सखे, बोल-बोल-

का सुंदरि, धरिसि आज असा अबोला?
मी काय सांग तव गे, अपराध केला?
का कोपर्‍यात बससी सखये, रुसून
माझ्याकडे न मुळि पाहसि गे हसुन?

का गाल आज दिसती अगदी मलुल,
की माझियाच पडली नयनास भूल!
तोंडावरी टवटवी लवलेश नाही,
ओठावरी दिसत लालपणा न काही!

का केश हे विखुरले सखये, कपाळी,
केलि न काय अजि वेणीफणी सकाळी?
भाळी न कुंकु विलसे, नथणी न नाकी,
हातातही न मुळि वाजति गोठवाकी!

कोठे तुझा वद असे शिणगारसाज,
का नेससी मलिन हे पटकूर आज?
ठेवुनिया हनुवटी गुडघ्यावरी ही
का एकटीच बसलीस विषण्ण बाई?

व्हावा तुला जरि असेल पदार्थ काही,
घे नाव-तो मग कुठे असु दे कसाही,
द्रोणगिरीसह जसा हनुमन्त येई,
बाजार आणिन इथे उचलून तेवी!

की आणसी उसनवार सदा म्हणून
शेजारणी तुजवरी पडल्या तुटून;
वाटून घेइ परि खंति मना न काही,
शेजारधर्म मुळि त्या लवलेश नाही !

भाडे थके म्हणुनि मालक देइ काय
गे आज 'नोटिस'? परी न तया उपाय !
घेऊन काय बसलीस भिकार खोली,
बांधीन सातमजली तुजला हवेली!

वाटेल ते करिन मी सखये, त्वदर्थ,
संतोषवीन तुज सर्व करून शर्थ!
टाकी परी झडकरी रुसवा निगोड!
दे सुंदरी मजसि एकच गोड-गोड

गेलो पुढे हसत जो पसरून हात,
तो ओरडून उठली रमणी क्षणात-
"व्हा-दूर चावटपणा भलताच काय?
स्पर्शू नका' कडकडे शिरि वीज हाय!!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें
वृत्त - वसंततिलका

पाहुणे

[कै. केशवसुतांची 'दवांचे थेंब' ही कविता वाचल्यानंतर पुढील विनोदी कवितेचे रहस्य लक्ष्यात येईल]

"कोठुनि हे आले येथें?
      काल संध्याकाळी नव्हते !!--"

पाहुणे पसरले ओटी-
     वरि बघुनी आज प्रभाती

आईला बाळ्या वदला
     कुतुकाने उत्सुकलेला.

"दिसती हे कोणी आले
     आपुल्याच नात्यामधले !

आई ग! तर वद माते
    कोठुनि हे आले येथे?

तंबाखू पाने खात
     कसे पहा बडबडतात !

उघडुनी डबा ग अपुला
       राजरोस करिती हल्ला!

बाबांच्या पेटीतुन गे
        पळविती विड्यांचे जुडगे!

मौज मला यांची वाटे
        होते हे तर वद कोठे?"

"हं हळू बोल-" तनयाते
         वर करुनी बोट वदे ते-

"कावळे, गिधाडे, घारी,
         येती ही जेथुनि सारी'

डोंगळे, डास, घुंगुरटी
          बाळा रे, जेथुनि येती;

खोकला, ताप ही दुखणी
        आपणास येती जिथुनी;

तेथुनीच आले येथे
         हे छळावया आम्हांते!"

"राहतील येथे का ते?
        अडवितील का ओटीते?

करतिल का भिंतीवरती
        ही अशी लाल रंगोटी

जातील कधी हे आई?
           घरदार न यांना काही?"

'नाही रे! ते इतुक्यात
          जाणार गड्या नाहीत!

जोवरी भीड आम्हांते
           जोवरी लाज न याते,

तोवरी असा बाजार
       सारखा इथे टिकणार !

चडफडने बघुई त्यांते
          असती ते जोवरि येथे!

टोळधाड कधि ही इथुनी
         जाणार न लौकर सदनी!"

'जाणार न लौकर सदनी!'
          वदता गहिवरली जननी;

पाहुणे मागले स्मरले,
          डोळ्यांतुन पाणी आले.

बहुतेक तयातिल आता
          जाहले कुठे बेपत्ता!

निगरगट्ट परि त्यामधला
         एक मात्र अजुनी उरला!

सरले जरि बारा महिने
         तरि बसे देउनी ठाणे!

"देवा रे" मग ती स्फुंदे
           "एवढा तरी जाऊ दे!"

म्हणुनि तिने त्या बाळाला
          तो महापुरुष दाखविला!

एकेक बघुनि त्या मूर्ती
          गोठली कवीची स्फूर्ती!

वेडावुनि तयाच नादे
          "खरेच," तो पुसतो खेदे,

"येती हे रोज सकाळी
          परि जाती कवण्या काळी?"


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

फूल, कवि, बाला आणि मासिक

[एक शोकपर्यवसायी कथा]

कुठे रस्त्यावर कुणी टाकलेले
कुणा कविच्या नजरेस फूल आले;
तडक घेई उचलून करी त्याते
(ब्रीद कविचे वेचणे जे दिसे ते!)
तोच दिसली मार्गात एक बाला,
(कवि प्रेमाचा नेहमी भुकेला!)
फुल अर्थात्‍ तिज द्यावयास गेला-
जीभ काढुनि ती फक्त दावि त्याला !
खूप रडला कवि (नेहमीप्रमाणे)
प्रेम-कविता लिहि (तरी चार पाने!)
मासिकाला पाठवी त्याच वेळी
हाय ! तीही साभार परत आली !!

                          -स-

प्रेमे ज्या कविता दिल्या परत त्वां संपादका, धाडुनी,
देतों ताबडतोब पाठवुनि त्या आता 'मनोरंजनी'
नाही वाटत खेदलेश उलटा आनंद वाटे मनी,
की त्या फाडुनि टोपलीत न दिल्या रद्दीत तू फेकुनी


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें
वृत्त - दिंडी

आम्ही कोण?

'आम्ही कोण?' म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी?
'फोटो' मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला?
किंवा 'गुच्छ' 'तरंग' 'अंजली' कसा अद्यापि न वाचला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी?

ते आम्ही - परवाङ्मयातील करू चोरुन भाषांतरे,
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी!
त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे!

काव्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,
दावू गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे,
दोस्तांचे घट बैसवून करु या आम्ही तयांचा 'उदे'
दुष्मानावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी!

आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होतील साप्ताहिके!
आम्हाला वगळा-खलास सगळी होतील ना मासिके!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कवीची 'विरामचिन्हे'

('विरामचिन्हे' चे विडंबन)

जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला,
जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला,
तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !

झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका?
याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?
रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल?
सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल!

अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली !
कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये !

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी !
माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !
त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन !

डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी
ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी -
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,
देवा, 'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला?


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

त्याचें काव्यलेखन

शाई, कागद, टांक, रूळ, रबरे इत्यादी लेखायुधे
(काड्या आणि विड्या तशा!) जमवुनी खोलीत तो बैसला!
स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधी त्याजला-
"काव्याची उठवीन मी दसकडी या बैठकीला!" वदे!

टाकी बंद करून सर्व खिडक्या-जाळ्या, झरोके तसे
दारालाही तशीच लावित कडी आतूनबाहेरुनी!
दोस्ताला कुठल्यातरी बसविले दारावरी राखणी;
"काव्याची बघतो मिजास!" वदला अस्पष्ट काही असे!

आता कंबर बांधुनीच कवने 'पाडावया' तो बसे
वार्ता ही वणव्यासमान पसरे गल्लीत चोहीकडे!
आले धावुनि लोक सर्व! दुसरे कोणा सुचावे कसे?
चिंताक्रान्त मुखे करूनि बसले निःस्तब्ध दारापुढे!

झाला तब्बल तास! चाहुल परी काही न ये आतुनी,
सर्वांचा अगदीच धीर सुटला! कोमेजले चेहरे!
भाळी लावुनि हात कोणी वदती "मजी प्रभूची बऽऽरे!"
दृष्टी खिन्नपणे नभी वळवुनी निःश्वास टाकी कुणी!

गंभीर ध्वनि तोच आतुनि निघे! उंचावली मस्तके!
श्वासोच्छ्वास क्षणैक थांबत! मुखे रुंदावली कौतुके!
डोकावूनि बघे फटींतुनि कुणी-तो त्या दिसे अद्‌भुत!
होता बाड उरी धरून पडला निश्चित तो घोरत!!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कुणाच्या खांद्यावर

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ?

कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे

दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे

अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे


कवी /गीतकार    -    आरती प्रभू
संगीत    -    भास्कर चंदावरकर
स्वर    -    रवींद्र साठे
चित्रपट    -    सामना

चांदराती खाडीच्या किना-यावर

निळ्या नभावर गिरिराजांची काळिभोर आकृती ,

उमटली चांदण्यात मोडती.

कांठाच्या नारळी ज्योत्स्नेंतुनि रंगति;

नस्तांत झपूर्झा ऊर्मी या खेळ्ती;

काठांस शुभ्र शुभ्र फेनहार अर्पिती !

नौका काळ्या 'डबक डबक ' या जळावरी डोलती;

मर्मरत ऊर्मि तयां चुंबिती !

वाळवंटिं पसरल्या वाळुच्या लहरी लहरी किती !

हि-यासम कण मधुनी चमकती !

युगेयुगें घेउनी लोळण पायावरी,

गिरिकडे कशाची सागर विनती करी ?

गंभीर न बघतो वळुनि मुळीं हा गिरी !

दुःख गिळुनिया अंतरिं सिंधू फेंसाळे परि वरी,

हांसतो निराश जणु वरिवरी !

चराचरावरि शुभ्र रुपेरी मोहन हें पसरलें,

मोहने जीवभाव भारले ;

अस्मान वर्षतें शीत धवलता अशी;

नसनसांत थरके लहर थंड गोडशी;

कुणि जवळ बसावें बिलगुनिया छातीशीं !

चांदरातिच्या कोंदणांत दिक्काल विसरुनी असें,

पडावें स्पर्शसुखीं धुंदसें !

दिव्य कुणी यक्षिणी येऊनी सौंदर्यक्षण असा,

अक्षयीं ठसविल का गोडसा !

चांदणें असेंच्या असें फुलुन राहिल,

गिरिपदीं स्थिरावुन राहिल सिंधूजल,

वक्षावर माझ्या मान तिची निश्चल !

भावि युगें विस्मयें पाहतिल कोरिव लेणें असें,

म्हणतिल 'झालें तरि हें कसें ?'


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ३ मार्च १९२६

स्वर्ग दोनच बोटें उरला !

चुंबणार तुला तोंची मुख हालविलेंस कीं,

आणि बिंबाधराजागीं चुंबिलें हनुलाच मी !

फसलों जरि मी ऐसा धीर ना तरि सोडतों;

स्वर्ग दोनच बोटें हा उरला मज वाटतो !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

पतंगप्रीत

तव पतंगप्रीत मजवरती
ही सोड, गडे आशा भलती !
गळ्यांत माझ्या जी झगमगते,
तेज जियेचें तुला भुलवितें,

माणिकमाला तुज जी गमते,
ते धगधगते लाल निखारे !
तूं मजसाठीं भोळीभाळी,
जाइजुंईची विणिशिल जाळी;

तुझी परंतू होइल होळी.
कुंज नसे हा असे सहारा !
स्पर्शे माझ्या कळ्या करपती,
मनास जडती जळत्या खंती.

त्यांत नको करुं आणिक भरती
दुरुन पाहिन तुझें उमलणें !
चांदरात तर कधिंच संपली,
काळरातिची वेळ उगवली;

मृत आशांचीं भुतें जमविलीं.
तूं आशा ! - तुज इथें न थारा.
पहा गुलाबी पहांट होइल,
कलिकारविकार सुखें खिदळतिल;

तुलाहि कितितरि रविकर मिळतिल,
कां कवळिसि मग अनलज्वाला ?
ही सोड, गडे आशा भलती;
तव पतंगप्रीती मजवरती !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ४ मार्च १९३८

मोरपिसें आणि कावळा

मिरवितों खोवुनी मोरपिसें पंखांत,

म्हणुनिया कावळे शिष्ट मला हंसतात.

परि देइन जर हीं फेंकुन रस्त्यावरती,

हे शिष्ट मनांतुन टपले उचलाया तीं !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २५ डिसेंबर १९३७

कागदी फुलें

किति तरी गुलाबें फुललीं ह्रुदयान्तरीं;

अर्पीन तुला तीं म्हणुनि खुडुनि ठेविलीं.

परि फुलांपरीसहि न्यारी कांहीं तरी,

ह्रुदयांतिल वाटे मला प्रीतिवल्लरी;

"क्षणभंगुर अंर्पू गुलाबपुष्पें कशीं ?

अमर ती वल्लरी अर्पिन कधिंतरि तुशी."

दोलयमानमति असल्या संशयतमीं

होऊन राहिलों अमर्याद काल मी.

कागदी गुलाबें सवंग घेउनि कुणी,

अर्पितां जाहलिस त्याची, मज सोडुनी !

काळजास डसले सहस्त्र विंचू मम,

जगणेंहि जाहलें कांहिं काल जोखम.

दुखवितां नाग उभवितो फणा आपुली,

उसळुनी तेंवि मम स्वत्ववृत्ति बोलली,

"कागदी फुलांवर भाळणार ती खुळी,

जाहली न तुझि हें भाग्यच तूझें मुळीं !"


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २० नोव्हेंबर १९३५

चालली मिरवणुक

चालली मिरवणुक गीतांची माझिया;

कुणि निळीं दूकुलें नेसलिं, कुणि मोतिया.

