खरा देवा मधी देव

अरे कानोड कानोड

सदा रुसते फुगते

आंगावरती लेयाले

सर्वे डागीने मांगते

अरे डागिने मांगते

हिची हौस फिटेनाज

अशी कशी नितातेल

तिले गान गाती रोज

माय कानोड कानोड

मानसाची जमे थाप

देखा वाजयी वाजयी

सर्वे फुटले रे डफ

अरे पाह्य जरा पुढें

आली पंढरीची हुडी

पाहीसन झाली कशी

तुझी कानोड कानोडी !

माय कानोड कानोड

काय देवाचं रे सोंग !

खरा देवामधी देव

पंढरीचा पांडुरंग

अरे एकनाथासाठीं

कसा चंदन घासतो

सांवत्याच्या बरोबर

खुर्पे हातांत धरतो

'बोधाल्याच्या, शेतामधी

दाने देतो खंडी खंडी

झाला इठोबा महार

भरे दामाजीची हुंडी

कबीराच्या साठीं कसा

शेले इने झटपट

जनाबाई बरोबर

देव चालये घरोट

कुठे तुझी रे कानोड

कुठे माझा रे इठोबा

कुठे निंबाची निंबोयी

कुठे 'बोरशाचा' आंबा

अरे इठोबा सारखं

देवदेवतं एकज

चला घ्या रे दरसन

निंघा पंढरीले आज !


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

माउली

माझ्या हाती आहे एक पसा धूळ

काय हिचे मोल? सांगा कुणी

कुणी तरी घाम कष्टाचा गाळिला

आहे मिसळला हिच्यामधे

कुणी हिजवर आसवे ढाळिली

त्यामुळे ही झाली आहे आर्द्र

कुणी दुःखावेगे उसासे टाकिले

उष्ण हिचे झाले अंतरंग

जे का हीन दीन त्यांची ही माउली

शिर हे पाउली हिच्या नम्र


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

जुनेच देईल तुज तांब्यादोरी

जुन्याचा धरूनी हात तू नवीना,

पाउले जपून टाक पुढे

एकाएकी त्याचा तोडून तटका

चालाया होशी का उतावीळ ?

'जाऊ द्या जुने ते मरणालागुनी !'

कृतघ्न ही वाणी बोलसी का?

जुनेच देईल तुज तांब्यादोरी

घेऊन शिदोरी पुढे चाल

होशील एकदा तूही जीर्णपण

ठेव आठवण नीरंतर


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

महात्म्याची वृत्ति आपुल्या पावित्र्ये

एक ये वार्‍याची झुळुक वाहून

काय तिचे गुण सांगू परी !

सहज ती गेली वनराईमाजी

तिने तरुराजी डोलवील्या

सहज ती गेली नदीपृष्ठावर

लहरी सुंदर उठवील्या

सहज ती गेली एका मार्गाहून

पांथस्थाचा शीण घालविला

महात्म्याची वृत्ति आपुल्या पावित्र्ये

शेकडो ह्रदये तोषवीते !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

धन्य नरजन्म देऊनीया मला

धन्य नरजन्म देऊनीया मला

देवराया, केला उपकार

सृष्टीचे भाण्डार केले मला खुले

लोचन हे दिले आलोकना

दिली ग्राह्य बुद्धी, दिधली जिज्ञासा

सौदर्य-पिपासा वाधवीली

कारागिरीतील जाणाया रहस्य

दिले रसिकत्व ह्रदयाला

वाणीस या माझ्या दिली काव्यशक्ती

वर्णाया महती देवा तुझी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

दूर कोठेतरी

दूर कोठेतरी अज्ञात जागेत

हासत डोलत आहे फूल

दूर कोठेतरी रानी अवखळ

इवला ओहळ वाहताहे

दूर कोठेतरी वृक्षी गोड गाणे

पाखरू चिमने गात आहे

दूर कोठेतरी देत छाया गोड

एकटेच झाड उभे आहे

दूर कोठेतरी आपुल्या तंद्रीत

कवी कोणी गीत गात आहे


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

माझिया जीवनसृष्टीच्या ऋतूंनो !

पुष्पपल्लवांची आरास करीत

हासत वसंत येतो जगी

इंद्रधनुष्याचे तोरण बांधीत

वर्षा ये नाचत रिमझिम

हिमऋतु येतो धुके पसरीत

शीतळ शिंपीत दहिवर

माझिया जीवनसृष्टीच्या ऋतूंनो-

स्वर्गीय दूतांनो, कोठे गेला?

फुले फूलवीत, मेघ बरसत,

दव उधळीत यारे सारे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या