जेव्हा तुमच्या आयुष्यात संकट सुरू होते, तेव्हा तुमचे सर्व मित्र आणि नातेवाईक तुमच्या पाठीशी उभे राहतील...!


जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर...


तुमचा लग्नाचा अल्बम पहा...!!!

बर्फाच्या कविता

एका अमरत्वाच्या संथपणानें ओघळणारा बर्फाचा पाऊस चिरनिद्रेतील माझ्या प्राक्तनाचे रंग बांधणारा बर्फाचा 
पाऊस. व्योमव्याकुळ अंधारातुन भुरभुरणारा बर्फाचा 
नाद; गात्रागात्रांच्या हांकेवर जमलेले बर्फ-शिल्पाचे मंद अविनाशी स्तूप....
अंधाराच्या प्राणगन सुगंधावर कोसळणारी बर्फाच्या 
थडग्यांची आरास. त्वचेच्या मेण्यांतून उतरणाऱ्या 
चरणांवर वितळणारीं हिमवर्ण शिशिराचीं फुलें.... 
तुझ्या कुशींतील अक्षम्य स्तनांवरून वाहणारे 
चंद्र-वाऱ्यांतील बर्फाचे पराग....
बर्फाच्या मरणकालीन समाधीवरून उजळणारे 
शब्दभांगाराचें दीप ; जशी माझ्या इंद्रियांच्या पार 
वसलेली अर्थसगुणाची नगरी....
अंधाराच्या नशिबांतून सरकणारी बर्फ-उत्सवाची 
यात्रा, जसे तुझ्या पाठीवर ओळीने रचलेले 
प्रकाशाचे मणी....


वाऱ्यालाही जागा मिळू नये अशी बंद खोली. 
बाहेर हिमाचीं वादळें घोंगावूं लागलीं आहेत. 
माझ्या रक्तांतील हाडांचें पाणी होऊन मस्तकाच्या 
दिशेनें वाहतें, असें हें दुःखाचें प्रगाढ चिंतन किंवा


अंधाराच्या पृष्ठभागावर उमटणाऱ्या बर्फाच्या सकंप रेषा
डोळ्यांच्या मागील अंधारांतून येणारें हें वादळ; 
एखाद्या महायात्रेसारखें झाडांना झोंबूं पाहतें, 
जसें या निषिद्ध रात्रीं माझ्या दाराशीं कोणी 
टांगा घेऊन आलें आहे......
वारा येऊंच शकणार नाही या खोलीच्या बंद दाराशीं. पायाखालची फरशी किती थंडगार ! जसें मीच बसून 
असावें माझ्या प्रेताशीं.... या बेवारशी डोळ्यांना 
असेंच सोडून जावें या पुस्तकांच्या सांगातीं; तसें यांचें 
पुढें कोण आहे ? मी जसा बर्फातून आलों तसाच 
बर्फातून जाईन ; रात्रीच्या शेवटच्या प्रहरांतील 
रहदारीसारखा.


दाराच्या एका विदग्ध फेरींत मी अडकलों. 
मावळत्या सूर्याच्या उदासीन किरणांत वितळणाऱ्या 
कुंतीच्या अपरंपार श्वासांसारखी माझ्या पाठीशीं 
येऊन उभी राहिलीस.
बाहेर बर्फाचा पाऊस पडतो आहे. रक्तांतून जाणारे 
अश्रू आणि शिशिरांतील अनिकेत पांखरें 
तुझ्या अस्थींना बिलगतात; मेघांच्या संधिप्रकाशांतील डोळे आणि पर्वतांच्या कांठाशीं थांबलेली रक्तवर्ण 
सायंकाळ....
बर्फाचा पाऊस पडतो आहे; जशी नियतीच्या शब्दांतून 
गळणारी अर्थाची धूळ.... मंत्रांनी भारलेल्या या
खोलीच्या दिशा आणि पाण्याच्या तळांत निजलेले 
घाटांचे ध्वनी.

अंधाराच्या साह्यानें मी जातो आहे : स्मरणांतून 
उमलणाऱ्या आठवणींसारखा. बर्फाचा पाऊस 
पडतो आहे; जसें माझेंच दुःख सचित्र झालेलें..... 
या कोसळल्या दीपमाळेला टेकून तूं तसेंच उभे 
असावेंस, निदान चंद्रमासांतील स्तनांचीं फुलं होईस्तों....

ऊर्मिले च्या कविता

डोळ्यांमधला एक आरसा स्पर्शनि घे आकाश 
मंद जांभळ्या तारेवरती झंकृत हो अवकाश 
सागरवेळा सांज-मठांची सनई ऐकुन घेती 
मुक्या तिरावर पाण्यामधली रंगित पडते रेती.... 
दृष्टीपासुन सजूं लागती मावळतीचीं किरणें
दुःख आपुल्या मिठींत हंसतें जशीं उन्हांचीं वळणे. 
झाडांवरचा मोहर गळतो देह उधळला गेला 
स्मरणयुगांच्या पुढे राहिली दुःखसावळी मिथिला. 
उरीं भरावी किती सघनता जळांत गळती तारे 
कुठून येती इतके हलके तरंग भरले वारे....


या हातानें स्तन गोंदुन घे लाव मंदिरीं दिवा 
फूल होउनी अंधाराचे गळुन पडे काजवा .... 
तूं मरणावर मग रेखावें प्राक्तनगंधी मोती 
कीं डोहांवर किणकिणते गे शतजन्मांची भीती.... 
असुन तुझा मी तुझी दूरता.... तुला झाकितो काल 
सांग ऊर्मिले, कुणी बांधिले नयनीं चंद्रमहाल ? 
रंग उदा की उभा उदासिन महामेघ क्षितिजांत 
पायाखाली वाळवंट मग उगवत ये निमिषांत.... 
लाव मंदिरीं दिवा परंतु सोड स्तनांची माया 
मरणावांचुन आज सजविली मीच आपुली काया....

प्रिस्टस्

तुझ्या पायांतून खेडींच्या खेडी ओस पडावी
तसे हे प्रिस्टस्
एका संध्याकाळी बाहेर जमले पठारावर 
मोकळ्या आकाशांत एखादा तारा उगवेल 
म्हणून पाहण्यासाठीं.
ह्यांच्या डोळ्यांना नाहीत खांचा कीं 
कुठल्याही पाण्याचे अज्ञात तळ..... 
घरटें चुकलेल्या पाखरासारखे उन्मळून 
येतात वेळी अवेळी.
ह्यांच्या शरीराच्या छिद्रांतून
आरपार शिरत असतात घटांचे 
त्रिस्तव्याकुळ नाद.
तेव्हां चपापून पाहूं लागतात है, चौफेर, 
महाशून्यांत....
कुठें दिसतें का म्हणून देवाने घडविलेले 
एखादें हृदय, कर्मानें बांधलेले एखादें घर, 
नाहीतर रक्तमांसाच्या संभोगाला उगवणारें 
शिल्पउदास व्याकुळतेचें एखादें फूल....

वार्ड नं. ६ : आर्थोपिडिक्स

 

गीता रॉयच्या आवाजांतील चाकूचें रेशमी 
झळझळतें पातें ;
असंख्य हाकांच्या आर्तपणाचें अंतःकरणावर 
भुरभुरणारें जावळ
या विझत्या डोळ्यासमोर प्रतिबिंबांना 
तोलून धरणारी केरळी नर्स
तिच्या डोळ्यांत एका क्षणांत दिसतात 
कन्याकुमारीच्या रंगीत सूर्याचे उदयास्त.... 
आमच्या उजव्या पायाची दोन हाडें 
मोडली आहेत.

निव्वळ शारीरिक दुःखाच्या अप्रतिम कळा 
दुष्मनांच्या वाट्याला जाऊं नयेत
म्हणून आम्ही घेतल्या
द्यावेंसें वाटतें या यातनांच्या वैकुंठांत
केरळीं माडांना आलिंगन
कळांचा सर्वस्पर्शी ऑर्केस्ट्रा मेंदूच्या कांचेवर
इन्ग्रिड बर्गमनची आसवांत वाहणारी
प्रतिमा रचून जातो;
उजव्या पायाची दोन हाडे मोडली आहेत आणि
खोलीच्या दाराशीं बावीस सप्टेंबरच्या विसराळू 
संध्येचें बोट धरून केरळी नर्स
तिच्या स्तनांचें मीनाक्षी मंदिर रक्तांतून 
चकाकणारें....
राSSमS-S-S राम-S-S

यह वही दर है जहां आबरू नही जाती....
घोड्यांचा प्रचंड कळप अंधारावर धावून
गेला....
तशा सरकल्या सर्व इमारती.
असा पाऊस कधीं पडला नहता....
दुःखवादी तुझी अभिजात आठवण अंगावर ओव्हरकोट 
घालून स्मशानाकडे जाणारी....

सांज

सांज घराला आली
विश्वाची हलवित काया
मांडीवर मी निजलेला
वर तुझी उदासिन माया.

सांज घराला आली 
रत्नांची गळती नगरें 
कौलांवर चढतिल आतां 
घनदाट तमाचीं शिखरें.

सांज घराला आली 
चरणांची जुळवित वेल 
तूं दीप उजळिले जेव्हां 
प्राणांत उगवलें फूल....

सांज घराला आली 
कुरणांतुन फिरल्या गायी
नक्षत्र मिसळले पाणी 
कंठांतच गोठुन जाई....

रंगास्त

कलंडत्या सूर्याचीं रंगदर्शनें नाहींत
समुद्र नाहींत आणि लाटांचे 
आवाजहि नाहींत.
नारायणीचा विदेही मृत्यू :
त्या रात्रीं झाडांना सोडून जाणाऱ्या
अविनाशी फुलांची झड .... 
झडीच्या विलापांत थडीला
लागलेलीं शिवालयें ....
कित्येक वर्षांपूर्वीच्या श्रावणानें तिच्या
गळ्यांत गोंदलेल्या तुलसी रामायणाच्या
प्रतिमा....
दृष्टीला अतीव कारुण्यानें आंधळे
करणारें धुके पसरत असावें
गाभाऱ्यांत ....
अशा दिशा हरवतात आणि अशा
दिशा उगवतात.
मनाचे सर्व आभास, दुखाच्या एवढ्या
समर्थ वैभवांतही असतात
पराधीन, पोरके आणि सर्वस्वी
अनाथ.