आनंदाचे डोही

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदची अंग आनंदाचे ॥धृ॥

काय सांगू झाले कांहिचिया बाही
पुढे चाले नाही आवडीने ॥१॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला ॥ ३ ॥

- संत तुकाराम

गणपतीची आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।

सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रें मनकामना पुरती ॥धृ.॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।

हिरे जडित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥जय.॥२॥

लंबोदर पीतांबर फणीवरबंधना।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।

दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥जय.॥३॥


रचना - संत रामदास

पांडुरंगाची आरती

युगें अठ्ठावीस विटेवर उभा ॥
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ॥
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ॥
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ धृ ॥

तुळसीमाळा गळां कर ठेउनि कटी ॥
कांसें पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ॥
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥ जय. ॥ २ ॥

धन्य वेणूनाद अणुक्षेत्र पाळा ॥
सुवर्णाची कमळें वनमाळा गळा ॥
राई रखुमाबाई राणीया सकळा ॥
ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ जय. ॥ ३ ॥

धन्य पुष्पावती भीमासंगम ॥
धन्य वेणूनाद उभें परब्रह्म ॥
धन्य पुंडलीक भक्त निर्वाण ॥
यात्रेसी येती साधु सज्जन ॥ जय. ॥ ४ ॥

ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती ॥
चंद्र्भागेमाजी सोडूनियां देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ॥
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय. ॥ ५ ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती ॥
केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ।। जय . ॥ ६ ॥

शंकराची आरती

लवलवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ कळा त्रिनेत्री ज्वाळा ॥
लावण्य सुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ. ॥

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचे उधळण शीतकंठ नीळा ।
ऎसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव. ॥ २ ॥

दैवी दैत्य सा़गर मंथन पै केलें ।
त्यामाजी अवचीत हळहळ सांपडले ॥
तें त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय. ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनीजन सुखकारी ॥
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ जय देव जय देव ॥ ४ ॥

मारुतीची आरती

जयदेव जयदेव, जय हनुमंता
संकटकाळी तुम्हीच, हो त्राता
भक्तावर व्हावे, त्वा कृपावंता
मिटतील जगती साऱ्याच चिंता
जयदेव जयदेव जय हनुमंता

अंजनी माच्या , परमप्रिय सुता
श्री रामाच्या रे, लाडक्या दूता
तूच सर्वांचाच , असे विघ्नहर्ता
कृपा कर आम्हां त्वरित आता
जयदेव जयदेव , जय हनुमंता

शौऱ्याची तूच, साक्षात देवता
तूच धैऱ्याचा, असे रे जनिता
शरण मनोभावे, तुजला रे येता
देसी अभयदान, तूच सर्व भक्ता
जयदेव जयदेव, जय हनुमंता

सीता माईचा, संकटी तू त्राता
लंका दहनाचा ,तूच असे कर्ता
लंकेच्या नृपा, नमविले पुरता
धन्यता मिळते, वीर हनुमंता
जयदेव जयदेव , जय हनुमंता

सप्त चिरंजीवात, तुझे असे स्थान
असे तुजला रे, मृत्युलोकी मान
नमती तुजला मनोमनी, सर्व जन
मागती तुजला, शक्तीचे वरदान
जयदेव जयदेव, जय हनुमंता

पांडुरंगाची आरती

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥

पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥

विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥

दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