आई तुला प्रणाम

वंदे मातरम ----- मराठीत

आई तुला प्रणाम ॥ धृ ॥

सुजल तू, सुफल तू, मलयानिलशीत तू ।
हरीतशस्यावृत्त तू ॥
चांद्रज्योत्सनापुलकित यामिनी ।
उदितपुष्प-लता-वनांनी विभूषिते ॥
सुहासिनी, सुमधूर भाषिणी ।
सुखदा, वरदायिनी ॥ १ ॥ आई, तुला प्रणाम

कोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू ।
कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू ॥
अबला कशी? महाशक्ती तू ।
अतुलबलधारिणी ॥
प्रणितो तुज तारिणी ।
शत्रुदलसंहारिणी, तुला प्रणाम ॥ २ ॥ आई, तुला प्रणाम

तू विद्या, तू धर्म ।
तू हृदय, तू मर्म ॥
तूच प्राण अन् कुडीही ।
तूच मम बाहूशक्ती ॥
तूची अंतरीची भक्ती ।
तुझीच प्रतिमा वसे, हर मंदिरी, मंदिरी ॥
तुला प्रणाम ।
आई तुला प्रणाम ॥ ३ ॥ आई, तुला प्रणाम

तू ची दुर्गा, दशप्रहरणधारिणी ।
कमला, कमलदल विहारिणी ॥
वाणी, विद्यादायिनी ।
तुला प्रणाम, कमले तुला प्रणाम ॥
अमले, अतुले, सुजले, सुफले, आई ।
आई तुला प्रणाम ॥
श्यामले, सरले, सुस्मिते, भूषिते ।
तूच घडवी, पोषी तू, आई ॥ ४ ॥ आई तुला प्रणाम


मराठी रुपांतर - श्री. नरेंद्र गोळे

वृंदावनी वेणू

वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे ।
वेणूनादे गोवर्धन गाजे ॥१॥

पुच्छ पसरूनी मयूर विराजे ।
मज पाहता भासती यादवराजे ॥२॥

तृणचारा चरू विसरली ।
गाईव्याघ्र एके ठायी झाली ।
पक्षीकुळे निवांत राहिली ।
वैरभाव समूळ विसरली ॥३॥

यमुनाजळ स्थिरस्थिर वाहे ।
रविमंडळ चालता स्तब्ध होय ।
शेष कूर्म वराह चकीत राहे ।
बाळा स्तन देऊ विसरली माय ॥४॥

ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती ।
बाकी रुणझुण रुणझुण वाजती ।
देव विमानी बैसोनी स्तुति गाती ।
भानुदासा पावली प्रेम-भक्ति ॥४॥


रचना – संत भानुदास
स्वर – अजित कडकडे

बेमालूम

खरा प्रार्थनेत असणारा
कधी सावध नसतो.
पण त्या दिवशी आमचं तसं नव्हतं.
नाही म्हटलं तरी आम्हाला चाहूल होतीच.
आम्हांला करायची होती पारध.
तुझी उभी काठी कोसळली
अन् आम्ही त्याच्यावर झडप घातली.
बोटं दाखवायला कुणीतरी
हवाच होता आम्हाला
तो अनायासे सापडला.
खरं तर केव्हाचे आम्ही सारे
गोळी होऊन दडून बसलो होतो
त्याच्या पिस्तुलात ....
पण कसे दोघेही फसलात !


कवी - सदानंद रेगे
कवितासंग्रह - वेड्या कविता

प्रकाशक

हि कविता २१ सप्टेंबर १९८२ ला सदानंद रेगे ह्यांचा मृत्यु झाल्यानंतर दिलीप चित्रे यानी 'अभिरुची' च्या जानेवारी १९८३ च्या अंकात प्रकाशित केली होती. रेग्यांच्या कोणत्याही संग्रहात ही कविता आलेली नाही.

