तुझी आठवण

मारव्याचे एकाकी स्वर, मावळतीला सूर्याचा अस्त
बावरलेली संध्याकाळ, गारवा लपेटण्यात व्यस्त

पुन्हा उदास रात्र, थंडीने लागते बहरू
लाजत धुके हळूच, लागते फेर धरू

आखडलेले शरीर, प्रफुल्लित मन
पुन्हा एकाकी मी, सोबत तुझी आठवण

रक्त गोठवणारी थंडी , हातात हात तुझा
घातलेली तु शपथ "तु राहशील फक्त माझा"

कुड्कुडना-या थंडीतली, उबदार तुझी मिठी
उष्ण तुझे श्वास ,फुललेले माझ्यासाठी

दाट पांघरलेले धुके, दवबिंदूची आसवे
थंडीची प्रत्येक रात्र, मी जगतो तुझ्यासवे

आज नाहीस तु, फक्त तुझेच भास
गुलाबी थंडीत तुझ्या, आठवणींचा सहवास

मी जर राजा झालो

मी जर झालो एक दिवस
सारेजण हुकुम मानतील माझा
सर्वांना माझा एवढा वाटेल धाक
ऐकतील निमूट मुठीत धरून नाक!

आईला म्हणेन, जेवण नको वाढू
उघड सारे दबे, काढ चिवडा-लाडू!

ताईला म्हणेन, आरशात नको पाहू
उटसूट सिनेमातली गाणी नको गाऊ!

दादाला म्हणेन, घोळवीत शीळ
मिशीला उगीच भारू नको पीळ!

बाबांना म्हणेन, बाजारात जाउन
माझ्यासाठी छानसा स्कूटर या घेउन!

मुलांना म्हणेन तुम्ही पतंग उडवा
गुरूजींना म्हणेन, तुम्ही गणित सोडवा!

मी जर झालो एक दिवस राजा
खरे सांग बारे, किती येइल मजा!

- शांता शेळके

तो एक बाप असतो…

शाळेपासून बापाच्या धाकात तो राहात असतो,
कमी मार्क पडलेलं प्रगतीपुस्तक लपवत असतो.
आईच्या पाठी लपून, तो बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, तो हुंदडायला जात असतो.

शाळा संपते पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भूलभुलैयात, मन हरखून जात असतं.
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं.

सुरु होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,
एटीकेटीच्या चक्रातून, वर्ष पुढे सरत जातात.
ग्रुप जमतो दोस्ती होते, मारामार्या दणाणतात,
"माझा बाप ठावूक नाही"! म्हणत धमक्या गाजत असतात.

परीक्षा संपते अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या,
नोकरी मिळवत नोकरी टिकवत कमावू लागतो चार दिडक्या.
आरामात पसरणारे बाजीराव, मग घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात मग नेमाने मोहिमा काढू लागतात.

नोकरी जमते छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात.
दोघांच्या अंगणात मग बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्याकोर्या बापाला मग मात्र, जुन्याचं मन कळू लागतं.

नवा कोरा बाप मग पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने आजोबांच्या कायेत शिरतो.
पोराशी खेळता-खेळता दोघेही जातात भूतकाळात,
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान.

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅशबॅक,
बापाच्या भूमिकेतून पोर पाहतो भूतकाळ.
लेकरासाठी मग त्याला कळवळणाराबाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो.

कडकपाणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या, झगडणारं हाड असतं.
दोन घास कमी खाईल, पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या, ओव्हरटाईम तो मारत असतो.

डोक्यावरती उन झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो.
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो.

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही, नि बाप कधी मातत नाही.
पोरं सोडतात घरटं अन्, शोधू लागतात क्षितिजं नवी,
बाप मात्र धरून बसतो घरट्याची प्रत्येक काडी.

पोरांच्या याशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना ते आतून रडत असतं.
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो.
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो.

सारी कथा समजायला फार मोठं वहावं लागतं,
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं.
आकाशाहून भव्य अन्, सागराची खोली असते,
'बाप' या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते.

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बाप माणूस असतो तो, बापाशिवाय कसं कळणार.
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही.

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,
चार ओळीत सांगण्यासारखा, बाप काही छोटा नाही.
सोनचाफ्याचं फुल ते, सुगंध कुपीत मावणार नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग काही लागत नाही.

केला खरा आज गुन्हा, त्याला थोडं शोधण्याचा,
जमेल तेवढं सांगितलं, आधार आमच्या असण्याचा.
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आई मार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही.

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,
पृथ्वी तोलून धरण्यासाठी शेशाचाच लागतो फणा.
बाप नावाच्या पारिजातकाचं, असाच काहीसं जीणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं.

शाळा. . .

शेजारील पिंटुचे,काल मला दप्तर दिसले.
नकळत माझे मन मग,बालपणात गेले!

आठवले सर्वकाही,आठवली ती शाळा.
आठवला तो सुविचार लिहलेला,सुंदरसा फळा!

आठवला तो गणवेश,आठवली ती सॅक.
गळ्यात अडकवलेली,छोटीशी वॉटरबॅग!

आठवली ती प्रार्थना,आठवले ते जनगणमन.
सरळ रांगेत उभे राहण्याची,चाललेली चणचण!

पहिल्या बाकासाठी,झालेला मित्रांशी तंटा.
आठवली ती घणघणारी,मोठी पितळी घंटा!

आठवले ते दिलेले रोज,आईने आठ आणे.
मधल्या सुटटीतल्या खाऊसाठी,चिँच आणि चणे!

आठवला सरांचा तो,पाठीवरचा मारा.
आठवला वहीवरचा तो,लाल अपुर्ण शेरा!

आठवले ते शाळेसमोरील,मैदान स्वरुपी अंगण.
डब्बा खाण्यासाठी केलेले,सवंगड्यांचे रिँगण!

आठवले ते मैदान,आणि PE चा तो तास
फुटबॉल आणि क्रिकेटचा वेगळाच उल्हास!

आठवतात ते पाढे,आणि आठवते ती परिक्षा
कमी मिळाले गुण म्हणुन,केलेली शिक्षा!

आठवतात ते गुरुजी आणि त्या बाई.
मित्रासोबत शाळेत जाण्याची,केविलवाणी घाई!

अशी माझी शाळा,मला बालपणात नेते.
तिच्या आठवणिने डोळ्यात पाणि ठेऊन जाते!

दिलेस तर देवा,एकच वरदान दे मला,
पाठीवरती दप्तर टाकुन,पुन्हा शाळेत जायचय मला..
पाठीवरती दप्तर टाकुन,पुन्हा शाळेत जायचय मला..... .

नास्तिक

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! "

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....


कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे