कुठे जासी?

'कुठे जासी?' वा, काव्यगायनाला,
निघालो हा ठावें न का तुम्हाला?
बघुनि काखेंतिल बाड तरी जडे!
मनी समजा, नच पुसा प्रश्न वेडे!'

'कुठे तू रे?' 'इतुक्यात लिहुन झाली
एक कविता- टाकण्या ती टपाली
निघालो हा - त्या अमुक मासिकाचा
खास आहे ना अंक निघायाचा?'

'आणि तू रे?' 'त्या तमुक शाहिराचा
प्रसिद्धीला ना गुच्छ यावयाचा,
समारंभाची कोण उडे घाई?
आणि संग्राहक तशांतून मीही !

'आणि तू रे?' 'मी रोज असा जातो
काय मार्गी सांडले ते पहातो,
काव्य रचितों जर कधी मज मिळाले
फुल वेणींतुन कुणाच्या गळाले!'

'कुठे तू रे?' 'मसणात जातसे मी!
विषय काव्याला तिथे किति नामी!
मुले पुरताना-चिता पेटताना,
मनी सुचती कल्पना किती नाना!'

पुढुनि दिसले मग मढे एक येता,
कुठे बाबा, जातोस सांग आता?'
'काव्य माझे छापिना कुठे कोणी
जीव द्याया मी जातसे म्हणोनी!'


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

अहा, तिजला चुंबिले असे याने!

("Twenty pounds for a kiss" या विलायतेतील एका खटल्याच्या आधारें)

'असति बाबा रोगार्त-या घराला!'
असा विद्युत्संदेश मला आला;
मधे उपटे हि ब्याद कुठुनि आता?
जीव चरफडला असा घरी जाता!

बैसलेली गाडीत मजसमोर
दिसे बाला कुणि सहज चित्तचोर,
तिला बघता बेभान धुंद झालो
आणि चुंबुनि केव्हाच पार गेला!!

स्मरण कुठले? - मग पुढे काय झाले,
काय घालुनि मत्करी कुठे नेले?
खरे इतुके जाहला दंड काही,
सक्तमजुरी दो मास आणखीही!

अहह! मुकलो त्या रूपसूंदरीते
(आणि वडिलांसही- शान्ति मिळो त्याते!)
अब्रु गेली मिळवली तेवढीही
जगी उरला थारा न कुठे काही!

लाज नाही याजला म्हणो कोणी!
'पशू साक्षात हा!' असे वदो आणि!
तरी म्हटले पाहिजे हे जगाने,
'अहा, तिजला चुंबिले असे याने!'


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

सांग कसे बसले?

[ आचरटपणाचा एक मासला ]

ओळख होता पहिल्या दिवशी,
पूर्वजन्मिंची मैत्री जशी,
मिठ्या मारुनी परस्परांशी
                  जवळ जवळ बसले!

दुसर्‍या दिवशी प्रसंग पाहुन
हळुच काढिती बाड खिशांतुन,
म्हणता 'दावु जरा का वाचुन?'
                   दूर-दुर सरले!

'हवे काव्य तव भिकार कोणा?
चोरितोस माझ्याच कल्पना!'
असे बोलता परस्परांना-
                  सांग- कसे- बसले?


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

रस्त्यावर पडलेले विडीचे थोटुक

                    ----१-----
भाजी मंडइतूनि घेउनि घरा होतो हळू चाललो,
मोठे कामच संपले म्हणुनि मी चित्तात आनंदलो.
     दारी वाट असेल पाहत सखी आता समुत्कंठिता,
     होतो डोलत कल्पनेत असल्या मी चालता चालता!

तो रंगेल गृहस्थ एक पुढुनी ऐटीत आला कुणी,
चंदेरी पगडी शिरी चकचके संजाबही त्यांतुनी.
     होता अंगरका सफेत कळिचा, हाती रुप्याची छडी,
     तोंडी बारिक छान मानुरकरी होती लवंगी विडी!

