मोरपिसें आणि कावळा

मिरवितों खोवुनी मोरपिसें पंखांत,

म्हणुनिया कावळे शिष्ट मला हंसतात.

परि देइन जर हीं फेंकुन रस्त्यावरती,

हे शिष्ट मनांतुन टपले उचलाया तीं !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २५ डिसेंबर १९३७

कागदी फुलें

किति तरी गुलाबें फुललीं ह्रुदयान्तरीं;

अर्पीन तुला तीं म्हणुनि खुडुनि ठेविलीं.

परि फुलांपरीसहि न्यारी कांहीं तरी,

ह्रुदयांतिल वाटे मला प्रीतिवल्लरी;

"क्षणभंगुर अंर्पू गुलाबपुष्पें कशीं ?

अमर ती वल्लरी अर्पिन कधिंतरि तुशी."

दोलयमानमति असल्या संशयतमीं

होऊन राहिलों अमर्याद काल मी.

कागदी गुलाबें सवंग घेउनि कुणी,

अर्पितां जाहलिस त्याची, मज सोडुनी !

काळजास डसले सहस्त्र विंचू मम,

जगणेंहि जाहलें कांहिं काल जोखम.

दुखवितां नाग उभवितो फणा आपुली,

उसळुनी तेंवि मम स्वत्ववृत्ति बोलली,

"कागदी फुलांवर भाळणार ती खुळी,

जाहली न तुझि हें भाग्यच तूझें मुळीं !"


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २० नोव्हेंबर १९३५

चालली मिरवणुक

चालली मिरवणुक गीतांची माझिया;

कुणि निळीं दूकुलें नेसलिं, कुणि मोतिया.

नादांचे नूपुर घालुनिया नाचती;

रंगीत भरजरी रुपकांत मिरवती !

पाहुनी झोंक हा कुतुक नयनिं थाटतें;

परि कुठें कांहितरि चुकलेंसें वाटतें !

मनिं विचार येई सत्व पहावें तरी,

वस्त्रे नि नूपरें काढुनि करुं खातरी.

हीं विवस्त्र उघडीं फिरतिल रस्त्यांतुन,

पाहतील सगळे रसिक चकित होउन !

कल्पना आगळी वाटतसे सोज्वळ,

गाणेंपण परि का गाण्यांचें राहिल ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १० ऑक्टोबर १९३४

मी करितों तुजवर प्रेम

मी करितों तुजवर प्रेम असें म्हणतात;

परि प्रेमाची ही नवीच कांहीं रीत !

तव प्रेमजलामधिं खोल खोल जों बुडतों,

मम द्वेषवन्हि तों अधिकच भडकत जातो !

कुणि म्हणती किति तव टपारे डोळे काळे;

मज वाटति उघडे दोन विषाचे प्याले !

जइं दावित अपुले शुभ्र दांत तूं हंसशी,

तव कृष्णह्रुदयजलफेन गमे तो मजशीं !

मी तुला बाहतां दूर पळुनिया जाशी !

परि सोडुनि जातां घट्‌ट कवळुनी धरिशी !

हंसुनिया चुंबितां उदास होउनि रडशी ;

मी अश्रु गाळितां खदखद मजला हंससी !

मगरीपरि भक्षक असे तुझी गे प्रीती;

पहिलीच साधुनि संधी मी सोडिन ती !

मी करिन कांही तरि वाटत होतें जगतीं;

तूं येउन माझी केलिस माती माती !

किति मोह होतसे रोज मला अनिवार,

कीं कटयार घेउनि तुला करावें ठार !

मारीन खरा छातींत तुझ्या खंजीर,

माझाच परंतू फाटुन जाइल ऊर !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १२ सप्टेंबर १९३३

लालबावटयाचें गाणें

"असेंच हें चालायाचें

गरिब बिचा-या दलितांचें ;

जगताच्या सौख्यासाठीं

मरती ते अर्ध्यापोटीं.

हा देवाघरला न्याय,

इलाज त्यापुढती काय ?"

चोरांचें तत्वज्ञान

ऐकुनि हें किटले कान.

संत आणखी सरदार

चोरांचे साथीदार !

अन्नवांचुनि जे मरती

उपास त्या शिकवा म्हणती !