नादांचे नूपुर घालुनिया नाचती;

रंगीत भरजरी रुपकांत मिरवती !

पाहुनी झोंक हा कुतुक नयनिं थाटतें;

परि कुठें कांहितरि चुकलेंसें वाटतें !

मनिं विचार येई सत्व पहावें तरी,

वस्त्रे नि नूपरें काढुनि करुं खातरी.

हीं विवस्त्र उघडीं फिरतिल रस्त्यांतुन,

पाहतील सगळे रसिक चकित होउन !

कल्पना आगळी वाटतसे सोज्वळ,

गाणेंपण परि का गाण्यांचें राहिल ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १० ऑक्टोबर १९३४

मी करितों तुजवर प्रेम

मी करितों तुजवर प्रेम असें म्हणतात;

परि प्रेमाची ही नवीच कांहीं रीत !

तव प्रेमजलामधिं खोल खोल जों बुडतों,

मम द्वेषवन्हि तों अधिकच भडकत जातो !

कुणि म्हणती किति तव टपारे डोळे काळे;

मज वाटति उघडे दोन विषाचे प्याले !

जइं दावित अपुले शुभ्र दांत तूं हंसशी,

तव कृष्णह्रुदयजलफेन गमे तो मजशीं !

मी तुला बाहतां दूर पळुनिया जाशी !

परि सोडुनि जातां घट्‌ट कवळुनी धरिशी !

हंसुनिया चुंबितां उदास होउनि रडशी ;

मी अश्रु गाळितां खदखद मजला हंससी !

मगरीपरि भक्षक असे तुझी गे प्रीती;

पहिलीच साधुनि संधी मी सोडिन ती !

मी करिन कांही तरि वाटत होतें जगतीं;

तूं येउन माझी केलिस माती माती !

किति मोह होतसे रोज मला अनिवार,

कीं कटयार घेउनि तुला करावें ठार !

मारीन खरा छातींत तुझ्या खंजीर,

माझाच परंतू फाटुन जाइल ऊर !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १२ सप्टेंबर १९३३

लालबावटयाचें गाणें

"असेंच हें चालायाचें

गरिब बिचा-या दलितांचें ;

जगताच्या सौख्यासाठीं

मरती ते अर्ध्यापोटीं.

हा देवाघरला न्याय,

इलाज त्यापुढती काय ?"

चोरांचें तत्वज्ञान

ऐकुनि हें किटले कान.

संत आणखी सरदार

चोरांचे साथीदार !

अन्नवांचुनि जे मरती

उपास त्या शिकवा म्हणती !

व्याघ्रसिंह धांवुनी येतां

जीवास्तव त्यांशीं लढतां,

करुं नका हिंसा अगदीं !

कोंकरांस सांगति आधीं !

समतेची पोपटपंची

जपमाला मधु तत्वांची,

शक्त नसे करण्या कांहीं

दलित सदा दलितच राही.

क्रान्तीचा रक्तध्वज तो

दृष्टिपुढें फडफडत येतो.

दलित जनीं उसळत थोर,

शक्ति असे अपरंपार;

ती सारी केंद्रित करुनी

रक्तध्वज पुढतीं धरुनी

जुलुमाचें उखडूं मूळ,

ढोंग्यांचें काढूं खूळ !

लाखांचें मारुनि पोट,

चाटित जे बसले ओंठ,

त्या चौरां हतबल करुनी,

सर्वस्वा त्यांच्या हरुनी,

लोकांचें सर्वस्व असें,

लोकां देउनि टाकुं कसें !

वसुंधरामाई अमुची

चोरुनि जे बसले त्यांची

हिरावुनी शक्ती घेऊं

लोकांचें लोकां देऊं !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ७ ऑगस्ट १९२९

फासावरुन

हा प्रणाम भारतमाते

घे शेवटला बाळाचा । माय भू ।

ही थोडी प्रियतम माती

ह्रुदयीं धरितों दो हातीं । घट्ट गे.

जरि असल्या चरणीं बेडया

विसरशील का मज वेडया । कधि तरी ?

इतरांस

दुष्ट दैत्यांस

भासलों खास

जरी द्रोही मी-नाहलों तरी तव

प्रेमी । उत्कट !

मज नको स्वर्ग सुखधाम

चिंतीन सदा तव नाम । गोडसे.

मरणाची भीती कोणा ?

देशद्रोही षंढाना । भेंकडा !

देशार्थाचि जन्मा आलों

देशार्थाचि स्वर्गी गेलो । हांसत !

हे प्राण

देशनिर्वाण

मायभूत्राण

कराया नाही-वेंचिले जयें

लवलाही । धिक्‌ तया !

दे जन्म हजारों मजला

स्वातंत्र्यास्तव लढण्याला । देशि या.

पाहतोंच डोळे भरुनी

रुप गे तुझे प्रिय जननी । एकदां !

बघु नकोस केविलवाणी

मजकडे दीन नयनांनी । देवते !

स्वातंत्र्य

दिव्य हा मंत्र

स्फुरवि जरि रक्त

तुझ्या बाळांचे-दिन पूर्ण

स्वातंत्र्याचें । जवळची

या शेवटल्या घटिकेला

दिसतसे भावि तव काळ । मज गडे !

स्वातंत्र्याच्या उद्यानीं

फिरतांना दिसशी जननीं । वैभवी.

करितांना तव प्रिय काज

देहास ठेवितों आज । धन्य मी !

पाहुनी

प्रेत मम कुणी

थरकला जनीं

देशभक्तीनें-तरि धन्य धन्य मम

मरणें । जाहले !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

कोणि म्हणती

कोणि म्हणती कसलिं ही प्रतिभेस घेसी बंधनें ?

चांदराती आणखी तीं वल्लभेचीं चुंबनें----

---टाकुनी हें काय गासी रुक्ष, कर्कश, रांगडें ?

शेणमातीचीं खुराडीं आणि रंकांचे लढे !

राव सत्तावंत किंवा दास मध्यमवर्गिय,

गा गडया, त्यां खूष करण्या गान तूझें स्वर्गिय !

तीं तुझीं गुलगूल गाणीं ऐकुनी विसरावया---

---लाव रंकां झुंज जी लढतात ते सत्ता-जया !

वल्ल्भा जाईल माझी मीहि माती होइन;

रंकरावांची रणें इतिहास टाकिल तोडुन.

आणखी उगवेल साम्याची उषा जगतांत या;

काय ते म्हणतील काव्या त्या क्षणीं या माझिया ?

मानवांचे पुत्र लढले, आणि तुटलीं बंधनें;

गाइला हा चांदरातीं वल्लभेची चुंबनें !

क्रांतियुध्दाची चढाई आज जर ना गाइन,

मानवी इतिहास का देईल फिरुनी हा क्षण ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ९ ऑगस्ट १९३३

दोन देवभक्त

होतीं चार धुरांडि ओकत ढगें काळ्या धुरांचीं जिथें,

संपाग्नी भडकून ना चिलिमही सोडी धुरांतें तिथें!

तेंव्हां मालकही मनीं गिरणीचा झाला बहू रंजित;

सारें एकावटून चित्त मग तो देवा बसे प्रार्थित.

"केली दोन कलक रोज बसुनी पूजा तुझी भक्तिनें

वस्त्रें घालुनि मख्मली, किति तुला मीं घातले दागिनें !

होतां वृध्द मदीय राख तिजला देतों जरी टाकुनी,

नाही का तव मंदिरें दिधलिं मीं नांवें तिच्या बांधुनी ?

होत्या चार स्वयंगती परि अतां मीं ठेविल्या दोन ना !

माझे हाल कसे तुझ्या बघवती देवा, खुल्या लोचना ?

आतां कांहिं तरी असें कर जयें मालास या भाव ये

टक्के आठ करुनि काट मजुरी, बांधीन रुग्णालयें."

होता त्याच क्षणीं कुणीं मजुरही देवाकडे पाहत

डोळे लाल करुनि, मूठ वळुनी मूर्तीस त्या साङत.

"तेथें त्या बघ गोघडींत पडलें अन्नाविणें कुंथत,

माझे बाळ तयास ना मिळतसे रे, खावयाला शित !

वाहोनीं तुजला फुलें फुकटचा पैसा हरुं गांठचा;

गाडया दोन मजेंत तो उडवितो आहे धनी आमुचा !

आकाशांतिल पोलिसा ! छळिसि कां दीनांस आम्हां बरें

देतो टाकुनि मूर्ति ही गिरणिच्या काळ्या धुरांडयांत रे !"


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १४ जुलै १९३२

कवने

जुनी पटकुरें अङ्गीं धरुनी

पाउसचिखलीं वणवण खपुनी,

शेतकरी तो फुलवी अवनी'

परी उपाशी बाळें त्याची ।

धान्य खाउनी तेंच पोटभर.

सुखे त्यावरी देउन ढेंकर,

पुष्ट प्रियेचा करि धरुनी कर,

गात असूं किती गोंड्स कर हा ।

यंत्रशक्तिची प्रचंड घरघर,

दमही न घेता मजूर क्षणभर,

वस्त्र विणितसे त्यावर झरझर

रक्ताळ्ति मग डोळे त्याचे

वस्त्र जरा तें जाड म्हणोनी

रुसुनि प्रिया तें देई फेकुनि

क्रुध्द तिच्या ये लाली नयनी

त्यावर आम्ही गाऊं कवने

शंभरातील नव्वद जनता

धुरकटलेल्या कोंदट जगता

'घरे' म्हणोनी त्यांतच कुजतां

औषधास त्या चंद्र ना दिसे ।

आकाशातील तारासंगे

विलासी शशी प्रेमे रंगे,

कृष्ण्मेघ तो येउनि भंगे-

-प्रणय तयाचा, रडतों आम्ही ।

अपुरी भाकर चट्ट खाउनी

रडति आणखी हवी म्हणोनी

कामकर्‍यांच्या मुलांस जननी,

अश्रु दाबुनी नाही म्हणते.

मुर्ख कुणी तरि जोबनवाली,

खुशालचेंडुस ' नाही ' वदली

हृदयिं तयाच्या आग पेटली,

त्यावर शिंपू काव्यजलाला ।

नक्षत्रांची , फुलाफळांची ,

कृष्णसख्याच्या व्याभिचारांची

आणिक झुरत्या युवयुवतींची

खूप जाहलीं हीं रडगाणीं

धनीजनांशीं झुंज खेळुनी

क्षणभर ज्यांना आली ग्लानी

त्यांना आम्ही गाऊं गाणी

ऐकुनि जीं चवताळुनि लढतिल

आणि स्थापितिल सत्ता अपुली


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३० ऑक्टोबर १९३१

बेगमेच्या विरहगीता'ला शिवाजीचें उत्तर

मज पाहुनी तुवा गे । लिहिलेंस बेगमे तें

अड्खळत वाचुनीयां । आनन्द होई माते.

ते ' नाथ ' आणि ' स्वामी ' । मज सर्व कांहि उमजे

इश्की, दमिश्कि, दिल्नूर । कांहीच गे, न समजे ।

जरि या मराठमोळ्या । शिवबास बोधा व्हावा,

तरि फारशी-मराठी । मज कोश पाठवावा


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३ जुलै १९२८

लग्नघरातील स्वयंपाकिणींचें गाणे



कुणि नाही ग कुणी नाहीं
आम्हांला पाहत बाई ।
झोंपे मंडळि चोंहिकडे ,
या ग आतां पुढे पुढें
थबकत, थबकत
'हुं' 'चूं' न करित,
चोरुं गडे, थोडे कांही
कोणीही पहात नाही ।



या वरच्या माळ्यावरतीं
धान्याची भरलीं पोतीं,
जाउं तिथें निर्भय चित्तीं
मारूं पसे वरच्यावरती.
उडवुनि जर इकडे तिकडे
दाणे गोटे द्याल गडे
किंवा चोरुनि घेतांना
वाजवाल जर भांड्यांना,
जागी होउन
मग यजमानिण
फसेल सगळा बेत बरें ।
चळूं नका देऊं नजरे



एखादी अपुल्यामधुनी
या धंद्यांत नवी म्हणुनी
लज्जामूढा भीरुच ती
शंसित जर झाली चित्तीं
तर समजावुनि
अथवा भिववुनि
धीट तिला बनवा बाई,
करुं नका उगिचच घाई.



आशा ज्या वस्तुचि चित्तीं
तीच हळुच उचला वरती.
डब्यांत जर थोडे असलें
घेउं नका बाई , सगळे,
मिळे म्हणोनी
उगाच लुटुनी
यजमानिण जरि ती बाला,
करूं नका शंकित तिजला.



जपून असले खेळ करूं
ओटिंत जिन्नस खूप भरू.
लागतां न कोणा वास
'हाय' म्हणुनि सोडूं श्वास
प्रभातकाळी
नामनिराळीं
होउनियां आपण राहूं
लोकांच्या मौजा पाहुं ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

कोळ्याचें गाणे

आला खुशींत् समिंदर , त्याला नाही धिर,

होडीला देइ ना ठरू,

ग सजणे , होडीला बघतो धरूं ।

हिरवं हिरवं पाचूवाणी जळ,

सफेत् फेसाचि वर खळबळ,

माशावाणी काळजाची तळमळ

माझि होडी समिंदर , ओढी खालीवर,

पाण्यावर देइ ना ठरू,

ग सजणे, होडीला बघतो धरूं ।

तांबडं फुटे आभाळान्तरीं,,

रक्तावाणी चमक पाण्यावरी,

तुझ्या गालावर तसं काइ तरी ।

झाला खुळा समिंदर , नाजुक होडीवर,

लाटांचा धिंगा सुरू,

ग सजणे , होडीला बघतो धरु ।

सुर्यनारायण हंसतो वरी,

सोनं पिकलं दाहि दिशान्तरीं,

आणि माझ्याहि नवख्या उरीं ।

आला हांसत समिंदर , डुलत फेसावर,

होडिंशीं गोष्टी करूं,

ग सजणे, होडीला बघतो धंरु ।

गोर्‍या भाळी तुझ्या लाल चिरी ,

हिरव्या साडीला लालभडक धारीं,

उरीं कसली ग. गोड शिरशिरी ?

