स्वप्नाची समाप्ति

स्नेहहीन ज्योतीपरी

मंद होई शुक्रतारा

काळ्या मेघखंडास त्या

किनारती निळ्या धारा.

स्वप्नासम एक एक

तारा विरे आकाशांत

खिरे रात्र कणकण

प्रकाशाच्या सागरांत.

काढ सखे, गळ्यांतील

तुझे चांदण्याचे हात

क्षितिजाच्या पलिकडे

उभे दिवसाचे दूत.

रातपाखरांचा आर्त

नाद नच कानीं पडे

संपवुनी भावगीत

झोंपलेले रातकिडे.

पहांटचे गार वारे

चोरट्यानें जगावर

येती, पाय वाजतात

वाळलेल्या पानांवर.

शांति आणि विषण्णता

दाटलेली दिशांतुन

गजबज गर्जवील

जग घटकेनें दोन !

जमूं लागलेले दंव

गवताच्या पातीवर

भासतें भू तारकांच्या

आसवांनीं ओलसर.

काढ सखे, गळ्यांतील

तुझे चांद्ण्यांचे हात

क्षितिजाच्या पलिकडे

उभे दिवसाचे दूत

प्राजक्ताच्या पावलाशीं

पडे दूर पुष्प-रास

वार्‍यावर वाहती हे

त्याचे दाटलेले श्वास.

ध्येय, प्रेम, आशा यांची

होतसे का कधीं पूर्ती

वेड्यापरी पूजतों या

आम्ही भंगणार्‍या मूर्ती

खळ्यामध्यें बांधलेले

बैल होवोनिया जागे

गळ्यांतील घुंगरांचा

नाद कानीं येऊं लागे.

आकृतींना दूरच्या त्या

येऊं लागे रूप-रङ्ग

हालचाल कुजबूज

होऊं लागे जागोजाग.

काढ सखे, गळ्यांतील

तुझे चांद्ण्याचे हात

क्षितिजाच्या पलिकडे

उभे दिवसाचे दूत.

होते म्हणूं स्वप्न एक

एक रात्र पाहिलेलें

होतें म्हणूं वेड एक

एक रात्र राहिलेले.

प्रकाशाच्या पावलांची

चाहूल ये कानावर

ध्वज त्याचे कनकाचे

लागतील गडावर.

ओततील आग जगी

दूत त्याचे लक्षावधी

उजेडांत दिसूं वेडे

आणि ठरूं अपराधी.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

हिमलाट

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !

मुखिं पिळून मद्यास्तव द्राक्षांचे घोस

पाडीत मळे मोत्यांचे चरणीं ओस

उद्दाम धावते करित दुभङ्ग धरेस

करकरां पांखरें रगडी दाताखालीं

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !

श्रीमन्त महालीं तिथें हिला न थारा

मखमाली दुलया देती मधुर उबारा

डोकावुन पळते कापत हीच थरारा

हो काय दरारा कनकाचा भयशाली

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !

पाहून परन्तू कुठें कुडाचीं खोपीं

कंगाल कांबळीं टाकुन गेले झोंपी

शेंकडों कवाडे ! वाट जावया सोपी

कडकडून पडते तेथें लांब भुकेली

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !

ज्योतींतुनि धावत या तेजःकण सारे

या यज्ञांतिल अन्‌सरणांतील निखारे

रे ढाळ नभा, तव ते ज्वालामय तारे

पेटवुं द्या वणवा कणाकणांत मशाली

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

तोवर तुला मला

याच वस्तीतून आपला सूर्य येईल
तोवर मला गातच राहिले पाहिजे
नगरवेशीत अडखळतील ऋतू
तोवर प्रिये जागत राहिले पाहिजे

तुझे कुंतलहि आताच विंचरून ठेव
अंबाडय़ाच्या पेडात फुले मी खोवीन
माझ्या डोळ्यांच्या ऐन्यात पाहून घे रूप
तुझ्या कानांच्या पाळीत तारे मी खोवीन

कालच्या सभेत गाईलेले मी गीत
ज्यात तुझ्या-माझ्या आशांचे खजिने होते
त्या ओळीहि ओठांवर घोळवून ठेव
ज्यात तुझ्या-माझ्या सुखाचे छबिने होते

आणखी एक काम करावे तू लगेच
फाटक्या कोटासहि टाके घालून ठेव
फुले हुंगीतच जाऊ दोघेहि गर्दीतून
तुझी रेशमासम बोटे दंडात ठेव

याच वस्तीतून आपले सुख येईल
तोवर तुला- मला जागलेच पाहिजे
दारावर येतील सोनेरी मनोरथ
तोवर प्रिये वाट पाहिलीच पाहिजे.


कवी - नारायण सुर्वे

माझी आई

जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंडय़ा जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.

दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मज्जा म्हणून सांगू
शब्दसाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.

एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.

त्याच रात्री आम्ही पाचांनी
एकमेकांस बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आईदेखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.


कवी - नारायण सुर्वे 

क्षितीज रुंद होत आहे

आज माझ्या वेदनेला
अर्थ नवा येत आहे
आणि मेघांच्या डफावर
थाप बिजली देत आहे

आज मरण आपुल्याच
मरणाला भीत आहे
आणि मृत्युंजयी आत्मा
पुन्हा धडक देत आहे

आज शुष्क फांद्यावर
बहर नवा येत आहे
भूमीच्या गर्भामधुनी
बीज हुंकार देत आहे

आज सारे गगन थिटे
नजरेला येत आहे
काळोखाच्या तबकडीत
सूर्य गजर देत आहे

आज तडकलेले मन
एकसंध होत आहे
आणि उसवलेले धागे
गुंफूनीया देत आहे

आज माझ्या कोरड्या गा
शब्दात आग येत आहे
आणि नव्या सृजनाचे
क्षितीज रुंद होत आहे.


कवी - नारायण सुर्वे

असाच

वेगळीच जात तुझी;
वेगळाच ताल
तूं अफाट वाट तुझी
एकटाच चाल.

एकटाच चालत जा
दूर दूर दूर
गात गात तूंच तुझा
एकटाच सूर

एकटाच चालत जा
उंच आणि खोल;
बोल आणि ऍक पुन्हा
तूं तुझा बोल.

तूं असाच झिंगत जा
विस्मरून पीळ
तूं असाच फुंकीत जा
अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा
भास तूं तुझेच्;
शांततेत ऍकत जा
श्वास तूं तुझेच.

खोल या दरीत अशा
गर्द साऊलीत
हो निमग्न तूंच तुझ्या
मंद चाहुलीत.


कवी - ना. घ. देशपांडे

मानस

मानस माझ्या मनीचा केवळ
सांगण्या इथे आलो मी
दोन मनांचा सुरेख संगम
घडवण्या इथे आलो मी

अर्थातूनही अर्थ निघाया
शब्द सांडतो येथे मी
बीज फुलांचे येथ रोवण्या
शाब्दिक सुमने खुडतो मी

कवनाला या बंध न कसले
पाशही सारे सोडून मी
कवित्त्वतेची चढवूनी वस्त्रे
कवनमंदिरी रमतो मी

दोन झरोके दोन क्षणांचे
येथ उघडूनी पाहतो मी
कवनवराला प्रणाम करूनी
काव्य दालनी येतो मी


कवियत्री - सौ. जुई जोशी.