कुणाच्या खांद्यावर

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ?

कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे

दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे

अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे


कवी /गीतकार    -    आरती प्रभू
संगीत    -    भास्कर चंदावरकर
स्वर    -    रवींद्र साठे
चित्रपट    -    सामना

चांदराती खाडीच्या किना-यावर

निळ्या नभावर गिरिराजांची काळिभोर आकृती ,

उमटली चांदण्यात मोडती.

कांठाच्या नारळी ज्योत्स्नेंतुनि रंगति;

नस्तांत झपूर्झा ऊर्मी या खेळ्ती;

काठांस शुभ्र शुभ्र फेनहार अर्पिती !

नौका काळ्या 'डबक डबक ' या जळावरी डोलती;

मर्मरत ऊर्मि तयां चुंबिती !

वाळवंटिं पसरल्या वाळुच्या लहरी लहरी किती !

हि-यासम कण मधुनी चमकती !

युगेयुगें घेउनी लोळण पायावरी,

गिरिकडे कशाची सागर विनती करी ?

गंभीर न बघतो वळुनि मुळीं हा गिरी !

दुःख गिळुनिया अंतरिं सिंधू फेंसाळे परि वरी,

हांसतो निराश जणु वरिवरी !

चराचरावरि शुभ्र रुपेरी मोहन हें पसरलें,

मोहने जीवभाव भारले ;

अस्मान वर्षतें शीत धवलता अशी;

नसनसांत थरके लहर थंड गोडशी;

कुणि जवळ बसावें बिलगुनिया छातीशीं !

चांदरातिच्या कोंदणांत दिक्काल विसरुनी असें,

पडावें स्पर्शसुखीं धुंदसें !

दिव्य कुणी यक्षिणी येऊनी सौंदर्यक्षण असा,

अक्षयीं ठसविल का गोडसा !

चांदणें असेंच्या असें फुलुन राहिल,

गिरिपदीं स्थिरावुन राहिल सिंधूजल,

वक्षावर माझ्या मान तिची निश्चल !

भावि युगें विस्मयें पाहतिल कोरिव लेणें असें,

म्हणतिल 'झालें तरि हें कसें ?'


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ३ मार्च १९२६

स्वर्ग दोनच बोटें उरला !

चुंबणार तुला तोंची मुख हालविलेंस कीं,

आणि बिंबाधराजागीं चुंबिलें हनुलाच मी !

फसलों जरि मी ऐसा धीर ना तरि सोडतों;

स्वर्ग दोनच बोटें हा उरला मज वाटतो !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

पतंगप्रीत

तव पतंगप्रीत मजवरती
ही सोड, गडे आशा भलती !
गळ्यांत माझ्या जी झगमगते,
तेज जियेचें तुला भुलवितें,

माणिकमाला तुज जी गमते,
ते धगधगते लाल निखारे !
तूं मजसाठीं भोळीभाळी,
जाइजुंईची विणिशिल जाळी;

तुझी परंतू होइल होळी.
कुंज नसे हा असे सहारा !
स्पर्शे माझ्या कळ्या करपती,
मनास जडती जळत्या खंती.

त्यांत नको करुं आणिक भरती
दुरुन पाहिन तुझें उमलणें !
चांदरात तर कधिंच संपली,
काळरातिची वेळ उगवली;

मृत आशांचीं भुतें जमविलीं.
तूं आशा ! - तुज इथें न थारा.
पहा गुलाबी पहांट होइल,
कलिकारविकार सुखें खिदळतिल;

तुलाहि कितितरि रविकर मिळतिल,
कां कवळिसि मग अनलज्वाला ?
ही सोड, गडे आशा भलती;
तव पतंगप्रीती मजवरती !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ४ मार्च १९३८

मोरपिसें आणि कावळा

मिरवितों खोवुनी मोरपिसें पंखांत,

म्हणुनिया कावळे शिष्ट मला हंसतात.

परि देइन जर हीं फेंकुन रस्त्यावरती,

हे शिष्ट मनांतुन टपले उचलाया तीं !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २५ डिसेंबर १९३७

कागदी फुलें

किति तरी गुलाबें फुललीं ह्रुदयान्तरीं;

अर्पीन तुला तीं म्हणुनि खुडुनि ठेविलीं.

परि फुलांपरीसहि न्यारी कांहीं तरी,

ह्रुदयांतिल वाटे मला प्रीतिवल्लरी;

"क्षणभंगुर अंर्पू गुलाबपुष्पें कशीं ?

अमर ती वल्लरी अर्पिन कधिंतरि तुशी."

दोलयमानमति असल्या संशयतमीं

होऊन राहिलों अमर्याद काल मी.

कागदी गुलाबें सवंग घेउनि कुणी,

अर्पितां जाहलिस त्याची, मज सोडुनी !

काळजास डसले सहस्त्र विंचू मम,

जगणेंहि जाहलें कांहिं काल जोखम.

दुखवितां नाग उभवितो फणा आपुली,

उसळुनी तेंवि मम स्वत्ववृत्ति बोलली,

"कागदी फुलांवर भाळणार ती खुळी,

जाहली न तुझि हें भाग्यच तूझें मुळीं !"


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २० नोव्हेंबर १९३५

चालली मिरवणुक

चालली मिरवणुक गीतांची माझिया;

कुणि निळीं दूकुलें नेसलिं, कुणि मोतिया.

नादांचे नूपुर घालुनिया नाचती;

रंगीत भरजरी रुपकांत मिरवती !

पाहुनी झोंक हा कुतुक नयनिं थाटतें;

परि कुठें कांहितरि चुकलेंसें वाटतें !

मनिं विचार येई सत्व पहावें तरी,

वस्त्रे नि नूपरें काढुनि करुं खातरी.

हीं विवस्त्र उघडीं फिरतिल रस्त्यांतुन,

पाहतील सगळे रसिक चकित होउन !

कल्पना आगळी वाटतसे सोज्वळ,

गाणेंपण परि का गाण्यांचें राहिल ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १० ऑक्टोबर १९३४