणारी बासरीची धून
प्रतिध्वनी होऊन, परतत राहील ती पुन्हा पुन्हा
बंद दरवाजावर टकटक करत राहील
तू दार उघडेपर्यंत..!


कवी - आसावरी काकडे

एकटं

माती बाजूला सारत
उगवून येताना

आणि नि:संगपणे
गळून पडताना

अगदी एकटं असावं
दु:खागत निमूट गळणा-या
पागोळ्यांकडे
कुणी पाहात नसावं !


कवियत्री - आसावरी काकडे