प्रकाशक हा मदारी असतो
लिहिता ना येणार्‍यांना तो लिहिते करतो.
पाणीपुरीला जसे जिर्‍याचे पाणी
तसा तो लेखकांना अटळ असतो.
त्याच्याकडे एक भली मोठी बॅटरी असते.
काळोखातल्यांना तो प्रकाशात आणतो.
प्रकाशक हा पेटीतल्या मिठाईसारखा सुसंकृत असतो.
कशासाठी तरी तो सारखी झीज सोशीत असतो.
लेखकाप्रमाणेच तोही वरचेवर सेमिनारला वगैरे जातो.
लेखकातले जे गाणारे असतात त्यांचे गाणे करतो.
सटीसहामासी लेखकाना घरी बोलावून
तो त्याना रॉयल टी देतो.
प्रत्येक प्रकाशकाच्या देवघरात शॉयलॉकचा फोटो असतो.
या चित्रातला शॉयलॉक साईबाबांसारखा दिसतो.
दिवसाचे तेवीस तास तो वात्सल्यरसाने ओथंबलेला असतो.
पण केव्हा केव्हा तो खणखणीत परखडपणाही दाखवतो.
'कोळशाच्या दुकानातले कोळसे' तशी तुमची पुस्तकं
ही त्याची गर्जना ऐकून् भले भले लेखक शब्दगळीत होतात.
प्रकाशकाचे गणित रँग्लर परांजप्यांसारखे असते.
पै पैच्या हिशोबागणिक तो नाथांसारख्या टाळ्या वाजवतो.
प्रत्येक प्रकाशक हा मॉमपेक्षाही अधिक पैसे लेखकाला वाटतो.
देवळाच्या पायर्‍या उतरीत तो खाली येऊ लागला
की धट्टेकट्टे लेखकही लुळ्यापांगळ्याचं सोंग घेऊन उभे राहतात.
ज्या लेखकाना आयुष्यात एकदा तरी मोटरीत बसायचे असते,
त्याना प्रकाशकावरच मदार ठेवावी लागते.
प्रकाशकाचा स्वतःचा असा दरबार असतो.
या दरबारात बसून प्रकाशक लेखकाना शहाणे करूनी सोडतो.
या दरबारात येताना लेखकाना मानेला स्प्रिंगा लावून घ्याव्या लागतात.
टाळ्यांचे टेपरेकॉर्डिंग त्याने खास अमेरिकेहून आणलेले असते.
लेखक म्हणजे कारकून या सत्याचे प्रूफ प्रकाशक प्रत्यही देत असतो.
पुस्तके बांधून घेण्यापलीकडे कसलंच बायंडिंग प्रकाशकावर नसते.
लठ्ठ् लेखकांना तो नित्य नेमे डायेटवर ठेवतो.
मठ्ठ लेखकांना तो फटकन् बोलतो.
हा़डकुळ्या लेखकांच्या बेडकुळ्या काढून दाखवतो.
भांडकुळ्या लेखकांच्या तोंडाला लागायला याला लाज वाटते.
अशा या परमदयाधन प्राण्याला,
परमेश्वरा, जन्मोजन्मी प्रकाशकाचाच जन्म दे.
त्याला कुत्रं, मांजर् वगैरे करून आम्हा लेखकांची कुचंबणा करू नकोस.
तो कुत्रं झाला तर आम्हाला मांजर व्हावं लागेल.
तो मांजर झाला तर आम्ही उंदीर होऊ.
पुस्तकं खाणार्‍या झुरळांना कधीकधी
प्रकाशकाचा चेहरा फुटलेला वाटतो
म्हणून ही प्रार्थना एवढंच.
सहस्त्रयोन्या वगैरे आम्हा कर्मदरिद्रांना.
त्याला एवढी एकच ठेव,
पुस्तके छापण्याची...."


कवी - सदानंद रेगे
(आभार :-अशोक पाटील)

खरेच का हे?

तुझ्या पथावर तुझ्या पदांच्या
पायखुणांच्या शेजारी मम
पायखुणा या उमटत जाती
खरेच का हे?

