हे नाथ! येईन तव नित्य कामी

हे नाथ! येईन तव नित्य कामी।।
भवदीय इच्छा
प्रकटीन कर्मी
अश्रांत अत्यंत करिन श्रमा मी।। हे....।।

सुखवीन हे लोक
हरुनी मन:शोक
झिदवीन काया प्रमोदे सदा मी।। हे....।।

अश्रू पुसावे
जन हासवावे
याहून नाही जगी काहि नामी।। हे....।।

वितळून जाईन
जशि मेणबत्ती
देईन अल्प प्रकाशा तरी मी।। हे....।।

चित्ता शिवो स्वार्थ
न कधीहि देवा
न जडो कधी जीव मणि-भूमि-हेमी।। हे....।।

स्मरुनी सदा मी
तुज चित्ति वागेन
तुजवीण नाही कुणी अन्य स्वामी।। हे....।।

निरपेक्ष सेवा
खरि तीच पूजा
अर्पीन ती त्वत्पदाला सदा मी।। हे....।।

इच्छा असे हीच
पुरवून ती तूच
ने दास अंती तुझ्या दिव्य धामी।। हे....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

हे तात! दे हात करुणासमुद्रा

हे तात! दे हात करुणासमुद्रा।।
निज मग्न कर्मात
जग सर्व हे नित्य
पाहील कुणि ना मम म्लान मुद्रा।। हे तात....।।

होई सुधासिंधु
होई दयाइंदु
होई मला गोड माहेर रुद्रा!।। हे तात....।।

शिवो ना अमांगल्य
मजला शिवेशा!
अभद्र धरो जीव हा ना, सु-भद्रा!।। हे तात....।।

प्रभु! जे खरे थोर
देती सदा धीर
सांभाळिती ते हता दीनक्षुद्रा।। हे तात....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, सप्टेंबर १९३४

तुजवीण अधार मज कोणि नाही

तुजवीण अधार मज कोणि नाही।।
पथ कोण दावील
कर कोण घेईल
नेईल सांभाळुनी कोण, आई!।। तुजवीण....।।

बघतो तुझी वाट
नयनांतानी पाट
गळा दाटतो सांगु तुजलागि कायी।। तुजवीण....।।

हसतात सारे
न दया कुणा रे
दिशा शून्य राया! तुझ्यावीण दाही।। तुजवीण....।।

पथि मी उभा रे
हसतात सारे
मला होटिती, मी रडे धायिधायी।। तुजवीण....।।

जग मत्त हे जात
नत मी उभा तात!
ये हात धरुनी मला नीट नेई।। तुजवीण....।।

कधिही तुझ्यावीण
पद मी न टाकीन
जावो जरी जन्म हा सर्व जाई।। तुजवीण....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, सप्टेंबर १९३४

कापनी

आतां लागे मार्गेसर

आली कापनी कापनी

आज करे खालेवर्‍हे

डाव्या डोयाची पापनी

पडले जमीनीले तढे

आली कापनी कापनी

तशी माझ्या डोयापुढें

उभी दान्याची मापनी

शेत पिवये धम्मक

आली कापनी कापनी

आतां धरा रे हिंमत

इय्ये ठेवा पाजवुनी

पिकं पिवये पिवये

आली कापनी कापनी

हातामधी धरा इय्ये

खाले ठेवा रे गोफनी

काप काप माझ्या इय्या,

आली कापनी कापनी

थाप लागली पीकाची

आली डोयाले झांपनी

आली पुढें रगडनी

आतां कापनी कापनी

खये करा रे तय्यार

हातीं घीसन चोपनी

माझी कापनी कापनी

देवा तुझी रे मापनी

माझ्या दैवाची करनी

माझ्या जीवाची भरनी


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

काही कळेना, काही वळेना

काही कळेना, काही वळेना।।
निरभ्रशा अकाशात
कुठूनशी अभ्रे येत
झणी सूर्य झाकोळीत
तेज ते पडेना।। काही....।।

जरा वरी येई मोड
कुठूनशी तो ये कीड
खाइ अंकुराला गोड
वाढ ती घडेना।। काही....।।

पतंग जो वरती जाई
तोच उलट वारा येई
क्षणामध्ये गोता खाई
तो वरी चढेना।। काही....।।

मला गमे तोची आला
उठे मिठी मारायला
परी भास सारा ठरला
तो कधी मिळेना।। काही....।।

अशी निराशा ही फार
जीव होइ हा बेजार
लोचनीचि अश्रूधार
ही कधी सुकेना।। काही....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, एप्रिल १९३४

आईचा मार

आई! आई! तू मज मार मार।।

मारुन मारुन मजला रडवी
चाबुक उडवुन रक्ता उडवी
लावी मन्नयनांस धार।। आई....।।

लाल तुझ्या परि दृष्टीखाली
प्रेमसुधेची गंगा भरली
दिसते गे अपरंपार।। आई....।।

मारुन मारुन तूची रडशिल
जवळी ओढुन मजला घेशिल
तुज दु:ख होईल फार।। आई....।।

माडीवरती मज बसवशिल
हनुवट धरुनी मज हसवशिल
घेशिल मुके वारंवार।। आई....।।

प्रेमे तुजला मी बिलगेन
तव अश्रूंचे मजला स्नान
हरपेल मम दु:खभार।। आई....।।

आई! तुझा मज रुचतो मार
त्याहुन नाहि दुजे मज प्यार
मारुन मारुन तार
मारुन करि उद्धार।। आई....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

दिव्य आनंद

दिव्य आनंद
मन्मना एक गोविंद।।

विषयवासना मम मावळली
सकल अहंता माझी गळली
वृत्ती प्रभोरूपोन्मुख वळली
न दुजा छंद।। मन्मना....।।

ख-या सुखाचा झरा मिळाला
भेदभाव तो सकल निमाला
आज तपस्या येइ फळाला
तुटले बंध।। मन्मना....।।

भावभक्तिची गंगा भरली
ज्ञानपंकजे सुंदर फुलली
अपार शांती हृदयी जमली
सुटला गंध।। मन्मना....।।

सम मम आता डोळे उभय
सम मम आता प्रेमळ हृदय
परम सुखाया झाला उदय
मी निष्पंद।। मन्मना....।।

शांत समीरण, शांत अंबर
शांत धरित्री, शांत मदंतर
रहावया येतसे निरंतर
गोड मुकुंद।। मन्मना....।।

अता जगाची सेवा करित
दीनदु:खितां हृदयी धरित
नेइन जीवन हे उर्वरित
मी स्वच्छंद।। मन्मना....।।

अशांत अस्थिर लोकां पाहुन
तळमळती हे माझे प्राण
त्यांना आता नेउन देइन
सच्चित्कंद।। मन्मना....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३०