मागणे

"हात तुजला जोडितो देवबाप्पा

सुखी माझ्या तू ठेव मायबापा

करी भाऊला परीक्षेत पास

त्यास नाही देणार कधी त्रास !

ताइ माझी किति शहाणी हुषार

तिला मिळु दे बाहुली छानदार

मित्र बाळू धरि अबोला रुसूनी

जुळव गट्टी रे आमुची फिरुनी

करी किरकिर तान्हुले पाळण्यात

काम आईला सुचेना घरात

उगे त्याला कार, लागु दे हसाया

फार होतिल उपकार देवराया !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बगळे

कुणिकडे चालले हे बगळे

रांगेत कसे उडती सगळे !

नदी वाहते संथ खालती

जळी ढगांच्या छाया हलती

तटी लव्हाळे डोलडोलती

वर कुणी उधळिली शुभ्र फुले ?

पाय जुळवुनी, पंख पसरुनी

कलकल कलकल करीत मधुनी

कुठे निघाले सगळे मिळुनी

पडवळापरी किति लांब गळे !

वाटे सुटली शाळा यांची

शर्यत सुटली की पळण्याची !

यात्रा भरली की पक्ष्यांची ?

तिकडेच चालले का ? न कळे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

माझी बहीण

मला आहे धाकटी बहिण नामी
नाव ’कमला’ ठेविले तिचे आम्ही

सदा हसते नी सदा खेळते ती
कधी रडते नी कधी हट्ट घे ती

बाळ माझी ही गुणी अन्‌ शहाणी
तुम्ही जर का देखाल न्याहळोनी

कौतुकाने बोलाल, ’ह्या मुलीला-----
कुठुनि इतुका हो पोक्तपणा आला !’

तशी आहे ती द्वाड अन्‌ खठयाळ
तुम्हा भंडावुन नकोसे करील

आणि तुम्ही बोलाल, ’अशी बाई,
मूल हट्टी पाहिली कधी नाही !’

सुटी माझ्या शाळेस जो न होते
तोच माझे मन घरा ओढ घेते

धरुनि पोटाशी बाळ सोनुलीचे
मुके केव्हा घेईन साखरेचे !

अशी वेल्हाळ लाडकी गुणाची
नाहि आवडती व्हायची कुणाची ?

झैत्रिणींनो, कधि घरा याल माझ्या
तुम्हांला मी दावीन तिच्या मौजा !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बाजार

बाजार आज गावचा पहा वाहतो

खिडकीत उभा राहुनी मौज पाहतो

हा गाडयांनी गजबजला गाडीतळ

किति गडबड, गर्दी, गोंगाट नि गोंधळ !

बाजारकर्‍यांची रहदारी ही सुरु---

जाहली, चालती पहा कसे तुरुतुरु !

ध्वनि खुळखुळ घुंगुरमाळांचा मंजुळ

जणु मला वाहतो, करितो मन व्याकुळ

ही शेतकर्‍यांची मुले शिवारातली

घालीत शीळ, मारीत उडया चालली

उगवेल सणाचा दिवस उद्या पाडवा

पैरणी नव्या, पोषाख हवा नवनवा

काकडया लांब, गरगरित गोल टरबुजे

गुळभेली, साखरपेटि, गोड खरबुजे-----

आणिती गाढवे पाठीवर वाहुनी

कशि दुडक्या चाली येती गिरणेहुनी !

जरि सावलीत मी, तहान किति लागली

खायला कलिंगड-खाप लाल चांगली !

मन गेले गेले वार्‍यावर वाहुनी

मज बाजाराला जाऊ द्या हो कुणी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मेघांनी वेढलेला सायंतारा

चम्‌चमणारा । घनवेष्टित बघ हा तारा

तारा-जननी संध्या रमणी

तरणी-विरहे रडे स्फुंदुनी

आरक्त छटा उमटे वदनी

बघुनि वेल्हाळा । गहिवरुनि वदे या बोला

"बाळ सोनुले उघडे पडले

कोण अता मायेचे उरले ?

किति दिसताहे मुख हिरमुसलें !

भिउ नको बाल । मी करिन तुझा सांभाळ

पुत्र कुणाचा ? दावित सकला

मोहक हा तव वदनतजेला

एक एक गुण जणू तिकडला

साठला वदनी । वाटते लाडक्या बघुनी

तळपत होते जोवर गगनी

मुठीत होती सग्ळी अवनी

खळ दिपले स्वारीस पाहुनी

कुणाची छाती । आपणा छळाया नव्हती

तेच पहा त्यांच्या माघारी

अनाथ अबला मला पाहुनी

बालवय तुझे हे ओळखुनी

चोहिबाजूंनी । भिवविती नीच घेरोनी

मेघखळांची कृष्ण साउली

बाळा, तुझिया भवती पडली

दिव्य वपू तव झाकिल सगळी

परि तुझें तेज । आणिते तयांना लाज

धैर्य न होई स्पर्श कराया

दचकुन बघते बघ घनछाया

’अवचित येइल की रविराया’

दरारा हाही । तव रक्षण करितो, पाही

घनमण्डल काळासम भासे

त्यात धैर्य जणु तुझे प्रकाशे

वीरकुळाला हे साजेसे

भिउ नको बाळ । मम अंकी नीज खुशाल !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मानवीं तृष्णा

हा आकाश-विकास मूर्त गमतो उत्कर्ष नेत्रोत्सव

तारा-पुञ्ज, दिवाकर, ग्रह, शशी त्याचे असे वैभव

ते आम्ही बसतो पहात हृदयी होऊनिया विस्मित

तारामण्डल व्योमभूषण कसे व्हावे परी अंकित !

काढी मानव कष्ट सोसुन हिरे का खोल खांणीतुन

मोती आणिक सागरातुन, मला त्याचे कळे कारण !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बहरलेला आकाश-लिंब !

"पर्णश्रुती तरुवरा, तव लक्षसंख्य

हे डोलती धवल डूल तयीं सुरेख !

नक्षत्रपुञ्ज नयनोत्सव अंबराचे

की लोल हे झुलति लोलक झुंबराचे !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या