*रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा ऊल्लेख आजपर्यंत फार कमी झाला*
ही गोष्ट फ़ार लोकांना माहिती आहे असे वाटत नाही, वाचनात आली म्हटले तुम्हाला देखील आवडेल वाचायला
त्रिचूर वैद्यनाथन यांनी Working on SELF Realisation ह्या समूहावर एक लिंक सामायिक केली आहे. त्यातील कहाणीचे मराठी भाषांतर सादर करीत आहे.
रामायणातील फारशी माहित नसलेली एक कथा http://ift.tt/2xchNIX
सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसहवर्तमान दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होती. सीतेचा शोध आता संपला होता; ती कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते. आता फक्त सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवून आणण्याचे कार्य बाकी होते; शांततेच्या मार्गाने किंवा प्रसंगी युद्ध करून सुद्धा. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा असते. त्यानुसार हे कार्य आरंभिण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्याचे श्रीरामांनी ठरविले.
झाले, शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरु करण्यात आली. सगळी तयारी झाली पण पूजा सांगण्यासाठी कुणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला. थोडा विचार करून त्यांनी ह्या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजे रावणालाच बोलाविण्याचा निश्चय केला. रावण केवळ एक उत्तम राज्यकर्ताच नव्हे तर प्रखर शिवभक्त, प्रकांड पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम प्रशासकसुद्धा होता. म्हणून श्री रामाने हनुमंताला आज्ञा केली तू असाच सागरावरून उड्डाण करून लंकेला जा आणि रावणाला ह्या विधीच्या पूजनासाठी येण्याची रामाने विनंती केली आहे असा निरोप त्याला दे.
रामाचे ते बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूलाच आमंत्रण करीत होते आणि तेही ह्या पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही. रावण ही असली भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते. पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणापर्यंत पोहोचविण्यासाठी लंकेला वायुमार्गे प्रयाण केले. रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले. ते ऐकून रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले. ते गोंधळून गेले होते, त्यांना ते ऐकून धक्का बसला होता. अयोध्येच्या या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी कां केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते.
मात्र रावणाने आपल्या प्रकांड पांडित्याचा, देवपूजनाचे आमंत्रण न नाकारणाऱ्या ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्याच्या परम भक्तीचा मान ठेवत रामाचे, आपल्या शत्रूचे हे निमंत्रण स्वीकारले आणि तो हनुमंतासोबत रामाकडे आला आणि पूजाविधीच्या तयारीची पाहणी करून तो श्रीरामांकडे वळून म्हणाला, "हे अयोध्येच्या कुमारा, तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस कारण ही प्रतिष्ठापना पती-पत्नी यांनी एकत्र करायची असते. वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तो कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही."
आता सभोवती असलेल्या लोकांचे लक्ष श्रीराम ह्यावर काय उत्तर देतात ह्याकडे लागले - राम काय उत्तर देणार ह्यावर?
अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर दिले, "पूजेमध्ये कसलीही न्यूनता राहू नये यासाठीच तर हे रावणा पूजेचे पौरोहित्य तुला दिलेले आहे. आता ह्यावरील उपायसुद्धा तुलाच सुचवायचा आहे. तू पंडित आहेस. तेव्हा या समस्येवरील उपाय सुचविण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे.
ह्या दोन अतिशय थोर आणि उदात्त अशा राजांमधील धर्मशास्त्रीय चर्चेकडे देवादिकांचेही लक्ष लागून राहिले होते. लंकाधिपती हा एक अतिशय महान राज्यकर्ताच नव्हता, तर तो अतिशय विद्वान सुद्धा होता. तो प्रकांड पंडित होता. रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वान जागृत झाला. रावण म्हणाला, "हे रामा, मी ह्यावर उपाय नक्कीच सुचवू शकतो आणि सुचावीतही आहे कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करू शकला नाही असा आरोप माझ्यावर कुणी करू नये असे मला वाटते. मी सीतेला ह्या धार्मिक विधीसाठी लंकेहून येथे घेऊन यायला तयार आहे, पण माझीही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्याबरोबर लंकेला घेऊन जाईन आणि तू त्यासाठी हरकत घेणार नाहीस."
ह्या दोघांमधील संवाद ऐकणारे आसपासचे सारे लोक चकित होऊन त्यांच्यातील धर्मसंवाद ऐकत होते आणि दोघेही एकमेकांना पुरून उरणारी शास्त्रचर्चा न्याहाळीत होते. आता रावणाच्या या प्रस्तावावर राम काय उत्तर देणार ह्याकडे ते सारे उत्कंठेने पाहू लागले. रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रामाने आपला पूजाविधी अतिशय भक्तिभावाने रावणाच्या हस्ते सशास्त्र उरकून घेतला. त्यानंतर भारतीय परंपरेप्रमाणे रावणाने राम-सीतेला "विजयी भव" असा आशीर्वाद दिला. वास्तविक ह्याचा अर्थ युद्ध झालंच तर ह्या आशीर्वादाने रावणाने स्वतःचा विनाश स्वतःच स्वीकार करणे हा होतो हे माहित असूनही रावणाने परंपरेचाच आदर केला होता. इथेच स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते. आता एकच औपचारिकता शिल्लक उरलेली होती ती म्हंणजे पुरोहितांचा सन्मान.
रामाने रावणालाच विचारले," रावणा, पूजाविधी यथासांग पार पडला. आता आपण आपली दक्षिणा सांगावी." आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता. आजपर्यंत रावणाने कुणाकडूनही अगदी रामाकडूनही कांहीच घेतले नव्हते. नेहमीच केवळ दात्याच्याच भूमिकेत होता. त्याने कुणाकडून कांही दक्षिणा स्वकारण्याचा प्रश्नच नव्हता. पण आज या प्रसंगी रावणातील वैदिक पंडित जागृत झाला होता. दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही. यजमानाला या कारणाने पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहिताकडे जातो हे त्याला ठाऊक होते. तो रामाला म्हणाला,"हे रामा तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. म्हणून दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एव्हढीच मागणी करतो की माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सन्निध असावेस. या व्यतिरिक्त मला अन्य कांहीही नको."
आणि म्हणूनच रावणाचा, युद्धात श्रीरामांच्या अमोघ बाणांच्या आघाताने मृत्यू ओढवला तेव्हा श्रीराम रावणाच्या सन्निध उभे होते. भगवंताच्या सान्निध्यात मृत्यू येणे ह्या सारखे दुसरे पुण्य नाही. रावणाला हे माहित होते. किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता!
विद्यमाने : The Awakening Times
स्त्रोत: Veda Vyasa Ramayana