व्याघ्रसिंह धांवुनी येतां

जीवास्तव त्यांशीं लढतां,

करुं नका हिंसा अगदीं !

कोंकरांस सांगति आधीं !

समतेची पोपटपंची

जपमाला मधु तत्वांची,

शक्त नसे करण्या कांहीं

दलित सदा दलितच राही.

क्रान्तीचा रक्तध्वज तो

दृष्टिपुढें फडफडत येतो.

दलित जनीं उसळत थोर,

शक्ति असे अपरंपार;

ती सारी केंद्रित करुनी

रक्तध्वज पुढतीं धरुनी

जुलुमाचें उखडूं मूळ,

ढोंग्यांचें काढूं खूळ !

लाखांचें मारुनि पोट,

चाटित जे बसले ओंठ,

त्या चौरां हतबल करुनी,

सर्वस्वा त्यांच्या हरुनी,

लोकांचें सर्वस्व असें,

लोकां देउनि टाकुं कसें !

वसुंधरामाई अमुची

चोरुनि जे बसले त्यांची

हिरावुनी शक्ती घेऊं

लोकांचें लोकां देऊं !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ७ ऑगस्ट १९२९

फासावरुन

हा प्रणाम भारतमाते

घे शेवटला बाळाचा । माय भू ।

ही थोडी प्रियतम माती

ह्रुदयीं धरितों दो हातीं । घट्ट गे.

जरि असल्या चरणीं बेडया

विसरशील का मज वेडया । कधि तरी ?

इतरांस

दुष्ट दैत्यांस

भासलों खास

जरी द्रोही मी-नाहलों तरी तव

प्रेमी । उत्कट !

मज नको स्वर्ग सुखधाम

चिंतीन सदा तव नाम । गोडसे.

मरणाची भीती कोणा ?

देशद्रोही षंढाना । भेंकडा !

देशार्थाचि जन्मा आलों

देशार्थाचि स्वर्गी गेलो । हांसत !

हे प्राण

देशनिर्वाण

मायभूत्राण

कराया नाही-वेंचिले जयें

लवलाही । धिक्‌ तया !

दे जन्म हजारों मजला

स्वातंत्र्यास्तव लढण्याला । देशि या.

पाहतोंच डोळे भरुनी

रुप गे तुझे प्रिय जननी । एकदां !

बघु नकोस केविलवाणी

मजकडे दीन नयनांनी । देवते !

स्वातंत्र्य

दिव्य हा मंत्र

स्फुरवि जरि रक्त

तुझ्या बाळांचे-दिन पूर्ण

स्वातंत्र्याचें । जवळची

या शेवटल्या घटिकेला

दिसतसे भावि तव काळ । मज गडे !

स्वातंत्र्याच्या उद्यानीं

फिरतांना दिसशी जननीं । वैभवी.

करितांना तव प्रिय काज

देहास ठेवितों आज । धन्य मी !

पाहुनी

प्रेत मम कुणी

थरकला जनीं

देशभक्तीनें-तरि धन्य धन्य मम

मरणें । जाहले !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

कोणि म्हणती

कोणि म्हणती कसलिं ही प्रतिभेस घेसी बंधनें ?

चांदराती आणखी तीं वल्लभेचीं चुंबनें----

---टाकुनी हें काय गासी रुक्ष, कर्कश, रांगडें ?

शेणमातीचीं खुराडीं आणि रंकांचे लढे !

राव सत्तावंत किंवा दास मध्यमवर्गिय,

गा गडया, त्यां खूष करण्या गान तूझें स्वर्गिय !

तीं तुझीं गुलगूल गाणीं ऐकुनी विसरावया---

---लाव रंकां झुंज जी लढतात ते सत्ता-जया !

वल्ल्भा जाईल माझी मीहि माती होइन;

रंकरावांची रणें इतिहास टाकिल तोडुन.

आणखी उगवेल साम्याची उषा जगतांत या;

काय ते म्हणतील काव्या त्या क्षणीं या माझिया ?

मानवांचे पुत्र लढले, आणि तुटलीं बंधनें;

गाइला हा चांदरातीं वल्लभेची चुंबनें !

क्रांतियुध्दाची चढाई आज जर ना गाइन,

मानवी इतिहास का देईल फिरुनी हा क्षण ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ९ ऑगस्ट १९३३