काल, आज आणि उद्या

फळाफुलाला आला होता खरोखरच, साजणे
हिवाने अखेर झडला तरु!
क्षणभर खुलले, नंतर सुकले सुधामधुर चांदणे
नको वनवास जिवाचा करु

आणभाक घालून सारखा तुझाध्यास लावला
अबोला हा धरला शेवटी
अनन्य प्रीतिशिवाय जगणे अशक्य झाले मला
आणखी जग हसले भोवती

हसते जग पण अजून आहे मला तुझा भरवसा
तरुला फुटेल, बघ, पालवी
आज जरी अंधार भासतो गगनावर या असा
उद्या बहरेल चंद्रिका नवी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

असाच

वेगळीच जात तुझी;
वेगळाच ताल
तूं अफाट वाट तुझी
एकटाच चाल.

एकटाच चालत जा
दूर दूर दूर
गात गात तूंच तुझा
एकटाच सूर

एकटाच चालत जा
उंच आणि खोल;
बोल आणि ऐक पुन्हा
तूं तुझा बोल.

तूं असाच झिंगत जा
विस्मरून पीळ
तूं असाच फुंकीत जा
अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा
भास तूं तुझेच्;
शांततेत ऐकत जा
श्वास तूं तुझेच.

खोल या दरीत अशा
गर्द साऊलीत
हो निमग्न तूंच तुझ्या
मंद चाहुलीत.


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

काळ्या गढीच्या जुन्या ओसाड भिंतीकडे

काळ्या गढीच्या जुन्या ओसाड भिंतीकडे
आलीस तू एकटी बांधून सारे चुडे

वारा किती मंद गऽ!
होते किती कुंद गऽ!
होता किती धुंद गऽ अंधार मागे पुढे!

काळी निनावी भिती
होती उभी भोवती
वाटेत होते किती काटेकुटे अन खडे!

होऊन वेडीपिशी
आली अवेळी अशी
नाजूक प्रीती तुझी, धारिष्ट हे केवढे!

माझी तुझी चोरटी
जेव्हा मिळाली मिठी
झाले जगाचे कडे माझ्यातुझ्याएवढे.

हुंकारला पारवा
तेजाळला काजवा
हालून गेला जरा काळोख चोहीकडे!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

वाटते लाज रे!

एक होतास रे तू उभा संगती
स्नेहमय सोबती!
आणि होते, सख्या, गूढमय ते अती
दाट तम भोवती!

या तनुभोवती पाश होता तुझा
भाव नव्हता दुजा
कौतुकानेच तू ऐकला, राजसा,
बोल माझा पिसा!

आणि होता तरी ऊर नव नाचरा
नूर लव लाजरा
धुंद होतो उभे दूर एकीकडे
अन्य नव्हते गडे!

काय, बाई तरी, चंद्र आला वारी!
चल, सजणा घरी!

एक झाले सख्या, चंद्रमुख हासरे,
वाटते लाज रे!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

माझी गाणी

दिसेना, आंधळ्यावाणी किती पाहू तरी चौफेर !
जराही स्पर्श होईना, किती घ्यावे तरी मी फेर
पुरे हा छंद, कानोसा कितीदा हरघडी घ्यावा
किती मारू तूला हाका, नको राहू असे बाहेर

मनःसंवेद्य ऐकावे किती हे पंचरंगी सूर!
किती शोधू तरी आता, कळेना हा कुणाचा हूर
उसासे मी किती टाकू ? किती होऊ तरी कष्टी
अघोरी, उष्ण अश्रूंचा निघाला पावसाळी पूर

निळ्या दिग्वर्तुळामध्ये, परत्री अंतराळी दूर -
निघाला चंद्र चंदेरी, उडाला चांदण्यांचा चूर
असे मी पाहिले तेव्हा मला झाला तुझा आभास
वृथा मी पाहिले झाली पुन्हा जागी जुनी हुरहूर!

विझाव्या का बरे आता नभाच्या तेवत्या वाती?
सुचेना मार्ग काहीही ढगाळी आंधळ्या राती
अरेरे हा असा आला तुफानी, उग्र झंझावात
कसे मी आवरू तारू? सुकाणू घे तुझ्या हाती

इथे कोणी पिता-पुत्रे, कुणी आजा, कुणी नातू
कुणी मामा, कुणी भाचा, निराळा मी, निराळा तू
दुरावे हे किती सोसू जगाचे हरघडी आता
इथे या शांत एकांती जीवाला दे जिव्हाळा तू

नको जाऊ, जरी आहे खरी सारी तुझी शंका
चुकीचा, त्याज्य, बेपारी, पहा, आहे तुझा हेका
दिवाण्या, श्रांत चित्ताला जरी केव्हा चुकूनमाकून -
जराशी विस्मृती झाली, तरी तू विस्मरावे का ?

निशेने व्यापिली सारी धरित्री मंत्रामोहाने
पहा, झोपी कसे गेले, सुखात्मे, या दिशा, राने!
उदासी शून्य ही माझी निराशा जागृती आता
हसवी मुग्ध, मायावी, तुझ्या निःशब्द हास्याने

किती मी या झळा सोसू? उन्हाळा उष्ण आहे फार
निवाराही कुठे नाही, कुणी नाही मला आधार
पुढे आता कसा हिंडू? कुठे आहे तरी सिंधू?
कशाने सर्व जन्मांची अघोरी ही तृषा जाणार?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

चिरलांच्छित ही आपुलकी !

चल, भेट निमिषभर, चंद्रमुखी !

कोण, कसा हे
न पुसता ये ;
गोंधळून कर एक चुकी

ओळख, नंतर
पुन्हा दूर कर
कायमचा, बघ, कोण सुखी ?

परतशील तर -
तरी तुझ्यावर
खिळेल माझी नजर मुकी

असा निरंतर
तिरस्कार कर :
तूच तरी पण जीवसखी

शिणले जीवन,
मी धरली पण -
चिरलांच्छित ही आपुलकी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