बाहुल्यांचा विलाप

दीन बाहुल्या तुम्ही पाहिल्या असतिल जितुक्या आजवरी,
तयांत अमुची हीनावस्था पुरी खरी,
असौख्यसदने अमुचीं वदनें मषी फांसुनी विरुपली,
हाय दुर्दशा कोठुनि आम्हां ही आली !
दिनरजनीभर अति आर्तस्वर काढुनि रडतों दु:खभरें-
“नसतों आलों जन्मा होतें तेंचि बरें !”
पाय बांधुनी वरते करुनी अशा प्रकारें उफराटें,
दारावरतीं लोंबविलेसें आम्हांते;
सरीवर सरी पडतां भारी पर्जन्याच्या जोमानें
अस्वस्थ अशीं असती जेव्हां सर्वजणें.
येता जातां. उचलूनि हाता, त्रस्त माणसें तेव्हां ती
मुखांत अमुच्या अहह चापट्या लगाविती;
हिंदुस्थानी बाया यवनी यापरि आम्हां वागविती;
बरसातीच्या अम्ही बाहुल्या, दीन किती!
मुसळधार तो पाउस पडतो, रविदर्शन होउं नेदी,
मास दोन तिन एकसारखा उच्छादी,
तेव्हां त्याचा अतिशय साचा कंटाळा जो त्यां येई,
तो आम्हाला यापरि भोवतसे पाही!
अहह! अम्हांला पडते, बदला पर्जन्याच्या भोगाया
विपदा, जी आणिती आम्हावरी त्या बाया!
खात चपाट्या, या उपराट्या स्थितींत लोंबत राहुनिया,
त्यांच्या सगळ्या उपमर्दाला साहुनियां
घेणें तोंवर लागे, जोवर हवा स्वच्छ नाही झाली,
शारदीय ती शोभा जों नाही आली !


कवी - केशवसुत
जाति - फटका
- बालबोधमेवा; १ सप्टेंबर १८९८, पृ. १४३

तहान आणि भूक आरंभी नव्हतीं

(अभंग)

तहान आणि भूक आरंभी नव्हतीं,
अन्नमुखें होतीं एक्या ठायीं;
कामाचा विषय नव्हता तो दूरी,
होतीं नरनारी एक्या देहीं;
तेधवां नव्हतें हात आणि पाय,
करायाचें काय त्यांही होतें ?
स्वर्ग आणि पृथ्वी जुळूनियां होतीं,
नव्हतीच खंती तेणेंयोगें.


कवी - केशवसुत
- 'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १२७

कांही स्वकृत वचनें

इहलोकींची कल्पकता
ती तर उद्योगप्रियता                  १

उद्योगांत वेळ ज्याचा नित्य जाई,
त्याला दैव होई अनुकूल            २

उद्योगाची धऱितां कास
होतों आपत्तींचा र्‍हास                ३

हृदयाचा जो निर्धार
सिद्धीचा तो देणार.                  ४

स्वयत्‍नेंच लागतो करुं,
होय तयाचा तो गुरु.                ५

बोल लावितो दैवास,
त्यास म्हणावें कापुरुष ?          ६

आधीं भर बांगड्या करीं,
मग हात कपाळावर मारीं.        ७

स्वमस्तकीं ज्याचा भार
तो नर काहीं करणार.             ८

सिद्धयर्थ सुखें मरणार,
तो नर कांही करणार.             ९

कर्तव्याला देई पाठ,
ती चाले नरकाची वाट.           १०

स्वकीय ज्याला लेखावें,
त्या न कधीं उत्तर द्यावें.           ११

जेथें धर्म जेथें नीति,
तेथें देवांची वसति,                १२

सत्त्वपूर्ण ज्याची वृत्ति,
त्याचीं दैवतें जागती.             १३

पैशासाठीं जीव देई !
त्याचा सौदा सस्ता नाहीं.        १४

पैशासाठीं न्याय टाकी
स्वर्गी शून्य त्याची बाकी.        १५

हृदयांतून न जे बोल
निघती, ते सगळे फोल           १६


कवी - केशवसुत
- 'यथामूल आवृत्ती', १९६७,

तिनें जातां चुंबिले असे यातें!