खुशी झाला समिंदर, त्याच्या उरावर,

चाले होडी भुरुभुरु ,

ग सजणे, वार्‍यावर जणुं पांखरु ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १७ जानेवारी १९२८

तिमदन

तिजला जणू छबि आपुली रतिची दुजी प्रत वाटते,

मदनाहुनी तिळ्ही कमी निजरूप त्या नच भासतें

नवयौवनी दोघें जंई हीऊ एकमेकां भेटती,

'जय आपुला ' ही खातरी दोघेहि चित्तीं मानिती .।

निजरूपमोहिनिजालका पसरावया ती लागतें,

गुलगूल कोमल बोलणी फ़ांसे तयाचे गोड ते ।

' जय आपुला '- दुसरा गडी झाला पुरेपुर गारद,

मनिं मानुनीं हे पारधी करिती परस्पर पारध ।

राजा निसर्गा सर्व ही अति थोर गम्मत वाटते ,

विजयोत्सवी दोघां बघु अनिवार हासूं लोट्तें ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २ जानेवारी १९२७

दोन चुंबने

पूर्णेन्दू पिवळा हळू हळु असे झाडावरी ठेपला,

झाडे सर्सर्नाद गूढ करिती-एकान्तही वाढला.

तेंव्हा येऊनिया जुन्या स्मृति मनी हो वृत्ति वेडीखुळी,

प्रेमाची दुसरी धनीण अरला होती परी लाभली.

प्रीतीचा पहिला बहार नवलें होता जिला अर्पिला,

मूर्ती येइनि आज मन्मनि तिची झाले कसेसें मला.

तेव्हा ही पहिलीच ती समजुनी वेगे हिला चुंबिले ।

'आहा' , प्रेमभरे वदे , ' मर किती प्रेमात आलिंगिलें ।'

भोळा भाव हिचा बघुन नयनीं झाली उभी आसवें,

आणि चुम्बुनिया हिला पुनरपी प्रेमास केले नवे ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २१ एप्रिल १९२७

माझे गाणें

वसुधामाई माझी जननी, हृदयिं तिच्या बिलगुन,
सदा मी जगालाच गाइन.

बाळांच्या गोंडस गालांचे चुंबन,
युवतीयुवकांचे सुगाढ आलिग्ङन ,
वृध्दांच्या प्रेमळ अश्रुंचें सिंचन,
सारें माझ्या गानिं साठवे घ्या, घ्या , तें वाटुन,
सदा मी जगालाच गाइन.

प्रेमाचा मी सागर, आणिक वैराचा डोग्ङर,
दयाळू आणिक अति निष्ठुर.
अर्भकांवरी आपुलें शौर्य दावुन
अबलांना दुबळ्या जुलमाने गांजुन,
सत्तेचे चाबुक गरिबांवर ओढुन,
अश्रु उधळीले जगतीं कोणी, त्यांना मीं शापिन,
सदा मी जगालाच गाइन .

अज्ञाताच्या अमर्याद या दर्यावर भडकुन ,
चालले मानवताजीचन,
दैवाच्या लाटा येउनिया कोठुन
सवंगडी आपुले टाकितील उलथुन
हें मनांत माझ्या राहि कसें डांचुन
म्हणुनिच माझें विसरुनि ' मी' पण, प्रेमाने रंगुन
सदा मी जगालाच गाइन.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ६ फेब्रुवारी १९२७

एकाचे गाणें

कैदि कुणी , घोर भयद वेड्यांनी

बध्द असे परि आनन्दे हासे

मी म्हटले, "हांसे , बा हें कसलें ? "

वेडीला दावुनिया मज वदला,

"सोन्याचीं, वलयें बघ मोलाची । "

वदुनि असें, आनन्दें तो हांसे ।

परि मजला मृत्युविवशसा दिसला ।

गहिंवरलों आणिक त्याला वदलों

" तोडुनियां, टाकूं का बेड्या या ? "

क्रुध्द झणी - होवुनियां तो हाणी,-

-बेडया त्या डोक्यावरती माझ्या ।

रक्ताने भिजलीं माझी वसनें,

परि त्याला बेडितुनीं सोडविला ।

कळवळला कृतज्ञतेने रडला ।

पुष्पांनीं पूजा माझी करुनी,

प्रतिदिवशी, गातो स्तुतिगीतांसी ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २२ नोव्हेंबर १९२६

चंदाराणी

निळ्या निळ्या आकाशांत

शोधाया आलें नाथ.

शुभ्र ढगांचा-

-मऊ पिसांचा

करुनि गालिचा,

जरा पहुडलें त्यावरती

घेण्याला क्षण विश्रांती.

चैन मुळीं नच पडे परी;

तशीच फिरलें माघारीं.

मेघनगांच्या घनकुहरीं

धुंडधुंडिलें किती तरी !

चपला येउनि मजजवळी,

'शोधाया जातें ' वदली.

इथें पळाली,

तिथें भटकली,

पुन्हा चमकली;

चंचल परि त्या बालेला

तो कुठचा गवसायाला !

मग म्हटले जावें आतां,

पाताळीं शोधित नाथा.

शोधुनि दमलें,

विकल जाहलें,

तेज पळालें;

अश्रूंचा वाहे पूर !

जीवाभावाच्या सखया

तारा भेटाया आल्या.

त्या मधल्या वदल्या कोणी,

'नका भिऊं, चंदाराणी !

जलधीमध्यें शिरतांना,

दिसला आम्हां रविराणा.'

ऐकुनि त्यांच्या वचनाला,

किति उठल्या झणिं जाण्याला.

रविरायाला

शोधायाला

जलधितळाला,

उडया पटापट त्या घेती

जीवाची सोडुनि भीती !

किती जाहलीं युगें तरी,

अशीच फिरतें पिशापरी !

प्रेमामृत जोंवरि जवळी,

आशा तोंवर ना सुटली !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ९ नोव्हेम्बर १९२२

नळावर तणतणून भांडणार्‍या एका बाईस

बाई ही रणरंगाची खाणी । धुणार्‍या बायांची ही राणी ।

लागली भांडण्या सहज मांजरावाणी

शिव्या दे अस्स्ल शुध्द मराठी ; । जमवि किति लोकांची ही दाटी ।

पडसाद अजूनी घुमती चाळीपाठी.

आधिंच गोड जनानी गळा, । कोंवळा खुले-चढे - मोकळा .

त्यांतून वश हिला भाण्डायाच्या कळा !

समजुनी देइ शिव्या दिल्‍रंगी । साथ करि चुरशीने तिचि मुलगी,

भोकांड पसरि गाढवीपरी तन्वंगी.

पायी निर्‍या न क्षणभर ठरती । पाउलें तालावर थयथयती.

शब्दांस अभिनयीं विशद करी ही सुदती.

तनू ही वेताची ज्णुं छडी । घवघवे माशी जणुं फांकडी ।

भांडणीं फडफडे नभीं जशी वावडी

दाखवी हातवार्‍यांचि चलाखी । कांही न बंद इच्या पोशाखी ;

गिर्कीस विस्तरे पदर- हातिं ना वाकी ।

कांति तर काळी काजळ जशी । सञ्चुकी कसली ठावि न मशी ।

ही कोण अवत्रे ? - पहा येउनी अशी ।

धीट ही परि नखरा भ्रूलीला, । दावण्या वेळ न या वेलीला ।

नयनिं या बटबटित रागच भरुनी उरला ।

नळावर गर्दि - चाळ हो सुनी,। हवेमधिं सिव्यागंधमोहनी,

लोकांस सहजची वाटे मनिं ओढणी.

गर्दिचा जीव हले वरखालीं। शांतता गाढ काय भवतालीं ।

तों चावट कुणि दे शाबाशीची टाळी ।

वाहवा ऐकुन मुळिं ना लाजे । क्रोध त्या काळ्या गालिं विराजे

किति उजू भयंकर नजरफेंक ही साजे ।

मुखांतुनि शिव्याशाप ही वाही, थारा शान्ततेस इथ नाही,

भाबडीसाबडी भांडकुदळ केवळ ही ।

निरागस अविट शिव्यांची झरी । गुणी तूं खचित काव्यमंजरी ।

लोट्ला वीररसाचा मजा । गमशि तूं अव्वल मजा सारजा !

धडकीवर धडकी देशी मम काळजा.

वन्‍द्य तूं खचित सदा मजलागीं । किति तुझी जात जगांत अभागी ।

घे कृतज्ञतेची अमोल तूज बिदागी ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २ जानेवारी १९२७

दिवाळी, तो आणि मी

दीपांनीं दिपल्या दिशा !--सण असे हा आज दीपावली.

हर्षानें दुनिया प्रकाशित दिसे आंतूनि बाहेरुनी !

अंगा चर्चुनि अत्तरें, भरजरी वस्त्रांस लेवूनियां,

चंद्र्ज्योति फटाकडे उडविती आबाल सारे जन.

पुष्पें खोवुनि केशपाशिं करुनी शृंगारही मङल,

भामा सुंदर या अशा प्रियजनां स्नाना मुदे घालिती.

सृष्टी उल्हसिता बघूनि सगळी आनंदलें मानस,

तों हौदावर कोणिसा मज दिसे स्नाना करी एकला;

माता, बन्धु, बहीण कोणि नव्हतें प्रेमी तया माणुस;

मी केलें स्मित त्यास पाहुनि तदा तोही जरा हांसला.

एखाद्या थडग्यावरी धवलशीं पुष्पें फुलावी जशीं,

तैसें हास्य मुखावरी विलसलें त्या बापडयाच्या दिसे !

तो हांसे परि मद्‌ह्रुदीं भडभडे, चित्ता जडे खिन्नता;

नाचो आणिक बागडो जग, नसे माझ्या जिवा शांतता !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ४ नोव्हेंबर १९२६

प्रेमळ पाहुणा

निरोप द्याया कुणा पाहुण्या आलिं सर्व धांवून,

परी कुणीशी दिसे न म्हणुनी मनीं मुशाफिर खिन्न.

वृध्दांचा, बाळांचा घेउनि निरोप जों वळणार,

सहजच गेली अतिथीची त्या दारावरती नजर.

दारामागुनि पहात होते डोळे निश्चल दोन,

जरा खुले, परि क्षणांत झालें दुःखित त्याचें वदन.

"दोन दिवस राहिला परी या लळा लागला अमुचा !"

पिता वदे त्या दारामागिल डोळ्यांच्या धनिनीचा !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १ जानेवारी १९२७

एक करुणकथा

असे दुहिता श्रीमन्त पित्या कोणा;

असति त्याचे तिजवरी बेत नाना.

गोष्टि साङे तरुणास कुणा एका;

तरुण जोडी ती बघे एकमेकां !

"लग्न, नवरे या झूट सर्व गोष्टी,

खूप शिकवोनी करिन इला मोठी !"

पित्यामागें राहून उभी कन्या,

कटाक्षांनीं खुणवून होइ धन्या !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १ जानेवारी १९२७

जइं भेटाया तुज

जइं भेटाया तुज आतुर होतों ह्रुदयीं,

मनिं मधु-आशांची उभी मयसभा होई !

किति रंगवितें मन मधु-चित्रें भेटीचीं,

योजितें किती बोलणीं ललितगमतीचीं !

परि जवळ जवळ तव दाराशीं जों येतों,

भय भरुनि अकारण जीव कसा थरथरतो !

पायांचीं मोजित नखें दृष्टिनें बसशी,

अनपेक्षित लाजत कांहिं तरी पुटपुटशी;

मग शेखमहम्मदि बोलांना विसरुन,

कांहीं तरि तुटकें जातों मी बोलून !

परततों कसासा उदास मनिं होऊन;

'प्रीति' ती हीच का, बघतों अजमावून !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३ नोव्हेंबर १९२६

प्रीति

'प्रीती काय ?' म्हणून कोणि पुसतां, मी बोललों हांसुनी,

'बाला कोणिहि पाहुनी तिजसवें तें बोलणें हांसणें.

येवोनी गृहिं जेवणें, मग पुन्हा निष्काळजी झोपणें !'

आतां प्रीती कळे तदा पुनरपी हे बोल येती मनी.

चक्रव्यूह असे पहा विरचिला हा प्रीतिचा सुंदर,

वेडे होऊनि आंत आम्हि घुसतो--कांहीं न आम्हा कळे !

जीवाला भगदाड खोल पडुनी हा जीव जेव्हां वळे,

तेव्हां त्यास कळे पुन्हा परतणें झालें किती दुष्कर !

देवालाहि उठून निर्भय जयें आव्हान तें टाकणें,

प्रीतीनें परि कोंकरु बनुन तो, हो दैववादी जिणें !

कांहीं रम्य बघून, शब्द अथवा ऐकूनियां वेधक,

जीवानें उगिच्या उगीच बसणें होऊन पर्युत्सुक !

इष्टप्राप्तित जी सुधा, जहर जी त्यावांचुनी होतसे,

'प्रीती प्रीति' म्हणूनि नाचति कवी ती हीच प्रीती असे !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३० सप्टेंबर १९२६

जेव्हां चिंतित

जेव्हां चिंतित मी मनांत बसतो माझ्या तुझ्या प्रीतितें,

तेव्हां दावित भीति ठाकति पुढें तीं बंधनें धार्मिक ;

प्रीतीच्या परि सृष्टिनिर्मित अशा धर्मापुढें पावक,

अस्वाभाविक बंधनें सहजची तोडीनसें वाटतें.