जोराने झुरके मधूनमधुनी मारी-अधाशी जसा,
सोडी धूर मुखांतुनी हळुहळू, नाकातुनीही तसा,
     ओठाला चटका बसे, मग कुठे आला ठिकाणावरी,
     खाली थोटुक फेकुनी झपझपा गेला पुढे सत्वरी,

माझी जागृत जाहली रसिकता, मागे पुढे पाहिले,
कौशल्ये उचलून ते तडक मी टोपीमध्ये खोविले!


                  ------२------

       झाला त्या दिवशी पगार, तरिही होते खिसे मोकळे!
      तांब्याचा तुकडा नुरे चुकविता देणेकर्‍यांची 'बिले';
आधी पोरवडा तशांतुनि असे संसारही वाढता,
कांता खर्चिक त्यात! शिल्लक कशी सांगा रहावी

      हा येताच विचार, मूढ बनलो आली उदासीनता;
      वाटे स्वस्थपणे कुठे तरि विडी जाऊन प्यावी अता !
आली तल्लफ फार हाय! कुठुनी आणू परंतु विडी,
सारे चाचपले खिसे, परि कुठे हाता न ये एवढी!

      दोस्तांच्या घरि जावया न मजला होते कुठे तोंडही
      पैशांचेहि उधार घेइन तरी, कोठे नस सोयही!
तो रस्त्यावरती अचानक अहा! नेत्रा दिसे थोटुक!
की स्वर्गातुनि देवदूत मज ते टाकी नसे ठाउक!

      प्रेमाने उचलून त्यास वरति ओठांमधे ठेविले,
      काडी घेउनि आणि कोठुनि तरी तात्काळ शिल्गाविले!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

सखे, बोल-बोल-

का सुंदरि, धरिसि आज असा अबोला?
मी काय सांग तव गे, अपराध केला?
का कोपर्‍यात बससी सखये, रुसून
माझ्याकडे न मुळि पाहसि गे हसुन?

का गाल आज दिसती अगदी मलुल,
की माझियाच पडली नयनास भूल!
तोंडावरी टवटवी लवलेश नाही,
ओठावरी दिसत लालपणा न काही!

का केश हे विखुरले सखये, कपाळी,
केलि न काय अजि वेणीफणी सकाळी?
भाळी न कुंकु विलसे, नथणी न नाकी,
हातातही न मुळि वाजति गोठवाकी!

कोठे तुझा वद असे शिणगारसाज,
का नेससी मलिन हे पटकूर आज?
ठेवुनिया हनुवटी गुडघ्यावरी ही
का एकटीच बसलीस विषण्ण बाई?

व्हावा तुला जरि असेल पदार्थ काही,
घे नाव-तो मग कुठे असु दे कसाही,
द्रोणगिरीसह जसा हनुमन्त येई,
बाजार आणिन इथे उचलून तेवी!

की आणसी उसनवार सदा म्हणून
शेजारणी तुजवरी पडल्या तुटून;
वाटून घेइ परि खंति मना न काही,
शेजारधर्म मुळि त्या लवलेश नाही !

भाडे थके म्हणुनि मालक देइ काय
गे आज 'नोटिस'? परी न तया उपाय !
घेऊन काय बसलीस भिकार खोली,
बांधीन सातमजली तुजला हवेली!

वाटेल ते करिन मी सखये, त्वदर्थ,
संतोषवीन तुज सर्व करून शर्थ!
टाकी परी झडकरी रुसवा निगोड!
दे सुंदरी मजसि एकच गोड-गोड

गेलो पुढे हसत जो पसरून हात,
तो ओरडून उठली रमणी क्षणात-
"व्हा-दूर चावटपणा भलताच काय?
स्पर्शू नका' कडकडे शिरि वीज हाय!!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें
वृत्त - वसंततिलका

पाहुणे

[कै. केशवसुतांची 'दवांचे थेंब' ही कविता वाचल्यानंतर पुढील विनोदी कवितेचे रहस्य लक्ष्यात येईल]

"कोठुनि हे आले येथें?
      काल संध्याकाळी नव्हते !!--"

पाहुणे पसरले ओटी-
     वरि बघुनी आज प्रभाती

आईला बाळ्या वदला
     कुतुकाने उत्सुकलेला.

