नको येऊ तू!

नको येऊ तू:
कारण की ही सुकली सुमने;
सुगंध सारा ओसरला गऽ !
झाडावरली झडली पाने,
कोकीळ गीतच विस्मरला ग!
नको येऊ तू !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कधी रे आता?

राजसा माझ्या
प्रीतीनंऽ येशील
मला तू हौशीनं घेशील
- कधी रे आता ?

अंगणी लावू
तुळशीच्या पंक्ती
सख्या रे! लावू शेवंती!
- कधी रे आता ?

पडावे राया
दो पैसे गाठी
निघावं बाजारासाठी!
- कधी रे आता ?

जरीची घ्यावी
तू साडी-चोळी
हसावी मी साधी भोळी!
- कधी रे आता ?

सराव्या केव्हा
या आटाआटी
रुसावंऽ मी गोफासाठी!
- कधी रे आता ?

भरावं राया
मी सारंऽ पाणी
हसावं मी राजसवाणी!
- कधी रे आता ?

अन निगोतीनं
फक्त तुझ्याखातर
सख्या मी भाजावी भाकर!
- कधी रे आता ?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

नाही आनंद पहिला

नाही आनंद पहिला गऽ
नाही आनंद पहिला!

मेघामधून
गेली निघून
स्वच्छंद चपला गऽ
नाही आनंद पहिला!

झाली सूनी
प्रीती जुनी
निर्व्देव्द विमला गऽ
नाही आनंद पहिला!

माझा तुझा
आता दुजा
मी छंद लिहिला गऽ
नाही आनंद पहिला!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तू !

निम्न्गोरी अंगकांती, उंच आहे तुझा बांधा
जादुगरी तुझा धंदा.

या बटा आल्या कपाळी, मुक्त काळी तुझी वेणी;
सौम्यासाधी तुझी लेणी.

या उभारी भोवयांची रम्य जोडी उभी काळी;
रम्य कुंकू तुझ्या भाळी.

आदराचे सौम्य हसू आणि नाही बरे भोळे;
भावगर्भी तुझे डोळे.

भाषणे अत्यंत साधी अर्थ नाही तरी साधा!
तू जणू की सखी राधा!

सप्त सुरांची, जनानी मंजुळे गऽ, तुझी प्रीती !
सप्तरंगी तुझी प्रीती !!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

अजून झोपली सखी.. !

थांबल्या पहा कळ्या , उषाही थांबली
अजून झोपली सखी .. पहाट लांबली !

तिचीच वाट पाहते , गोठले धुके
रान रान , पान पान जाहले मुके
तिचे बघून हाय ! सुस्त जाहली घरे
थांबली उडायची अजून पाखरे ...
मनातली मिठी मीही मनात कोंबली !

अजूनही नभात थांबल्यात तारका
घुटमळे अजून चंद्र हाय ! सारखा
फुलात गंध थांबला, मनात प्रार्थना..
प्रभू तरी उठायचा कसा तिच्याविना ?
तिची भुते इथे तिथे अशीच झोंबली !


कवी - ज्ञानेश वाकुडकर

ऋण

तुझ्या शेतात राबून
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात ॥ १ ॥

नाही राजा ओढवत
चार पाउले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर ॥ २ ॥

माझ्या ऐन उमेदीत
माझी गाईलीस ओवी
नको चाबकासारखी
आता फटकारु शिवी ॥ ३ ॥

माझा घालावाया शीण
तेव्हा चारलास गूळ
कधी घातलीस झूल
कधी घातलीस माळ ॥ ४ ॥

अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चिंतीत ॥ ५ ॥

मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे ॥ ६ ॥


कवी - श्री. दि. इनामदार

बाबांचा अचरटपणा

तीन मुले आपापल्या  वडीलांबद्दल बोलत असतात.

पहिला म्हणतो :- माझे बाबा इतके उंच आहेत, इतके उंच आहेत कि ते आरामात जीराफाला कीस करु शकतात'

दुसरा म्हणतो :- 'माझे बाबा उंच आहेइतके त, इतके उंच आहेत कि ते उडत्या हेलीकोपटरला कीस करु शकतात'

तीसरा म्हणतो :- माझे बाबा  खूप उंच आहेत पण ते असला अचरटपणा करत नाहीत.'