हे सारे तुटतील बंध सहसा धार्मीक सामाजिक;

आईच्या परि भाबडया दुखुवुं का जीवास मी प्रेमळ,

सारीं तोडुनि बंधनें सुखविण्या माझ्या जिवा केवळ ?

आईचाहि विचार पार पळ्वी मूर्ती तुझी मोहक !

अंतश्र्वक्षुपुढें परंतु सहसा ये मातृमूर्ती तदा,

जन्मापासुनि हाल सोसुनि मला जी वाढावी माउली;

माझ्या मात्र कृतघ्न नीच ह्रुदया ती कोणि ना वाटली !

हातांनीं मुख झांकिलें---मज गमे ती वृत्ति लज्जास्पदा.

दीना, वत्सल माय चित्तनयनां तेव्हां दिसूं लागली;

दुःखाचे कढ येउनी घळघळा अश्रूजळें वाहलीं.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १८ सप्टेंबर १९२६

मीं म्हटलें गाइन

'मी म्हटलें, गाइन तुलाच गीतशतांनीं;
ह्रुदयाची वीणा म्हणुनी ही लावोनी,

भिरिभिरी गाइलीं गीतें तव प्रीतीचीं;
मज दिनें वाटलीं अशीच हीं जायाचीं.

जीव हा लावुनी तुझिया जीवावरती,
म्हटलें मी, जडली तुझीहि मजवर प्रीती.

चित्तीं शंकेचीं परी वादळें उठती;
झगडतां जिवा या अनन्त खन्ती जडती.

तिमिरांतुनि कुणि ही दुसरी तारा हंसते,
क्षणभरी तुझी मग विस्मृति मजला पडते !

या नवतारेचीं गीतें गाण्या उठतों;
ह्रुदयाची वीणा छेडाया जों जातों,

तों जुनीच गाणीं वीणेवरती येती !
लज्जेनें दुःखद पीळ जिवाला पडती.


परि प्रीत असे फुलपांखरु गोजिरवाणें;
औदासीन्याच्या हिमांत तें ना जगणें !

त्या हवें स्मिताचें ऊन कोवळें जगण्या,
आणिक चुंबनमधु स्वैरसुखानें लुटण्या !

तव सौदर्याची जादु न आतां उरली ;
तव जादू कसली !--भूल मला ती पडली !

माझ्याच प्रीतिचे रंग तुझ्यावर उठले;
त्यांतून तुझें मज रुप जादुचें दिसलें !

ही दो ह्रुदयांविण जादु न चालायाची;
प्रीत ना अशी वा-यावर वाढायाची !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २८ मे १९२७

प्रीतीची त-हाच उलटी असे !

सौंदर्याचे तुझ्या पवाडे गाती हे येउनी;

ऐकतों हांसत मनिच्या मनीं !

मूक राहुनीं सर्व ऐकतों, कांहि न वदतों परी,

बोलतों दुसरें कांही तरी !

उदास मजला बघुनी म्हणती 'ह्रुदयच ना याजला,

प्रीतिची काय कळे या कळा !'

ह्रुदयाचे माझ्या काय असें जाहलें,

जर खरी प्रीत तर तुलाच सारें कळे;

यांनी गावें तुला, आणि मी स्वस्थ बसावें असें,

प्रीतिची त-हाच उलटी असे !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १९ सप्टेंबर १९२६

चिमुकल्यास

शुध्दानन्दाची तुला चिमुकल्या पाहुनि पटते खूण ! ॥धृ॥

बालभानू येइ गगनीं;
तेजसरिता न्हाणि अवनी;
परि विषण्ण होतों काळोखाचे वाडे मनिं बांधून !

झाडपानें हलति येथें,
चिवचिवे ती चिमणि तेथें;
इवल्याहि पाहुनी सौंदर्याला जाशी तूं रंगून !

आपुल्या तान्हास धरुनी,
जातसे ही तरुणि कोणी;
पाहते मत्सरें, परि तूं खिदळशि मूल तिचें पाहून !

रोखुनीयां लाल डोळे,
दुष्ट कोणी बघत चाले;
चरकतों-कापतों मनिं मी ! --निर्भय हांसशि मूठ वळून !

खुलत असलें अधरिं हासें,
ह्रुदयिं कसला भाव नाचे ?
जर का कळला मज दाविन तर मी स्वर्ग जगा उघडून !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १ जुलै १९२६

त्यांचें प्रेम

तिची त्याची जाहली कुठें भेट;

बहुत दिवसांचा स्नेह जमे दाट.

हातिं धरुनी एकदां तिचा हात,

बोलता तो;--बोलली स्मित करीत,

"इश्श, भलतें हें काय खुळ्यावाणी,

केवढी मी, केवढे तुम्हीं आणि !

धाकटा मी समजून तुम्हां भाऊ,

भगिनिप्रेमानें घालितसे न्हाऊं!"

बोल ऐकुनि संतप्त लाल झाला;

दांत चावुनि हे शब्द बोलिजेला,

"घरीं माझ्या आहेत खूप ताई,

करा काळें बघण्याक दुजे भाई".


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १० फेब्रुवारी १९२६

दैविकता

सारी रात्र सरुन मंद गगनी तारा फिक्या जाहल्या;

माझी गोष्ट अजून मात्र नव्हती सांगूनिया संपली.

एकामागुनि एक आठवुनियां लीला तिच्या प्रेमाला,

जीवाच्या सुह्रुदास सर्व कथिलीं दुःखें मनींचीं मुकीं;

"आतां सांग गडया, खरी मजवरी आहे तिची प्रीत ना ?"

तो बोले, "भलताच संशय असा कां घेसि वेडयापरी ?"

तेव्हां टाकुनि श्र्वास एक वदलों नैराश्यपूर्ण खरें,

"वर्षें दोन उणीं पुरीं उलटलीं नाहीं तिची दादही !"

झाली सांज तशी उदासह्रुदयें होतों कूठेंसा उभा ;

तों मागून कुणी हळू 'तुम्हिच कां!' ऐसें वदे मंजुळ.

सारा दाटुनि जीव लोचनिं बघे-तो तीच मागें उभी !

सोन्याचा क्षण तो कसा कुणिकडे ठेवूं असें जाहलें !

दैवाची दिलदारि ही बघुनियां बेहोष झालों मनीं;

'वेडया, होइल ती तुझीच' असला उल्हास ये दाटुनी.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ८ मे १९२६

खूळ

जिवलग राणी दुज्या भाळुनी पळे कुठे चंचळ,

मान टाकुनी म्हणुनि पडलों गाळित अश्रूजळ.

कुणी बालिका अजाण येउनि म्हणे 'प्रीति हें खुळ,

सुसकार्‍यांचे तुफान करुनी कां होता व्याकुळ ?'

खोल घोगर्‍या सुरांत वदलों हंसरा रडवा जरा,

'पांडित्याचे बोल तुझे परि झोंबति माझ्या उरा'

तरी कैकदा जवळ येउनी रमवी नानापरी,

म्हणे ' किती दिन तिच्या खंतिच्या जळवा धरणें उरी ?

अकस्मात हे शब्द ऐकुनी टकमक तिज पाहिलें,

गाळित आसू वदलि,'नाहि कां मज अजुनी जाणिलें ?"

जवळ जाउनी वदलो तिजला 'प्रीति असे ना खुळ ?

मनराणीविण खुळा जाहलो-तुम्हि कां हो व्याकुळ ? "


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ८ मार्च १९२६

रानगीत

चल ग सजणे रानामधें,

चाफ्याचे फुल तुझ्या कानामध्ये !

उठे चंद्र्मा झाडिंतुनी,

बावरशी कां तूं सजणी ?

रानवटी हिरवी झाडी,

डोंगरमाथी ही उघडी ,

चल फिरू घालुनि गळा गळे,

रोमाच्च्यांचे फुलवु मळे !

'कोण ग बाई चावट हा

पानांच्या जाळींत पहा ! "

चंद्र ग बघतो जाळिंतुनी,

बावरशी कां तूं सजणी ?

ओसाडी बघ पुष्करिणी,

बसलि कशी जळ झाकळुनी;

दोघांचे मुखबिंब गडे,

जाउनिया पाहूं तिकडे.

" कोण ग बाई चावट हा

पांढुरका पाण्यात पहा ! "

डुले कवडसा जळातुंनी

बावरशी कं तूं सजणी ?

पदर आडवा बांध झणी,

कर गुम्फूं कमरेमधुनी

" हूं,हूं करूनिया चावट हा ,

कानोसा कुणि घेत पहा !"

वायु ग फिरतो तृणातुनी,

बावरशी कां तूं सजणी ?

बावरुनी गेलिस बाई,

चाफा मुळिं फुलतच नाही !

चल तर साजणे जाउं घरी;

"नका साजणा , राहुं तरी ! "


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ६ मार्च १९२६

हिंदुस्थानवर्णन

चोहो वर्णातुन कोण मुशाफर वर्ण मला सांगा । तुम्हाला वर देते जागा ॥ध्रु०॥

विपवंश संपूर्ण दरिद्रे आजवर नाचवले, ब्रह्मकर्माला आचवले ॥

संकटी पडता पक्षी खगेंद्रे जसे काय वाचवले, सकळस तेजे नाचवले ॥

श्रीमंतांनी तसे थोर पदाला ब्राह्मण पोचवले, तया करी शत्रू वेचवले ॥चा०

जे उदार धीर देणार खबर घेणार क्षणामध्ये रूमची ॥

ते तर नव्हे आपले बेट राज बीज थेट कला दिसे तुमची ॥

नारो शंकर विंचुरकर बोला लौकर धरते करी दुमची ॥चा०॥

ओढेकर नायगावकर पुरंधरे पानशांतिल आपुण ।

तुम्ही अमात्य की राजाज्ञा प्रतिज्ञा पुरवा कपट वाणुण ॥

प्रतिनिधी सचिव सुमंत न झालो श्रीमंत दिसती गुण ॥चा०॥

रणशूर पुरे पटवर्धन सर्वदा युद्ध साधन । नाही रास्त्यामध्ये निर्धन, भरपुर भांडारी धन ॥

किती नानाचे शोधन दश दिशा करी बंधन ॥चा० मसलती राजकारणी सखाराम बापू हो ॥

रामाजीपंती वेढिला जंजिरा टापु हो ॥ हरीपंत म्हणती सृष्टित स्वराज्य स्थापू हो

॥चा० त्रिंबकराव राव भाऊसाहेबांचे मामा रावजीजी ॥

हर वक्त विसाजी कृष्ण हजर प्रभु कामा राव जी जी ॥

रामचंद्र गणेश वांछितात नित संग्रामा राव जी जी ॥चा०॥

कृष्ण राव बल्लाळ, कोळी भिल रामोशांचे काळ, पारोळकर काळाचे महाकाळ ॥

चा० रणांगणी बुंदेले मजबुत ॥ घोडे स्वार शिपाई कलबुत ॥ केले गिराशाचे ताबुत ॥

चा० संस्थान शाबूत लढाया रोज नाही नागा, वसविल्या ब्रह्मपुर्‍या बागा ॥१॥

क्षत्रीय मंडळित मुख्य घराणे उदेपुरचे, सुरजमल जाट भरतपुरचे ॥

अश्वमेध कलियुगात केला जयसिंग जैपुरचे, भारमलसिंग जोतपुरचे ॥

बळिभद्रसिंग आणिक सुरूपसिम्ग श्रींगी राजापुरचे, प्रभंजनसिंग कुंजपुरचे ॥चा०

पुरी चेतसिंग काशीचे कर्मनाशीचे इंद्रजितसिंग ॥

हरि भक्त हाती जमाल प्रभु नेपाळचे रणजित सिंग ॥

पडे बर्फ सदा काहूर सुभा लाहूरचे दळजितसिंग ॥चा० अजमेरचे सुरतसिंग मस्तकी लिंग शिवाचे सदा ॥

नरवरचे हरि हरमल एक दिल अचळ संपदा ॥

रजपूत चितोडकर मर्द गर्दअफिमेत न टळती कदा ॥ चा० झरण्या परण्याचे वीर, संग्रामसिंग रणधीर ॥

देती राघोगडास्तव शीर, दुर्जनसिंग गुण गंभीर ॥ मानसिंग तरलाचे तीर, गोहदेस ठेवला खंजीर ॥ चा०

ओंकार मलराठोड लेक मोठ्याने हो ॥

अर्जुनसिंग रामसिंग हरिप खोट्याचे हो ॥ जालमसिंग भिमसिग बुंदिकोट्याचे हो ॥चा०

केशरीगिसदत्त्याचे ब्राह्मणभक्त राव जी जी ॥

वैकुंठसिंग मथुरेचे बहुत वीरक्त राव जी जी ॥

मलसिंग बाहुबळे रक्षिती बाच्छाई तक्त राव जी जी ॥

चाल॥ सबलसिंग मेवाडचे ॥ रुद्रसिंग जमिदार मारवाडचे ॥ हटेसिंग हजारी छत्तिस गडचे ॥चाल॥

अशेले स्वइच्छ फिरती किती ॥भरपूर अमल झोकिती ॥ वळखिल्या वळख टाकिती ॥चाल॥

अशा आहेत लोकांच्या रिती म्हणून येऊ नये रागा, एखादी गोष्ट येते भागा ॥२॥

वंश हजारो हजार ज्यांचे सुरतपाक बेटे, चपळ जसे वाघिणीचे पेटे ॥ नगरशेट मसुदाबादेचे वतनदार शेटे, घालिती पैकेकरी खेटे ॥