"दिसती हे कोणी आले
     आपुल्याच नात्यामधले !

आई ग! तर वद माते
    कोठुनि हे आले येथे?

तंबाखू पाने खात
     कसे पहा बडबडतात !

उघडुनी डबा ग अपुला
       राजरोस करिती हल्ला!

बाबांच्या पेटीतुन गे
        पळविती विड्यांचे जुडगे!

मौज मला यांची वाटे
        होते हे तर वद कोठे?"

"हं हळू बोल-" तनयाते
         वर करुनी बोट वदे ते-

"कावळे, गिधाडे, घारी,
         येती ही जेथुनि सारी'

डोंगळे, डास, घुंगुरटी
          बाळा रे, जेथुनि येती;

खोकला, ताप ही दुखणी
        आपणास येती जिथुनी;

तेथुनीच आले येथे
         हे छळावया आम्हांते!"

"राहतील येथे का ते?
        अडवितील का ओटीते?

करतिल का भिंतीवरती
        ही अशी लाल रंगोटी

जातील कधी हे आई?
           घरदार न यांना काही?"

'नाही रे! ते इतुक्यात
          जाणार गड्या नाहीत!

जोवरी भीड आम्हांते
           जोवरी लाज न याते,

तोवरी असा बाजार
       सारखा इथे टिकणार !

चडफडने बघुई त्यांते
          असती ते जोवरि येथे!

टोळधाड कधि ही इथुनी
         जाणार न लौकर सदनी!"

'जाणार न लौकर सदनी!'
          वदता गहिवरली जननी;

पाहुणे मागले स्मरले,
          डोळ्यांतुन पाणी आले.

बहुतेक तयातिल आता
          जाहले कुठे बेपत्ता!

निगरगट्ट परि त्यामधला
         एक मात्र अजुनी उरला!

सरले जरि बारा महिने
         तरि बसे देउनी ठाणे!

"देवा रे" मग ती स्फुंदे
           "एवढा तरी जाऊ दे!"

म्हणुनि तिने त्या बाळाला
          तो महापुरुष दाखविला!

एकेक बघुनि त्या मूर्ती
          गोठली कवीची स्फूर्ती!

वेडावुनि तयाच नादे
          "खरेच," तो पुसतो खेदे,

"येती हे रोज सकाळी
          परि जाती कवण्या काळी?"


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

फूल, कवि, बाला आणि मासिक

[एक शोकपर्यवसायी कथा]

कुठे रस्त्यावर कुणी टाकलेले
कुणा कविच्या नजरेस फूल आले;
तडक घेई उचलून करी त्याते
(ब्रीद कविचे वेचणे जे दिसे ते!)
तोच दिसली मार्गात एक बाला,
(कवि प्रेमाचा नेहमी भुकेला!)
फुल अर्थात्‍ तिज द्यावयास गेला-
जीभ काढुनि ती फक्त दावि त्याला !
खूप रडला कवि (नेहमीप्रमाणे)
प्रेम-कविता लिहि (तरी चार पाने!)
मासिकाला पाठवी त्याच वेळी
हाय ! तीही साभार परत आली !!

                          -स-

प्रेमे ज्या कविता दिल्या परत त्वां संपादका, धाडुनी,
देतों ताबडतोब पाठवुनि त्या आता 'मनोरंजनी'
नाही वाटत खेदलेश उलटा आनंद वाटे मनी,
की त्या फाडुनि टोपलीत न दिल्या रद्दीत तू फेकुनी


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें
वृत्त - दिंडी