मातीमधल्या मुशाफिरीतून
हात तुझा तो ईश्वरतेचा
चुरतो माझ्या मलीन हाती
खरेच का हे?

खरेच का हे बरेही का हे
दोन जगांचे तोडून कुंपण
गंधक तेज़ाबासम आपण
जळू पहावे?

आणि भयानक दहन टाळण्या
जवळपणातही दूर राहुनी
स्फोटाच्या या सरहद्दीवर
सदा रहावे?


कवी - अनिल

दुपार

या ग्रंथसंग्रहालयात
निःशब्दाच्या हातातील
ते कोरे पुस्तक
पहा कसे पेंगत आहे
डोक्यावरच्या या वेडपट पंख्याला मात्र
दुपारची कधीच
झोप येत नाही!
सूर्यफुलासारखी उमलणारी
उन्हाचा स्कर्ट घातलेली बॉबकट केलेली
ती मुलगी
केव्हापास्नं घुटमळते आहे
कवितासंग्रहाच्या कपाटांपाशी!
(पण तेही बेटे झोपी गेलेले दिसतात ढाराढूर...)
समोरच्या टेबलावर बसलेला
आईन्स्टाईनसारखे केस पिंजारलेला
तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर
घेतो आहे लिहून भराभर
झोपाळू बोटांनी
गलेलठ्ठ पुस्तकातले काहीतरी
झोपेला आलेल्या अक्षरांत...


बाहेर...
उन्हाच्या झाडाखाली
कलंडलेली सावली

घेऊ लागली आहे डुलक्या
अन् तिच्या हातांतली
ती पेंगुळलेली कादंबरी म्हणते आहे :
आता पुरे ग!
मला झोप येते आहे!


कवी - सदानंद रेगे
कवितासंग्रह -  गंधर्व

वैराग्याचा मेळा

मृत्यू इतक गूढ काही नाही. अंत्य यात्रेत सुद्धा  मनाची  एक वेगळीच अवस्था होते. ह्या विषयावर हि कविता आहे.

जमला जन समुदाय अपार
मूक, उदास, गंभीर
कोणी उधळती अबीर बुक्का
कोणां  मुखी राम

राग, लोभ, नाती, गोती
काम, क्रोध न उरला काही
सर्व संग परित्याग करुनी
निजला जणूकि संन्यासी

आयुष्य भरी जो दिसला
तो देह समोर निजला
गेला सोडून जो देहाला
तो न कधी बघितला

अज्ञाताच्या या प्रवासाला
आत्मा नंगाच गेला
तिरडी वरी केवळ पसरला
देह रुपी अंगरखा

जमविला गोतावळा जरी
सारे प्रवासी घडीभरचे
अज्ञाताच्या या वाटेवर
अखेर एकटेच निघायचे

असतील अनेक जरी
सखे, मित्र, सोबती
संपणार साथ तयांची
स्मशान प्रवेश द्वारी

प्रवासी आपण घडीभरचे
पाव्हणेच या जगी
काढले तिकीट परतीचे
जन्मा आलो ज्या क्षणी

ना  रद्द व्हायचे तिकीट
ना गाडी कधी चुकायची
परतीच्या प्रवासाची ती
वेळ कधी न टळायची

उगवतील चंद्र तारे
चालेलच जग रहाटी
राहतील अंधुक आठवणी
भिंती वर फोटो जोवरी

मृत्यूचीच असे ओढ जीवा
तोच शाश्वत मित्र त्याचा
भेटता देती आलिंगन दोघे
जीव तत्काळ सोडी काया

चिंतेनी किती जाळला, देह
न जळला आयुष्य भरी
होता मुक्त चिंतेतून
तो, देह जळला  चिते वरी

राखले शरीर जन्म भरी हे
राख करण्याच स्मशानी
राख पसरता मनावरी ती
राखण्याची जिरली उर्मी

धडाडून पेटली चिता
वैराग्य धूर उडाला
कोण म्हणे हि अंत्य यात्रा
जमला वैराग्याचा मेळा


कवी - केदार
कवितासंग्रह - गमन