सधम गुमस्ते पदरी बांधिती शिरी मंदिल फेटे, गळ्यामध्ये लिंग गोफ गेठे ॥चाल॥

आग्र्याचे केशवलाल द्रव्य आजकाल तयांचे सदनी ॥

आल्या याचकास सत्कार पाट बस्कर मिठाक्षर वदनी ॥ परनारी सहोदर सद्य प्रफुल्लित ह्रदय विषयसुख सदनी ॥चाल॥

उज्जनचे गोकुळदास जन्मतो प्रवास करते भले ॥ गढे मळचे हंसराज बंधु जसे राजपतीने शोभले ॥

झाले मातब्बर सौद्यात होन हौद्यात सहज लाभले ॥चाल॥ आदि ठिकाण भागानगर, लागले सभोवते आगर ॥

जाई जुई शेवंती तगर, खेळती तळ्यामधी मगर ॥ सारी अलम शहरची सुगर, ना अडे एकमेकांबिगर ॥चाल॥

बेदरचे मलापा मुलुख फिरस्ते वाणि हो ॥

शिवपूजन त्रिकाळी करून सत्य वदे वाणि हो ॥

पदोपदी सांब संभाळी समयनिर्वाण हो ॥चाल॥

भावार्थि सुराप्पा श्रीरंगपुर पट्टणचे रावजी जी ॥

धट लावून मोजिती द्रव्य मोधी पल्टाचे रावजी जी ॥चाल॥

चंद्राप्पा सोंदे बिनुरचे ॥ विराप्पा दर्भशयन इंदुरचे ॥ गुराप्पा गुरु मछली बंदरचे ॥चाल॥

नावे इतुक्याची घेतलि पहा पहा यातुन तुम्ही कुणी आहा ॥

भीड सोडून कळवा राहा ॥ करीन पती परिचय हा माझे मर्जिनुरूप वागा, तदार्पण मग दौलत पागा ॥३॥

राज्य संमधी पडले प्रसंगी जिव खर्चुन कामी, मराठे लोक नामी नामी ॥

धारकरी साहेब सुभेसरदार सरंजामी, नांदती आपआपल्या ग्रामी ॥

अमरसिंग जाधव शुचिर्भुत अति अंतर्यामी. घाडगे निसंग संग्रामी ॥चाल॥

रणनवरे नवरे थोरात खरड खैरात फडतरे कवडे ॥ पाटणकर निंबाळकर भुते भापकर झेंडे बालकवडे ॥

जगताप दरेकर बुळे ताकपिर मुळे दिघे वाघचवडे ॥चाल॥ धायबर बाबर धायगुडे पायगुडे सोनवणी घागरे ॥

माहाडिक शिर्के दाभाडे गोड सावंत धुळप नागरे ॥ सितोळ्यांची मोठी वेल सवाई सरखेल सबळ आंगरे ॥चाल॥

आधी सुभेदार होळकर, नंतर पवार धारकर ॥ जगजीवनराव माणकर, मुळी चव्हाण दहिगावकर ॥

आपतुळे पिसाळ वाईकर, ढमढेरे तळेगावकर ॥चाल॥

धनी छत्रपती महाराज तख्त सातारा हो ॥

करवीर चंदिचंदावर अहो दातरा हो ॥

शिंद्यात पुरुष एक एक निवडतो ताराहो ॥

नागपुरचे भोसले होशियार घोड्याचे राव जी जी ॥

गायकवाडा मोहोरे इष्कि कंडी तोड्यांचे राव जी जी ॥

शिरी आकलकोटी लाविती तुरे गोंड्याचे राव जी जी ॥चाल॥

म्हणे मुशाफर गडे ॥ आम्ही तर राज्याचे संवगडे ॥

ऐकून सुंदर पायापडे ॥चाल॥

गुणिजन गंगुहैबती पुरे ॥ मनी कवन तयांचे मुरे ॥

किती महादेव वाखा पुरे ॥

सुगर प्रभाकर म्हणे पंचीपशी काही बक्षिस मागा, कवी नाही कुणी कवनी जागा ॥४॥


कवी/शाहीर  - प्रभाकर

पोवाडा - पेशवाचे संक्षिप्त वृत्त

जगदीश्वर कोपला गोष्ट झाली खरिच निरुपाई, म्हणुन एकाएकी सर्व बुडाली ब्राह्मणबाच्छाई ॥ध्रु०॥

सबळ वीरांचे राज्य पुरुष जे क्षणात हरणारे, आकाश कडकडल्यास सकल जे उचलुन धरणारे ॥

अणिक जागा जिंकुन जे घन भंडारी भरणारे, रिपुसन्मुख धैर्याने रणांगणी जे नर ठरणारे ॥

चोहो सागरिचे स्नान सैन्यसमवेत जे करणारे, पूल बांधुन नावांचे जान्हवी निर जे तरणारे ॥

छत्रपतीच्या कामी शरीर जे खर्चुन मरणारे, उबे कंबर आवळून वायुवत सदा जे फिरणारे ॥

स्वकर्म आचरणारे अभय जे बळी सर्वा ठाई, पहा त्यांचे वंशज हिंडती पृथ्वीवर पाई ॥१॥

शके सोळाशे तिसापसुन राज्याची अमदानी, स्वता खपुन कारखाने जमविले घरी खावंदानी ॥

कसे दप्तरी लिहिणार लेख जे लिहिले मर्दानी, त्यात चुकि नाहि ठावि लेखणी कोरी कलमदानी ॥

वेदशास्त्रसंपन्न मुखोद्गत वदति आनंदानी, असे ब्राह्मण प्रतिसूर्य पाळिले त्यांच्या छंदानी ॥

शहर पुणे हरहमेष भरले वाडे बांधिती घरवंदानी ॥

नळ वाहाती नित्यानी पाणी पीती हौदावर गाई,

पुढे उघडे बाजार सुखे जन करती कमाई ॥२॥

प्रतिवर्षिक दक्षणा लक्ष ब्राह्मण श्रावणमासी, असा धर्म आहे कुठे आवंतर कोण्या ग्रामासी ॥

निरिच्छ योगी ध्याती गाती जे ईश्वरनामासी ॥

अन्न वस्त्र धन धान्य तयांच्या धाडिती धामासी ॥

नंदादिप नैवेद्य ठाई ठाई विठ्ठल रामासी, उच्छाहास दिल्हे गाव सुभद्रा सुताच्या मामासी ॥

कितीक विडे उचलुन पावले मृत संग्रामासी ॥

त्यांचे पुत्र पौत्रांस मागे नाहि दुष्काळ दामासी ॥

मुलुख सरंजामास देऊन केली कायम गलिमाई, मनुष्यमात्रादिकांचे माहेर होति पेशवई ॥३॥

मूळ बाळाजि विश्वनाथ सुत त्यांचे बाजीराव, नाव केले आपांनी लढविले वसइस उमराव ॥

राव बाजिचे पुत्र प्रभु बाळाजि बाजिराव, कनिष्ठ दादा त्याहुन धाकटे जनार्दनराव ॥

आपासाहेबांचे एक चिरंजिव सदाशिवराव, शूर होते विश्वासराव आणि गुणी माधवराव ॥

नारायणरायांचे सवाइ झाले माधवराव, रावसाहेब घेतल्या वरी जन्मले बाजीराव ॥

चिमाजी आपासाहेब प्रसवली मग आनंदीबाई, विनायकराव बापुजी हे काही किंचित सीपाई ॥४॥

पुरुष पंध्रांतुन पराक्रमी गत झाले अकरा, तदनंतर चौघांनी दिल्या आल्या शत्रुसवे टकरा ॥

उपाय हरले ह्याच प्रसंगी गोष्ट गेलि निकरा, जो रक्षणा आणिला तोच करी दौलतिचा विकरा ॥

हरण झाले सर्वस्व राहिला नाही त्यातुन बकरा, गुप्त ठिकाण अजुन सांगती जा सत्वर उकरा ॥

अशी अवस्था बघुन जनाच्या मनि पडल्या फिकरा, हरहर हे भगवान कशा तरि घरि रहातिल ठिकरा ॥

गंगुहैबती म्हणे आज काय सरली पुण्याई, महादेव गुणी प्रभाकराच्या कवनी चतुराई ॥५॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

