जुई

पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती
इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती

आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला
ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला

तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते सौम्य चांदणे
जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे नितळ रूप देखणे

कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानांत झाकून घेत
शुभ्र शुचितेची सौजन्यकांती हिरवे लावण्य लेऊन येत

मादकता जाते मार्दवी विरून, सौंदर्य सोज्ज्वळाआड दडते
सोलीव सुखाचे स्वप्नच एक जीवाला जगतेपणी पडते!


कवी - अनिल

माणूस माझे नाव

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...


कवी - बाबा आमटे
कवितासंग्रह - ज्वाला आणि फुले

आठवून पाहायचो मी...

आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .

आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .

जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णतेतही पूर्णत्व शोधणारी. . .

आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .

दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी"

प्रीतिच्या फुला

वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतिच्या फुला रे

तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी
कसा तरी जीव धरी, माझ्या प्रीतीच्या फुला रे

वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनुते
चित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतीच्या फुला रे

माझी छाया माझ्याखाली, तुजसाठी आसावली
कशी करू तुज सावली, माझ्या प्रीतीच्या फुला रे

दाटे दोन्ही डोळा पाणी, आटे नयनांतच सुकुनी
कसे घालु तुज आणुनी, माझ्या प्रीतीच्या फुला रे

प्रीतीवरी विश्वासून, घडीभरी सोसू ऊन
नको टाकु खाली मान, माझ्या प्रीतीच्या फुला रे

मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात
चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतीच्या फुला रे


कवी     -   अनिल
संगीत  -   यशवंत देव
स्वर     -   उषा मंगेशकर
राग     -    खमाज

डोळ्यातून ओतलो इथे.

आज होऊन तमाशा मीच जगलो इथे
राहीलो एकटा सगळ्यास मुकलो इथे.

राहीली ताट मान त्या मोठ्या मनाची
मी तर कणा मोडलेला सदा वाकलो इथे.

आता कुठे सुरवात म्हणे झाली सुखांची
त्या सुरवाती आधीच मी तर संपलो इथे.

होती आशा मला वादळास मिठीत घेण्याची
तीच्या इवल्याशा श्वासात मी गुतंलो इथे.

ना कळाल्या तीच्या भाषा ना कळाल्या दिशा
मी वाट चुकलेला असाच भरकटलो इथे.

मागे वळून पाहता शुन्य होता सोबतीला
दमडीच्या मोलाने भगांरात विकलो इथे.

कोणी आल होत दुःखं विकत घेण्यासाठी
मी घेउन टोपली मग बाजारात बसलो इथे.

हो असच संपल जीवन उद्याच्या प्रतिक्षेत
उद्यासाठी आजचा प्रत्येक क्षण मुकलो इथे.

काल म्हणे तीला खरच माझी आठवण आली
आठवणीत तीच्या मग मीही डोळ्यातून ओतलो इथे.

उघड दार उघड दार

उघड दार उघड दार
प्रियकरास आपुल्या
उघड दार, उघड दार

मध्यरात्रिच्या नभात
शांत चांदणे खुले
पांघरूनी रश्मिजाल
गाढ झोपली फुले

अजुन हा निजे न भृंग
मरंद-गुंगिने भुलून
मंजु गुंजनात दंग
अधिर त्या नको सकाळ
त्या दिशाहि उजळल्या
मध्यरात्रिच्या निळ्यांत
उघड उघड पाकळ्यां


कवी      -    अनिल
संगीत    -   जी. एन्‌. जोशी
स्वर     -    जी. एन्‌. जोशी

फ़क्‍त तुझ्यासाठी

हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
हा दगड पाझरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन
कधी श्वास गुदमरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही मी त्या वाटा चुकतो कधी तरी
तेव्हा रस्ता बदलला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तेव्हां तुला पावसाची ओढ लागे सदा काळी
ग्रीष्मात मेघ बरसला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझी प्रित सदा त्या उसळत्या लाटांवरी
हा किनारा झरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही तु म्हणे लाल हात रंगवतेस कधी
तेव्हां माझा रंग उडाला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

फ़ार मोठा इतिहास तुझ्या छोट्याश्या प्रेमाचा
तो मी शब्दात कोरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

सारच मी जिकंत आलो आजवर पण
मी हा जुगार हरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझ मोठ होण्याच स्वप्नं होत म्हणूनच
हा निवडूंग बहरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी.