बालयक्ष

बोलतात बाई बालयक्ष याला
कुंजातुनि आला यक्षिणींच्या

विसरुन पंख इवले धवल
आला, हे नवल नाही काय ?

हासत, खेळत, बोबडे बोलत
आला हा डोलत सदनात

जाईच्या वेलीला आला का बहर
आंब्याला मोहर फुटला का ?

गाऊ का लागली पाखरे मंजुळ
वारे झुळझुळ वाहू लागे ?

अशी काही जादू घडली घरात
काय गोकुळात यशोदा मी ?

खोडकर तरी खोडया याच्या गोड
पुरविती कोड शेजारणी

मेळा भोवताली लहान्या बाळांचा
फुलपाखरांचा फुलाभोती

’एक होता राजा’ गोष्टी या सांगत
गंमत जंमत करीत हा !

नाजुक रेशमि धाग्यांनी आमुची
मने कायमची बांधणारा

काळजीचे काटे काढून आमुची
काळिजे फुलांची करणारा

खेळकर माझा लाडका वसंत
जीवाला उसंत नाही याच्या

झोप गुर्रकन लागे कशी तरी !
नाही जादूगिरी कळत ही

झोपेत गालाला पडतात खळ्या
कोण गुदगुल्या याला करी ?

पंख लावूनीया गेला का स्वप्नात
यक्षिणी-कुंजात उडून हा ?

तिथे यक्षिणींनी घेरला वाटत
मुके मटामट घेतात का ?

कल्पवल्लरीच्या फुलाला पाहून
बाळ खुदकन हसतो का ?

असा बालयक्ष माझा ग गुणाचा !
बाई न कुणाचा, माझाच हा !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आजोळी

माझ्या मामाची रंगीत गाडी हो

तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो

मला आजोळी घेऊन जाई हो

नाही बिकट घाट

सारी सपाट वाट

मऊ गालीचे ठायी ठायी हो

शीळ घालून मंजूळवाणी हो

पाजी बैलांना ओहाळ पाणी हो

गळा खुळखूळ घुंगुरमाळा हो

गाई किल्‌बील विहंगमेळा हो

बाजरिच्या शेतात

करी सळसळ वात

कशा घुमवी आंबेराई हो

कोण कानोसा घेऊन पाही हो

कोण लगबग धावून येई हो

गहिवरुन धरुन पोटी हो

माझे आजोबा चुंबन घेती हो

लेक एकूलती

नातु एकूलता

किति कौतूक कौतूक होई हो


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आजोबा

आजोळ माझे लहान गाव
’कळंब ’ आहे तयाचे नाव

नदी ’अश्विनी’, ’माणिक’ ओढा
गावशिवारा घातला वेढा

ओढयाच्या काठी मळा मामाचा
पडाळ छोटी,छोटी बगीचा

मायाळू भारी माझे आजोबा
म्हणती त्यांना सगळे ’बाबा !’

आंघोळ त्यांची भल्या सकाळी
गोपीचंदन लाविती भाळी

नारायणाला हात जोडिती
पूजा करिती, पोथी वाचिती

ऐन दुपारी आंब्याखालती
घोंगडीवरी अंग टाकिती

घायपाताचा वाक घेऊनी
दोर वळिती पीळ देऊनी

करडे पाटीखाली झाकिती
गुरा वासरा पाणी पाजती

शेण काढुनी झाडिती गोठा
स्वच्छ ठेविती अंगण , ओटा

तिन्ही सांजेला येत माघारी
गुरे दावणी बांधिती सारी

पाठीवरुनी मुक्या जीवांच्या
हात फिरतो प्रेमळ त्यांचा

पाहुणा कोणी येता दुरुनी
बोलती त्याशी तोंडभरुनी

गोष्टी सांगती देवाधर्माच्या
अभंग गाती तुकारामाचा

देवाचे नाव सदा तोंडात
झोप तयांना लागते शांत

आजोबा माझे भारीच गोड
त्यांच्या प्रेमाला नाहीच जोड !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

डराव डराव

डराव डराव ! डराव डराव !

का ओरडता उगाच राव ?

पत्ता तुमचा नव्हता काल

कोठुनि आला ? सांगा नाव

धो धो पाउस पडला फार

तुडुंब भरला पहा तलाव

सुरु जाहली अमुची नाव

आणिक तुमची डराव डराव !

बटबटीत डोळ्यांचे ध्यान

विचित्र तुमचे दिसते राव !

सांगा तुमच्या मनात काय ?

ही घ्या छत्री, ही घ्या नाव

जा गाठा जा अपुला गाव

आणि थांबवा डराव डराव !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मागणे

"हात तुजला जोडितो देवबाप्पा

सुखी माझ्या तू ठेव मायबापा

करी भाऊला परीक्षेत पास

त्यास नाही देणार कधी त्रास !

ताइ माझी किति शहाणी हुषार

तिला मिळु दे बाहुली छानदार

मित्र बाळू धरि अबोला रुसूनी

जुळव गट्टी रे आमुची फिरुनी

करी किरकिर तान्हुले पाळण्यात

काम आईला सुचेना घरात

उगे त्याला कार, लागु दे हसाया

फार होतिल उपकार देवराया !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बगळे

कुणिकडे चालले हे बगळे

रांगेत कसे उडती सगळे !

नदी वाहते संथ खालती

जळी ढगांच्या छाया हलती

तटी लव्हाळे डोलडोलती

वर कुणी उधळिली शुभ्र फुले ?

पाय जुळवुनी, पंख पसरुनी

कलकल कलकल करीत मधुनी

कुठे निघाले सगळे मिळुनी

पडवळापरी किति लांब गळे !

वाटे सुटली शाळा यांची

शर्यत सुटली की पळण्याची !

यात्रा भरली की पक्ष्यांची ?

तिकडेच चालले का ? न कळे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

माझी बहीण

मला आहे धाकटी बहिण नामी
नाव ’कमला’ ठेविले तिचे आम्ही

सदा हसते नी सदा खेळते ती
कधी रडते नी कधी हट्ट घे ती

बाळ माझी ही गुणी अन्‌ शहाणी
तुम्ही जर का देखाल न्याहळोनी

कौतुकाने बोलाल, ’ह्या मुलीला-----
कुठुनि इतुका हो पोक्तपणा आला !’

तशी आहे ती द्वाड अन्‌ खठयाळ
तुम्हा भंडावुन नकोसे करील

आणि तुम्ही बोलाल, ’अशी बाई,
मूल हट्टी पाहिली कधी नाही !’

सुटी माझ्या शाळेस जो न होते
तोच माझे मन घरा ओढ घेते

धरुनि पोटाशी बाळ सोनुलीचे
मुके केव्हा घेईन साखरेचे !

अशी वेल्हाळ लाडकी गुणाची
नाहि आवडती व्हायची कुणाची ?

झैत्रिणींनो, कधि घरा याल माझ्या
तुम्हांला मी दावीन तिच्या मौजा !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या