दुसरे बाजीराव पेशवे यांजवर पोवाडा १

यशस्वी झाले श्रीमंत पहिले सवेलढायाला ।

आताच आले अपेश कोठुन बाजीरायाला ॥ध्रु०॥

दादासाहेब पुण्यप्रतापी निस्सीम शिवभक्त ।

स्वारी करुन दरसाल हालविले दिल्लीचे तक्त ।

आनंदीबाई सुशील शिरोमणी सगुणसंयुक्त ।

पतिभजनी सादर घडोघडी अखंड आसक्त ।

बाजिरावसाहेब सदोदित जो जीवनमुक्त ।

जन्मांतरी तप केले निराहारी राहुन एकभुक्त ॥चा०॥

शके सोळाशे शहाण्णवी अति उत्तम जयसंवत्सरी ।

पौषशुद्ध दशमिस भरणी नक्षत्र भौमवासरी ।

ठीक पहिल्या प्रहरात जन्मले रात्रीच्या अवसरी ॥चा०॥

पहा बाईसाहेब धारमुक्कामी राहुनी ।

कंठिला काळ काही दिवस दुःख साहुनी ।

केले तेथुन कुच सुपुत्रमुख पाहुनी ॥चा०॥

गंगातिरी येऊन राहिली अपूर्व ठायाला ।

कचेश्वर शुक्लेश्वर सन्निध दर्शन द्यायला ॥१॥

समाधान सर्वास वाटले कोपरगावास ।

स्वारी शिकारीस बरोबर जाती कथा उत्सवास ।

जे करणे ते पुसून करिती अमृतरावास ।

एकास नख लागल्या दुःख होई त्रिवर्ग भावास ।

असे असुन नानांनी मांडिला अति सासुरवास ।

हळुच नेऊन जुन्नरास ठेविले श्रीमंतरावास ॥चाल०॥

इतक्या संधीत सवाई माधवराव मरण पावले ।

तेव्हापासून नानांनी राक्षसी कपट डौल दाविले ।

परशुराम रामचंद्र निरोपुन मग वाटेस लाविले ॥चा०॥

आले खडकी पुलावर श्रीमंतास घेउनी ।

दर्शनास नाना परिवारे येउनी ।

दाखविली याद रावास एकांती नेऊनी ॥चाल पहिली॥

भय मानून शिंद्यांचे निघाले बाईस जायाला ।

सातार्‍यात राहून लागले भेद करायाला ॥२॥

आपण बाळोबा होउन एक केली खचीत मसलत ।

चिमाप्पास धनी करून राखिलि जुनाट दौलत ।

करारात दोघांच्या झाली काही किंचित गफलत ।

म्हणुनी फिरून नानांनी उलटी मारुनी केली गल्लत ।

सूत्रधारी जो पुरुष ज्याच्या गुणास जग भुलत ।

हातात सगळे दोर पतंगापरी फोजा हालत ॥चाल॥

परशुराम रामचंद्र आणि बाळोबास ठाउक रण ।

राज्यकारणी नव्हेत एक केसरी एक वारण ।

कठीण गाठ नानांशी न चाले तेथे जारण मारण ॥चाल॥

महाडास बसुनी नानांनी बेत ठरविले ।

बाळोबास शिंद्यांकडून कैद करविले ।

शिवनेरी गडावर पटवर्धन धरविले ॥चाल पहिली॥

रास्ते झाले जामीन प्रसंगी अवघड समयाला ॥

असा गुजरला वक्त नेले मांडवगण पाहायाला ॥३॥

घडी बसवून महाडाहुन नाना त्वरितच उलटले ।

द्वेषबुद्धि विसरून संशय सर्वांचे फिटले ॥

शिंदे भोसले होळकर मुश्रुलमुल्क एकवटले ।

दलबादल डेर्‍यात श्रीमंतासंन्निध संगटले ।

बाजीराव राज्यावर बसता आनंदे जन नटले ।

तोफांचे भडिमार हजारो बार तेव्हा सुटले ॥चाल॥

नंतर नाना एकविसांमधी समाधीस्त झाले ।

महाल मुलुख शिंद्यांनी बावीसामधि आपले पाहिले ।

यशवंतराव होळकर लढाईस जमुन उभे राहिले ॥चाल॥

शिंद्यांनी करून माळव्यात खातरजमा ।

केली फौज गंगेच्या रोखावर खुप जमा ।

सोडीना कंबर कधी काढिना पायजमा ॥चाल पहिली॥

कुच मुकाम दररोज बनेना पलंगी निजायाला ॥

घेई जोठाची पचंग समरी कोण जिंकील याला ॥४॥

दिला मार पळणास जातिने पुण्यास येऊनिया ।

शहर सभोते वेढुन बसले चौक्या ठेवुनिया ।

खंडेराव रास्त्यांनी प्रभुला वसईस नेउनिया ।

सुखात होते स्वस्थ सतत पंचामृत जेउनिया ।

इंग्रजास कुमकेस प्रसंगी बरोबर घेउनिया ।

सरंजाम अलिबहादरपैकी तयास देउनिया ॥चाल॥

अगोदर सोजर तरुक धावले मप्याशी दक्षिणी ।

त्या भयाने होळकर परतले नाही कोणी संरक्षणी ।

भरघोसाने श्रीमंत त्यावर पुण्यास येता क्षणी ॥चाल॥

झाला बंदोबस्त सर्वही पहिल्यासारखा ।

परि घरात शिरला शत्रु सबळ पारखा ।

लाल शरीर टोपी अंगी आठ प्रहर अंगरखा ॥चाल पहिली॥

धर्म कर्म ना जातपात स्थल नाही बसायाला ।

असे असुन सम्पूर्ण व्यापला प्राण हरायाला ॥५॥

फार दिवस आधि जपत होते या इंग्रज राज्याला ।

अनायासे झाले निमित्त पंढरपुरास कज्जाला ।

संकट पडले काहि सुचेना प्रधानपूज्याला ।

रती फिरली सारांश मिळाले लोक अपूज्याला ।

भय चिंता रोगांनी ग्रासिले काळीज मज्जाला ।

पदर पसरिती उणाख आणखी नीच निर्लज्जाला ॥चाल॥

परम कठिण वाटले आठवले त्रिभुवन राव बाजीला ।

थोर थोर मध्यस्थ घातले साहेबांचे समजीला ।

निरुपाय जाणुनी हवाली केले मग त्रिंबकजीला ॥चाल॥

ठेविला बंदोबस्तीने नेउन साष्टीस ।

एक वर्ष लोटल्यानंतर या गोष्टीस ॥

केले गच्छ भाद्रपद वद्यांतिल षष्ठीस ॥चाल पहिली॥

स्वदेशी जागा बिकट पाहिली निसुर बसायाला ।

शोध लावून साहेबांणी तेथे पाठविले धरायाला ॥६॥

इंग्रजाचा अन्यायी निघाला पाठ पेशव्याची ।

म्हणून साहेब लोकांनी आरंभिली अगळिक दाव्याची ।

वसई प्रांत कल्याण गेली गुजराथ पुराव्याची ।

रायगड सिंहगड बेलाग जागा केवळ विसाव्याची ।

कर्नाटक दिले लिहून ठाणी बैसली पराव्यांची ।

कोणास न कळे पुढील इमारत इंग्रजी काव्याची ॥चाल॥

अश्विनमासी वद्य एकादशी दोन प्रहर लोटता ।

श्रीमंत बापुसाहेब एकांती पर्वतीस भेटता ।

हुकूम होताक्षणी रणांगणी मग फौजा लोटता ॥चाल॥

बैसले राव दुर्बिणीत युद्ध लक्षित ।

भले भले उभे सरदारसैन्य रक्षित ।

लागुन गोळी ठार झाले मोर दिक्षित ॥चाल प०॥

तसाच पांडोबांनी उशीर नाही केला उठायाला ।

उडी सरशी तरवार करुन गेले विलयाला ॥७॥

आला त्रास वाटते फार ह्यावरून लक्षुमीस ।

विन्मुख होऊन श्रीमंत आणिले चहुकडून खामीस ।

फसले शके सत्राशे एकुण चाळीसच्या रणभूमीस ।

ईश्वर संवत्सरात कार्तिक शुक्ल अष्टमीस ।

प्रहर दिसा रविवारी सर्व आले आरब गुरमीस ।

खुप मोर्चा बांधून विनविती श्रीमंत स्वामीस ॥चाल॥

दारूगोळी पुरवावी आम्ही आज हटकुन त्यांशी लढू ।

गर्दीस मिळवून देऊन पलटणे क्षणात डोंगर चढू ।

शिपाइगिरीची शर्थ करून समशेरी सोन्याने मढू ॥चाल॥

लाविले बापुसाहेबांनी तोंड जाउनी ।

दीड प्रहर रात्र होते श्रीमंत दम खाउनी ।

गेली स्वारी महाला हिलाला मग लावुनी ॥चाल पहिली॥

जलदी करुनी साहेबांनी लाविले निशाण पुणियाला ।

खेचुन वाड्याबाहेर काढले कदीम शिपायाला ॥८॥

सकळ शहरचे लोक हजारो हजार हळहळती ।

सौख्य स्मरून राज्याचे मीनापरी अखंड तळमळती ।

रात्रंदिवस श्रीमंत न घेता उसंत पुढे पळती ।

यमस्वरूप पलटणे मागे एकदाच खळबळती ।

धडाक्याने तोफांच्या वृक्ष आणि पर्वत हादळती ।

त्यात संधी साधून एकाएकी दुरून कोसळती ॥चाल॥

भणाण झाले सैन्य सोडिली कितीकांनी सोबत ।

कितीक इमानी बरोबर झुकले घर टाकुनी चुंबत ।

कितीक मुकामी अन्न मिळेना गेली साहेब नौबत ॥चाल॥

कोठे डेरे दांडे कोठे उंट तट्टे राहिली ।

कोठे सहज होऊन झटपट रक्ते वाहली ।

कोठे श्रीमंत बाईसाहेब सडी पाहिली ॥चाल पहिली॥

बहुत कोमावली पाहवेना दृष्टीने उभयाला ।

हर हर नारायण असे कसे केले सखयाला ॥९॥

माघ शुद्ध पौर्णिमेस बापुसाहेब रणी भिडले ।

जखम करुन जर्नेलास फिरता जन म्हणती पडले ।

गोविंदराव घोरपड्याचे दोन हात भले झडले ।

आनंदराव बाबर ढिगामधी खुप जाऊन गढले ।

मानाजी शिंदे मागे फिरताना डोई देऊन अडले ।

छत्रपती महाराज तळावर समस्त सापडले ॥चाल॥

घाबरले श्रीमंत सुचेना मन गेले वेधुनी ।

बाईसाहेबांना तशिच घोड्यावर पाठीस बांधुनी ।

नेले काढुनिया अमृतराव बळवंत ज्येष्ठ बंधुनी ॥चाल॥

दहा प्रहर पुरे पंतप्रधान श्रम पावले ।

नाही स्नान शयन नाही स्वस्थपणे जेवले ।

आले आले ऐकता उठपळ राव धावले ॥चाल॥

गर्भगळित जाहले लागले शुष्क दिसायाला ।

बाईसाहेबांना फुरसद न पडे बसून न्हायाला ॥१०॥

दिवाळी आणि संक्रांत कंठिला दुःखांत फाल्गुन ।

रागरंग नाही आनंद ठाऊक रायालागुन ।

सदैव चिंताग्रस्त शब्द बोलती वैतागुन ।

कर जोडून फौजेस पाहिले घडोघडी सांगुन ।

धैर्य धरून कोणी कसून लढेना क्रियेस जागुन ।

कर्म पुढे प्रारब्ध धावते लगबग मागुन ॥चालव

पांढरकवड्यावर रचविल्या धनगारा अद्भुत ।

थंडीने मेले लोक उठविले गारपगार्‍यांनी भुत ।

बेफाम होते लष्कर नव्हती काही वार्ता संभुत ॥चाल॥

ओधवले कसे सर्वांचे समयी संचित ।

कडकडून पडले गगन जसे अवचित ।

दुःखाचे झाले डोंगर नाही सुख किंचित ॥चाल पहिली॥

अनुचित घडली गोष्ट दिसेना ठाव लपायाला ।

कोणे ठिकाणी नदीत लागले सैन्य बुडायाला ॥११॥

जे श्रीमंत सुकुमार वनांतरी ते भटकत फिरती ।

कळेल तिकडे भरदिसास प्रभु काट्यामधी शिरती ॥

आपला घोडा आपण स्वहस्ते चुचकारुन धरती ।

खाली पसरुन उपवस्त्र दिलगिरीत वर निद्रा करती ॥

अस्तमानी कधी रात्री भात भक्षिती पाटावरती ।

दरकुच दर मजलीस कृपेतिल सेवक अंतरती ॥चाल॥

पेशव्यांचे वंशात नाही कोणी असा कट्टर पाहिला ।

हत्ती घोडे उंट खजीना जेथील तेथे राहिला ।

बाजीराव होय धन्य म्हणून यापरी आकांत साहिला ॥चाल॥

नर्मदेस शालिवाहन शक संपला ।

त्या ठायी ठेविल शकपंती आपला ।

भरचंद्रराहुग्रहणात जसा लोपला ॥चाल पहिली॥

सांब कसा कोपला लागले गलीम लुटायाला ।

सिद्ध झाले मालकमास राव राजेंद्र मिळायाला ॥१२॥

समस्त लष्कर दुःखित पाहुनी श्रीमंत गहिवरले ।

सद्गद जाला कंठ नेत्र दोन्ही पाण्याने भरले ।

आम्हापुढे जे शत्रु रणांगणी नाही क्षणभर ठरले ।

ते आमच्या जन्मास दुष्ट चांडाळ पुरुन उरले ।

केवळ असा विश्वासघात केल्याने कोण त ले ।

इंद्र चंद्र आदिकरुन आल्या संकटास अनुसरले ॥चाल॥

तुमची आमची हीच भेट आता राव सर्वांना सांगती ।

कृपालोभ परिपूर्ण करित जा द्या दर्शन मागती ।

ऐसे उत्तर ऐकून शतावधी पायी सेवक लागती ।

॥चाल॥ महाराज उपेक्षुन आम्हांस जाऊ नये ।

दूर ढकलुन शरणागतास लावू नये ।

पहाकसबाचे घर गाईस दावू नये ॥चाल पहिली॥

हिंमत सोडू नये सर्व येईल पुढे उदयाला ।

कोण काळ कोण दिवस धन्यांनी पुसावे ह्रदयाला ॥१३॥

प्राण असुन शरिरात बुडालो वियोग लोटात ।

बरोबर येतो म्हणुन घालिती किती डोयी पोटात ।

निराश जाणुन झाली रडारड मराठी गोटात ।

निर्दयांनी लांबविली पालखी पलटण कोटात ।

मातबर लोकांची ओझी चालतात मोटात ।

गरीब करी गुजराण प्रसंगी एक्या जोटात ॥चाल॥

कुंकावाचुन कपाळ मंगळसूत्रावाचुन गळा ।

तया सैन्यसमुदाय उदाशित रंग दिसे वेगळा ।

धर्म बुडाला अधर्म दुनियेमधि आगळा ॥चाल॥

कसे प्रभूंनी ब्रह्मावर्त शहर वसविले ।

अगदीच पुण्याच्या लोकांना फसविले ।

हुर हुर करीत का उन्हात बसविले ॥चाल पहिली ॥

काही तर तोड पुढे दिसेना जीव जगायाला ।

कोणास जावे शरण कोण हरि देईल खायाला ॥१४॥

विपरित आला काळ मेरुला गिळले मुंग्यांनी ।

पंडीतास जिंकिले सभेमध्ये मदांध भंग्यांनी ।

भीमास आणिले हारीस रणांगणी अशक्त लुंग्यांनी ।

कुबेरास पळविले अकिंचन कसे तेलंग्यांनी ।

जळी राघव माशास अडविले असंख्य झिंग्यांनी ।

जर्जर जाहला विष्णुवाहन बदकांचे दंग्यांनी ॥चाल॥

ईश्वरसत्ता विचित्र सारे दैवाने घडवीले ।

हरिश्चंद्र आणि रामचंद्र नळ पांडवास रडवीले ।

फितुर करुन सर्वांनी असले राज्य मात्र बुडवीले ॥चाल॥

म्हणे गंगु हैबती पावेल जर शंकर ।

तर दृष्टीपुढे पडतील राव लवकर ।

महादेव गुणीजन श्रीमंतांचे चाकर ॥चाल पहिली ॥

प्रभाकरची जडण घडण कडकडीत म्हणायाला ।

धुरू नारो गोविंद वंदी त्या निशिदिन पायाला ॥१५॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

दुसरे बाजीराव पेशवे यांजवर पोवाडा २

श्रीमंत झाले लोक श्रीमंतापासुन लक्षावधी ।

दुरावले ते श्रीमंत आपल्या दृष्टिस पडतिल कधी ॥धृ०॥

शिंदे होळकर उत्तरेस पश्चमेस नांदती ।

पूर्वेकडे भोसले मिरजकर दक्षणचे अधिपती ।

हरिपंत नानाच्या पुढे किती बुद्धिमंत लोपती ।

बृहस्पति आणि शुक्र जसे काय तारांगणी तळपती ॥

विपुल त्या रास्त्यांच्या घरी आजवर संततसंपती ।

इचलकरंजीकर बारामतिकर सोयर्‍यात धनपती ॥

चा० पहा कृष्णराव चास्कर, साजणी ॥

कोकणचे कोल्हटकर, साजणी ॥

महशूर सोलापूरकर, साजणी ॥चा० पहिली॥

दिक्षित-पेठे-साठे-ओक-ओंकार सभाग्यामधी ।

फाटक-थत्ते-बर्वे-देवधर-पेंडशांची रित सुधी ॥१॥

भागवत-मांडलिक-दामले-रामदुर्ग बळी ।

आपा बळवंतराव पार जाई रणात फोडुन फळी ॥

रामाजी महादेव रणांगणी अडेल मोठे खळी ।

हशमनीस, कार्लेकर देती कोळी भिलांना गळी ॥

झाशीवाले बिनीवाले बुंदेले रिपु खांडेकर छळी ।

कितीक लक्षाधीश प्रतिष्ठित दप्तरची मंडळी ॥

चा० मर्दाने विंचुरकर, साजणी ॥चा०प॥

नायगावकर पुरंधरे प्रतिश्रीमंत ते गुणनिधी ।

सखाराम भागवत राजकारणात केवळ विधी ॥२॥

नगरकर-आंबीकर चिंतो विठ्ठल स्वारीकडे ।

पवार जाधव धुमाळ डफळे देवकाते धायगुडे ॥

दरेकर सरलष्कर बाबरसानवणी पायघुडे ।

निंबाळकर नाईक घायभर पाटणकर फाकडे ॥

मुधोळ गुती गजेंद्रगडकर संस्थानि घोरपडे ।

गुजर घाडगे माहाडीक मोहिते विचारे शिर्के बडे

॥चा० मर्द माने म्हसवडकर, साजणी ॥

आटोळे उंबरखेडकर, साजणी ॥

रणनवरे सासवडकर, साजणी ॥

चा० प० पिसाळ-शितोळे-वाघ-आपतुळे लढाइला ते अधी ।

शहामीरखा रोहिले फिरंगी पठाण आरब सिधी ॥३॥

ताकपीर-थोरात-पांढरे स्वामी पदी सादर ।

धुळपांचा इंग्रज टोपी काढु करती आदर ॥

श्रीमंतांचे प्रतिबिंब अलि-बहादर-समशेरबहादर ।

कुशावा हैबतसिंग सजले काय स्वरूप सुंदर ॥

सातारकर पोतनीस मुख्य चिटणीस लेखक नादर ।

छत्रपती विनवून देविती श्रीमंतास चादर ॥

चा० निळकंठराव धारकरी, साजणी ॥

सन्निध त्यांची चाकरी, साजणी ॥

मोहीम हैबतराव करी, साजणी ॥चा०प०॥

बाबुराव हरी-सखाराम हरी शूर विरांचे क्षुधी ।

अहंकारी मल्हारराव जगजीवन नसे पर-बुधी ॥४॥

धन्य प्रभू पेशवे ज्यांचे ऐश्वर्य बघुन मन रिझे ।

पर शत्रूंचे सैन्य ठायिंच्या ठायी प्रसंगी थिजे ॥

सुखी केला मुलखात केशरी भात घरोघर शिजे ।

गृहस्थ-भिक्षुकांचे गौरव तुपात मनगट भिजे ॥

तीर्थो तीर्थी नित्य शेरभर सोने सकाळी झिजे ।

नाही दुःख कोणास पलंगी आनंदात जन निजे ॥

चा० ईश्वरी अंश हे धनी साजणी ॥

महापराक्रमी साधनी, साजणी ॥

सर्व गुण शोधनी, साजणी ॥ चा० प०॥

गंगुहैबती म्हणे ज्यांचे विघ्न गजानन वधी ।

महादेव गुणी प्रभाकराचे कवन शरकरा दुधी ॥५॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