(ली हंटूच्या “Genny kiss’d me” या चुटक्याच्या आधारें )

“असे कान्ता रोगार्त – या घराला”
असा विद्युत्सन्देश मला आला;
चित्त चिन्ताकुलत होउनी, त्वरेनें
घरीं गेलों मी ग्रस्त संशयानें.            १

मला बघतां, विसरुनी व्यथा गेली,
शेज सोडुनि ती त्वरित पुढे झाली,
मला आलिंगुनि चुम्बिलें तियेंने,
आणि पडली मृत हाय पलार्धानें !       २

मधुर-हरण-व्रत काळ जो तयानें
अहह ! नेली सुन्दरी प्रिया ! तेणें;
शक्ति गेली, मम मति भ्रान्त झाली,
टिके मग का सम्पत्ति ? तीहि गेली !    ३

हीन म्हण तूं मज दीन तसा, काळा !
आणि म्हण कीं त्रासला हा जिवाला;
तरी म्हटलें पाहिजे हेंहि तूतें –
“तिनें जातां चुम्बिलें असे यातें !”       ४


कवी - केशवसुत
जाति - दिंडी
- २५ डिसेंबर १८९६

कांट्यांवाचुनि गुलाब नाहीं

कांट्यांवाचुनि गुलाब नाहीं
हें धर हृदयीं साच
नैराश्याचा मग तुजला
होईल न कधीं जाच !             १

सुखदु:खें हीं मिश्रित ऐशीं
असती नित्य जगांत
सुखाकारणे झटता पडते
दु:ख पहा पदरांत!                २

छायेवाचुनि कधीं प्रभा
कुणी पाहिली काय ?
चित्र होतसे, जेव्हा छाया
प्रभेस मिळुनी जाय !            ३

स्पृहणीय असें काय जगीं
एक असे ? तर प्रीत
हृदयभेदकर फार काय हो ?
तर, तीच हें खचीत !            ४

अविकृत ऐसें नसेचि कांहीं
विकृतिरुप संसार
ओळखुनी हें सोडूनी देई
शोक दु:ख अनिवार !           ५


कवी - केशवसुत
जाति-दोहा
- मासिक मनोरंजन, नोव्हेंबर-डिसेंबर, १८९६,

तत्त्वत: बघतां नामा वेगळा

तत्त्वत: बघतां नामावेगळा । कोण नाही सांगा मजला ।
भिन्न व्यक्तित्व नामाला । नामकरण होतसे ।।
नाम म्हणजे अभिधान । अभिधान म्हणजे जे वरुन ।
धारण केलें, ज्यामधुन अन्त: साक्ष पटतसे ।

भाव शब्दस्पर्शहीन तैसे रुपसगंधावांचुन ।
अतएव ते विषय जाण । इन्द्रियांचे नव्हेत ।।
ही तों वाणी मिथ्या वाटे । कारण पंचविषयांचे थाटें
भाव नटती, खरें खोटें । विचारुनी पाहिजे ।।


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- 'यथामूल आवृत्ती' १९६७, पृ. ४३

गुलाबाची कळी

एका मुलग्यानें
पाहिली कळी,
गुलाबाची कळी बहु गुलजार !
तिला भुलुनियां तो जवळी
गेला, होउनि लंफ्ट फार !
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी बहारदार !            १

मुलगा म्हणे “मी वेंचिन तुला
गुलाबाचे कळी ! सुंदर फार !”
कळी म्हणाली “बोंचिन तुला
नको हात लावूं पहा विचार !”
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी बहारदार !            २

निष्ठुर तो तर वेंचणारच
गुलाबाची कळी ती सुकुमार !
कळीहि त्याला बोंचणारच
असा तिला तो कुठें सोडणार !
हातिं जाणें तिला भाग पडणार !
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी बहारदार !            ३


कवी - केशवसुत
- मासिक मनोरंजन, एप्रिल १८९६