पोवाडा - अहिल्याबाई होळकरीण

सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई । गेली कीर्ति करूनिया भूमंडळाचे ठायी ॥ ध्रुवपद ॥

महाराज अहिल्याबाई पुण्य प्राणी । सम्पूर्ण स्त्रियांमधी श्रेष्ठ रत्‍नखाणी ।

दर्शने मोठ्या पापाची होईल हानी । झडतात रोग पापांचे पिता पाणी ।

वर्णिती कीर्ति गातात संत ते गाणी । झाली दैवदशे ती होळकरांची राणी ॥चाल॥

उद्धार कुळाचा केला । पण आपला सिद्धिस नेला । महेश्वरास जो कुणी गेला ॥चाल पहिली॥

राहिला तेथे तो घेउन बाप भाई । संसार चालवी दीन दुबळ्यांची आई ॥१॥

प्रत्यही द्यावी ब्राह्मणास दश दाने । ऐकावी पुराणे बहुत आनंदाने ।

लाविली हरी हर मंदिरी तावदाने । गर्जती देउळे कीर्तन नादाने ॥

शोभती होम कुंडे द्विजवृंदाने । टाकिती हजारो नमात अवदाने ॥चाल॥

कधी कोटि लिंगे करवावी । वधुवरे कधि मिरवावी । अर्भका दुधे पुरवावी ॥चा०प०॥

पर्वणी पाहुन दान देतसे गाई । जपमाळ अखंडित हाती वर्णू काई ॥२॥

जेथे ज्योतिलिंग जेथे तीर्थ महा क्षेत्रे । घातली तेथे नेहमीच अन्नछत्रे ।

आलि जरा झालि काही ज्याची विकल गात्रे । पुरवावी त्यास औषधे वस्त्रे पात्रे ।

कितिकांनी घेतली स्मार्त अग्निहोत्रे । दिली स्वास्थे करुन त्या भटास क्षणमात्रे ॥चाल॥

आधि इच्छा भोजन द्यावे । उपरांतिक तीर्थ घ्यावे । वाढून ताट वर मग न्यावे ॥चा०प०॥

जेविल्या सर्व मग आपण अन्न खाई । रघुवीर चरित्रे रात्रीस गोड गाई ॥३॥

आल्या यात्रेकर्‍याला वाटी पंचेजोडे । कोणास आंगरखे कोणास नवे जोडे ।

कोणास महेश्वरी उंच धोत्रजोडे ।

कोणास दुशाला कोणास बट घोडे । गवयास मिळाति कडी कंठ्या तोडे ।

घाली गिराशांचे पायात बिड्या खोडे ॥चाल॥

बांधिले घाट मठ पार । कुठे शिवास संतत धार । कुठे वनात पाणी गार ॥चाल पहिली॥

त्यासाठी मुशाफर काय धावत जाई । विश्रांत पावती पाहुन अमराई ॥४॥

किती सूर्य ग्रहण संधीत तुळा केल्या । कधी कनक रौप्य कधी गुळाच्या भेल्या ।

संभाळ करून काशीस यात्रा नेल्या । कावडी शतावधी रामेश्वरी गेल्या ।

संसारी असुन वासना जिच्या मेल्या । तिजपुढे सहज मग मुक्ति उभ्या ठेल्या ॥चाल॥

कवी गंगु हैबती म्हणती ॥ पुण्याची कोण करी गणती ॥ राज्यास होती पडपण ती ॥चा०प०॥

महादेव गुणीचे लक्ष तिचे पाई । कवनात प्रभाकर करितसे चतुराई ॥५॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

नाना फडनविसाचा पोवाडा

सवाईमाधवरावसवाई सवाई डंका बजाया । फडणीस नानाकी तारीफ अक्कलने तो गजब किया ॥धृ०॥

बिनधारसें राज्य चलाया नाकिसे चक्‌मक् झडी । कैक मुत्सद्दी चपगये बस भये नानाकी तो अक्कल बडी ।

दिल्ली अटक लाहोर भाहोर कर्नाटक बीज पुकार पडी । चारो तरफ तजेला निकला चंदाऐसी किरत बडी ।

जिने बैठे राज कमाया दिलके तै खूप दिल दिलासा दिया । साहेब बंदगी करना पुना छांड कहूं अया न गया ।

अजि बडी अकल । सवायी माधवराव सवायी सवायी डंका बजाया । फडणीस नानाकी तारिफ अक्कलने तो गजब किया ॥१॥

कैक मुत्सदी होगये अक्कल नानाकी नयी पायी किसे । निजामअल्ली भगादिया साहेब जसदे हराउसे ।

टिपूसरीखे लाये बगलमे ज्या पहुंचे दरवाजेसे । पेशवोका निमक जहालम् मनीं कियावो गाजीमे ।

क्या नबाबका हुवा खराबा तोबा सबही डुबा दिया । तुम हमबी कानोसे सुंनते याजस लेकर कोन गया ।

कुचबी नही । सवायी माधवराव सवायी०॥२॥

किया मोंगलपर हल्ला उसदिन कई उमराव संगा चले । शिंदे होळकर और नागपुरवाले भोसले आन मिले ।

दाभाडे पाटणकर निंबालकर कट्टे लढनेवाले । पवार जाधव माधवरावके संगत नानाबी निकले ।

फडके आपाबळवंत रास्ते अभये इसमे कोण रह्या । चुका भुला हुवा देखने कहा अपना अखर गया ।

अजि किसे खबर । सवायी माधवराव सवायी० ॥३॥

सब् मिल हल्ला किया उडादिया नबाबके धुडके धुडके । मशरमुलुक् पकड कैदमे डाल दिया बैठो चुपके ।

पानी बिगर घोडे उट हत्ती तमाम मरगये नबाबके । रुपयेका जल एक कटोरा पानी ऐसी जगा रखे ।

किसे खबर भइ मेहेल मुलुख नबाबने क्या दिया लिया । फंदी अनंत कुतै क्या मामलु सुनते है कुच कबूल किया ।

सचहोगया । सवायी माधवराव सवायी०॥४॥


कवी - अनंत फंदी

पेशवाईच्या त्रोटक हकीकतीचा पोवाडा

श्रीमंत ईश्वरी अंश, धन्य तो वंश, परम पुरुषार्थी ।

बरोबरी तयांची कोण करील पहातार्थी ॥ध्रुवपद॥

राजाधिराज महाराज, गरीब नवाज, धनी श्रीमंत ।

भासती सदैव देव आमचे हेच भगवन्त ॥

पाषाण धातुच्या मूर्ती, धरत्रीवरती, आहेत अनंत ।

त्या पूज्य परंतु नाहीत प्रगट जीवित ॥

तसे नव्हेत हे तर देव, कलिमध्ये भूदेव, ब्राह्मण संत ।

त्या वंशी पेशवे झाले सबळ बळिवंत ॥चाल॥

योग्यतेस आणिले पंत, होऊनिया कृपावंत, त्या राजांनी ।

ह्यामुळेच चढती कमान, धरुनी अभिमान.... ।

मग बहिरोपंत सोडवून, बिडी तोडवून, प्रभुच्या पणज्यांनी ॥चाल पहिली॥

पुढे प्रधानपद मिळवून, वैरी पळवून मारिल्या शर्थी ॥श्रीमंत०॥१॥

राव बाजी पुण्यामध्ये येऊन, हातावर घेऊन, निघाले शीर ।

प्रारंभी पाहिले जनस्थान रघुवीर ।

नेमाड माळवा मुलूख, करुन सरसलूख, मोडिले वीर ।

मेवाडचे राजे न धरती धीर ॥

गढमंडळ बुंदेलखंड, डंघईत अखंड, राहून थंड, सही केले ।

प्रतापे करून या जगात नाग मिळविले ॥चाल॥

बुडवूनि या बहाद्दरास, आणिली घरास, माषुक मस्तानी ।

दरवर्षी धौंशा घालून, जावे चालून अघाडीस मस्तानी ॥

शह दिला नगर थेट पास, खु...... । ........॥चाल पहिली॥

उपरात नर्मदाकाठी, सार्थकासाठी, मोक्ष कार्यार्थी ।

देह समर्पिला त्या स्थानी याच भावार्थी ॥ श्रीमंत ॥२॥

तेची दुनियेमाजी धन्य, न मानी अन्य, वंदिती स्वामी ।

जीव खर्च कराया सिद्ध धन्याच्या कामी ॥

तीन वर्षे राज्य वसवून, मोर्चे बसवून सभोवते धमामी ।

सुरुंगानी पाडिला अलगत बुरुज बदामी ॥

हल्ल्यांत उडाले लोक, करिती किती शोक, पडून संग्रामी ।

नऊ लक्ष बांगडी फुटली वसई मुक्कामी ॥चाल॥

बक्षीस दिले कडी तोडे, पालख्या घोडे, वाजे चौघडे, जमीदार्‍या ।

ठायी ठायी दिसती भरभरून, आख ठरवून,

सजीवल्या सरदार्‍या परशत्रू होईना खाक, वाटुनी परख, तशाच हवलदार्‍या ॥चाल पहिली॥

खूब केली तुम्ही तरवार, नावनिशीवार, म्हणून किती प्रार्थी ।

यशस्वी होता तो संवत्सर सिद्धार्थी ॥श्रीमंत॥३॥

बाळाजी बाजीराव प्रधान, केवळ निधान, होते प्राणी ।

आणिले पुण्यात जपानी नळाचे पाणी ॥

युद्धात जिंकुन नबाब, बसविली बाब, करून धुळदाणी ।

त्या सालीच बंगाल्यत घातली ठाणी ॥चाल॥

लागलेच केले कूच, स्वारी दरकूच, परतली सगळ्यांची ।

लष्करात केवढा गजर, होई नित्य नजर, मोती मणि पोवळ्यांची ।

वाटून खिचडी रमण्यात, आनंदे पुण्यात, मोहरापुतळ्यांची ॥चाल पहिली॥

खुष केले शास्त्री पंडित, विद्यामंडित, विप्र विद्यार्थी ।

गेले कीर्त गात ते ब्राह्मण तीर्थोतीर्थी ॥श्रीमंत०॥४॥

शत्रूस न जाती शरण, आल्या जरी मरण, न देती पाठ ।

दादाही गणावा त्यात, बाण भात्यात, भातांचे ताट ॥

भलत्याच ठिकाणी घाली रिपुशी गाठ ।

तिन्ही काळ निरंतर साधी, जातीने बांधी, हत्यारे आठ ॥चाल॥

फेडून नवस, माहेरास, गेले लाहोरास, जिंकित शेंडे ।

अरे जपानी सहज अटकेत, पाव घटकेत, लाविले झेंडे ।

सरदार पदरचे कसे, कोणी सिंह जसे, कोणी शार्दूल गेंडे ॥चाल पहिली॥

पुढे चाले वीरांचा भार, घेती करभार, स्वामी कार्यार्थी ।

हे पुरुष म्हणावे श्रेष्ठ बंधुचे स्वार्थी॥श्रीमंत०॥५॥

भाऊसाहेब योद्धा थोर, आंगामध्ये जोर, पुरा धैर्याचा ।

विश्वासरावही तो तसाच शौर्याचा ॥

दोहो बाजूस भाला दाट, पलिटेना वाट, अशा पर्याचा ।

किंचित पडेना प्रकाश वर सूर्याचा ॥

दृष्टांत किती कवि भरील, काय स्तव करील, ऐश्वर्याचा ।

शेवटी बिघडला बेत सकळ कार्याचा ॥चाल॥

कितीकांची बसली घरेच, हे तर खरेच, ईश्वरी कृत्य ।

शोकार्णवी नाना पडून, नित्य रडरडून, पावले मृत्यु ।

कवि गंगु हैबती दीन, पदांबुजी लीन, कृपेतील भृत्य ॥चाल पहिली॥

महादेव प्रभाकर ध्यायी, सदा गुण गाई, यथा साह्यार्थी ।

श्रीमंत प्रभूची कीर्त जशी भागीरथी ॥श्रीमंत०॥६॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

पोवाडा - दुसरे सयाजीराव गायकवाड

धनी सयाजी महाराज धुरंधर भाग्यवान भूपती । स्त्रिया पुत्रसह वर्तमान ते भोगितात संपती॥ध्रु०॥

प्रौढ प्रतापी शाहु छत्रपती सिंहासनी सुंदर । सभोवतले सरदार शूर मध्ये आपण पुरंदर ।

प्रांत परगणे गाव ज्यांनी सोडविले गिरिकंदर । सरंजाम ते तयास दिधले जहागिर एकंदर ।

फौजबंद गायकवाड सेनापती समशेर बहादर । वंशध्वज त्या वंशी जन्मले हे स्वकर्मी सादर ॥चाल॥

महाराज सयाजी मणी, लालसा ॥ करी प्रकाश कुळी दिनमणी, फारसा ॥ देई चिंतित चिंतामणी, पहा कसा ॥चाल॥

तसा पुरुष ह्या दिसांत पाहता नाही असा अधिपती । जी सुपुत्र प्रसवली धन्य ती जननी धन्य ते पती ॥१॥

निष्कलंक निर्दोष स्वामिनी करून पूर्वार्चन । प्रसन्न केला असेल मागिल जन्मी भाललोचन ॥

पदोपदी तो सांब म्हणुन करी प्रसंगी भय मोचन । धैर्यवान दृढ पिंड न बाधे पदार्थ होई पाचन ।

लेजिम जोड्या जोर कसुन खूप केले बळ सिंचन । सहस्त्रात सौंदर्य गौरपण पीत जसे कांचन ॥चाल॥

पगडीस तुरा वाकडा, काही जरा ॥ जेग्यास जडित आकडा, गोजरा ॥ कानी भिकबाळी चौकडा, साजरा ॥चाल॥

राजबीज फाकडा सुशोभित दिव्य शरिर संपती । गळ्यात कंठ्या हार, कडी करी जडावाची तळपती ॥२॥

मर्जी होइल त्या दिशी स्वारी कुलतमाम श्रृंगारणे । पूर्व कधी पश्चिमेस जाती मृग शिकारी कारणे ।

भरपल्ला फेकून अडचणीत घोडा ललकारणे । स्वता शिस्त बांधून गोळी हटकुन ठीक मारणे ।

भले लोक बोथाटी टाकिता वरचेवर वारणे । मागे पुढे बाजूस हुल दावुन भाला फेरणे ॥चाल॥

सुती हात तिरंदाजिचा, वाणिती ॥ डाव दुसर्‍यावर बाजिचा, आणिती ॥ आला न्याय गरीब गाजीचा, छाणिती ॥चाल॥

खबरदार लिहिण्यात कल्पना इतरांची अल्प ती । समई मुख्य जंद्राल पेचिता न गवसता जल्पती ॥३॥

सर्व गोष्टींचा शोख जातिने हुशार तर कुस्तिस । दंड भुजा आटीव उमररायाची तिसपसतिस ॥

तूप साखर आणि कणीक उस चारुन आणुन मस्तिस । साठमार चहुकडुन खिजविती नित्य नव्या हस्तिस ॥

पहिलवान किती जेठी येउन राहतात तेथे वसतिस । खुराक उत्तम त्यास कारकुन वर बंदोबस्तिस ॥चाल॥

हे जाणुन कवी सागर, धावती ॥ गुण सभेस नट नागर, दाविती ॥ बक्षीस कडी लंगर, पावती ॥चाल॥

ज्याकडे पाहती कृपा दृष्टि तो करतिल लाखोपती । सप्तपिढ्यांचे दरिद्र विच्छिन्न होउन रिपु लोपती ॥४॥

भक्तजनांचे माहेर देशावर श्रीपंढरपुर । याचकांस हे योग्य बडोदे सर्व क्लेश करी दुर ॥

नित्य उठुन वाटितात खिचडी ब्राह्मणही महामुर । स्त्रियापुरुष मुलीमुलांसकट शेर होतो भरपुर ॥

पुण्यवान गायकवाड जगतीतळांत ते महशुर । सर्व कनकमय लोक घरोघर निघे सोन्याचा धुर ॥चाल॥

जे देणे दिले एकदा, योजुन ॥ ते परत न घेती कदा, समजुन ॥ कोणी फंद करील जर कंदा, माजुन ॥चाल॥

दर्शनास तो अयोग्य त्यावर विधिहरिहर कोपती । अशा प्रभूच्या रक्षणार्थ उडी घाली म्हाळसापती ॥५॥

अहारे बडोदे शहर, कोट चौफेर काम मजबुत । चार दरवाजे चार दिशेना वर शिपाई कलबुत ॥

चोहो रस्त्यावर दाट हवेल्या काय सांगिन शाबुत । मांडवीत मोहोरमात जमती सर्व तिथे ताबुत ॥

अजब शहर वसविले गिराशे करून नेस्तनाबुत । बाग बगीचे तलाव साहेब घेति हवा तंबुत ॥चाल॥

महा जागृत राजेश्वर, पावती ॥ संकटी नीळकंठेश्वर, धावती ॥ भुत वाटेस यवतेश्वर, लावती ॥चाल॥

बहुत उग्र नरसिंह समंधादिक थरथर कापती । प्राशन करिता तीर्थ हिमज्वर इतर रोग करपती ॥६॥

विठ्ठलमंदिर सुरेख दुसरे देउळ बालाजिचे । खंडेराव दक्षिणेस उत्तरपंथींबेचराजिचे ॥

भीमनाथ केदार राममंदीर रंगामेजिचे । महाकाली भदरेत लक्ष्मी लक्षणीक मुख जिचे ॥

गोजिरवाण मूर्त नाव नारायण सुंदरजिचे। काही पुढे बाहेर महंमदवाडित घर काजिचे ॥चाल॥

किती धर्म हरीभक्तिचा, होतसे ॥ लल्लूपारख खुष वक्तिचा, दिसतसे ॥ सामळ सौदा नक्तिचा करितसे ॥चाल॥

दैवशाली गोपाळराव मैराळ राखिती पती । खुशाल अंबईदास रतंजी असे कितिक धनपती ॥७॥

महाराजांचे आप्त आवंतर धारकरी बरोबर । एकासारखे एक पांढरे करिती डौलडंबर ॥

घोरपडे उमराव लक्ष्मणराव कसुन कंबर । मागे न फिरती रणात पडल्या तुटुनी जरी अंबर ॥

मानसिंगराव शिर्के आणिक रघुनाथराव धायबर । थोर कुळींचे मर्द राजे मंडळीत असे नंबर ॥चाल॥

मामांची मानमान्यता, चांगली ॥ करवितील दुर दैन्यता, लागली ॥ ही चौघांमध्ये धन्यता, वागली ॥चाल॥

भाऊ पुराणिक पूर्ण कृपेतिल जे कारण स्थापिती । मान्य पडे ते प्रभूस गुरुवर दया करी गोपती ॥

हस्तमुखे खावंद गादीवर बसुन सोपस्कर । रुमाल चौरी वारितात वर भोवते उभे किंकर ॥

नारायणराव दिवाण, भास्कर विठ्ठल जोडुन कर । सदय ह्रदय शास्त्रज्ञ मुतालक मुख्य भिमाशंकर ॥

रामचंद्र विश्वनाथ फडणिस येती पुढे लौकर । मुजुमदार ते नारायणराव, माधव करंदीकर ॥चाल॥

विश्वासुक बक्षी खरे, मर्जिचे ॥ किती शब्द सुचविती बरे, अर्जिचे ॥ गोपाळपंत गुणी पुरे, मर्जिचे ॥चाल॥

कृपावंत सरकार म्हणुन हो श्रम सारे हरपती । चाहती उमाशंकरास बारिक कामकाज सोपती ॥९॥

अशा प्रभूचे उमाकांत कल्याण सदोदित करो । गाई म्हशी गजतुरंग वहनी अपार पांगा भरो ॥

पुत्रपौत्री राज्यलक्ष्मी अशीच अक्षई ठरो । शत्रुपराजय करुन प्रतापे राज्यनिति आचरो ॥

दान दक्षणा धर्मी निरंतर चित्तवृत्ति अनुसरो । गंगु हैबती शीघ्र कवींची प्रपंच चिंता हरो ॥चाल॥

दहा चौकी काम उठवुन, सांगिन ॥ हरजिनसी यकवटउन, रंगिन ॥ गातात गुरु आठवून, चंगन ॥चाल॥

महादेवाचे कवन कमळसर भ्रमर गुणी झेपती । प्रभाकराची नजर हीच करी धन्यास विज्ञप्ति ॥१०॥


कवी/शाहीर - शाहीर प्रभाकर

धर्मादाय वर्णनपर पोवाडा

दामाजी पंतांनि जगविले ब्राह्मण काही दुकळात । गायकवाड तर रक्षिति ब्राह्मण लाखो असल्या काळात ॥ध्रु०॥

तीनशे तिसांवर वर्षे लोटली दुर्गादेविच्या काळाला । फार दिवस पर्जन्यच गेला आन्न मिळेना बाळाला ॥

दामाजीपंताच्या लागले ब्राह्मण द्वारी लोळाला । रक्ष रक्ष महाराज समर्थ सर्वास आला निर्दाळा ॥

त्या समई कथोर फोडुनी पंती जगविले सकळाला । बेदरास कळताच धुतोड शिपाई आले आवळाला ॥

चल बे बम्मन म्हणुन ओढिता अश्रु लागले गाळाला । कैद करून नेताक्षणी पडले संकट त्रिभुवनपाळाला ॥चा०॥

महाराचे सोंग विठोबांनी स्वता घेउनी ॥ धान्याचे द्रव्य त्या बाच्छायास देउनी ॥ पंतांच्या पोथिमधे ती रसिद ठेउनी ॥

राहिले विठोबा पंढरीस येउनी ॥चा०

दामाजीपंताच्या धावण्या असा धावला विपळात । तसा म्हाळसाकांत रक्षितो गायकवाड ह्या भूतळात ॥१॥

सत्राशे चोवोसात दंगा होळकरांनी अति केला । पंचविसामधे दरोबस्त अगदिच पहारे पाउस गेला ।

दीड शेराचा दुकाळ पडला कहर वाटला दुनियेला । दिसंदिवस बेबरकत जहाली सुखोत्पत्ति नाही रयतेला ॥

ब्राह्मण गेले उठुन मजलोमजली खुब ठेला । बडोद्यात पोचला तो जगला न पोचल्या वाटेस मेला ॥

धर्मपुरुष गायकवाड प्रेमळ क्षमा शांतिने भरलेला । तेव्हापसुन प्रारंभ सिध्याला हजारो ब्राह्मण जपलेला ॥चा०॥

चाळीस वर्षे वाटितात खिचडी सदा ॥ म्हणून न जाती ब्राह्मण देशी कदा ॥ दिवसात प्रहरभर पडे मेहनत एकदा ॥

मग सार्वकाळ आनंद हसती गदगदा ॥चा० कुटुंब सुद्धा प्रपंच करती गर्भिणी होति बाळात ।

तिही महिन्याच्या मुलास खिचडी मिळत्ये असे आले आढळात ॥२॥

वेदशास्त्रसंपन्न पुराणिक योग्य ज्योतिषी हर्दास । टाळ विने करताळ मृदंगी त्यात एखादी सुरदास ॥

सार्वकाळ भजनात घालती कदा न शिवती नर्दास । घुंगुर बांधुन पायी नाचती ध्याति पुंडलिकवर्दास ।

चित्रे मूर्ती करण्यात कुशळ जे वैद्य जिंकिती दर्दास । तर्‍हे तर्‍हेच्या करून नकला नकली रिझविती मर्दास ॥

ब्रह्मचारि मांत्रीक तपस्वी घेउन सवे शार्गिदास । मोहरा पुतळ्या रुपये तयांना देति शालजोड्याफर्दास ॥चा०॥

ह्यापरी ब्राह्मण समुदाय फार जगविला ॥ पुरुषार्थ करुन संकटकाळी दाविला ॥ वैकुंठी अचळ हा धर्मध्वज लाविला ॥

वंशास वश मार्तंड करुन ठेविला ॥चा०॥

येवढेच विश्रांतिला राहिले स्थळ पश्चमच्या राहाळात । कीर्तवान खावंद असले नाही मराठे मंडळात ॥३॥

विश्वकुटुंबी श्रीमंत ते तर तूर्त प्रजेला अंतरले । गायकवाड आहेत म्हणुन हे समस्त ब्राह्मण सावरले ॥

तानसेन पंथाचे गवय्ये तेहि प्रभूनि आवरले । कडी तोडे हातात दुपेटे लाल जरीचे पांघरले ॥

पहिलवान पंजाबी ज्यांचे दंड सदा मुंढे फिरले । हरहमेश कुस्त्याच विलोकुन इतर मल्ल जागीच विरले ॥

नायकिणी आणि कसबिणी शाहिर नेहमी बडोद्यामधे ठरले । पावे पगाराशिवाय बक्षिस कसबी लोक ह्याने तरले ॥चा०॥

कल्याण ईश्वरा असेच यांचे असो ॥ आनंदभरित चिरकाळ गादीवर बसो ॥ कधी अलोभ गंगुहैबतीवर नसो ॥

महादेव गुणीचे कवन मनामधे ठसो ॥ चा० प्रभाकर कवी भ्रमर गुंतला पहा कर्जाच्या कमळात ।

द्रव्यकृपेचा प्रकाश पडल्या सुटून जाइल स्वकुळात ॥४॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर