ओठ

तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ?

आज का तुला माझे एव्हढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा ?

हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा ?

बोलली मिठी माझी - ' दे प्रकाश थोडासा'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा ?

कालच्या वसंताला ठेवतेस का नावे ?
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा ?

चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ?


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - एल्गार

पोरवयात

पोरवयात उमगले तिला प्राक्तनाचे संदर्भ
आपल्या जन्मजात दारिद्र्याइतके स्पष्ट,
विरून फाटलेल्या अंगावरील कपड्यांइतके ढळढळीत.
तेव्हा तिने मेमसाब बरोबर प्रवास करताना
नाकारला हट्ट खिडकीच्या सीटचा
पोरक्या पोरवयासह पळणाय्रा झाडांसकट;
भवतीच्या समवयीन भाग्यवंतांचे
बोबडे कौतुक तिने नाकारले;
नाकारला स्पर्श वत्सल, हळवा,
अहंकार जागवणारा....
तिने फक्त ओठ घट्ट मिटले,
डोळे स्थिर समोर....
आणि समजूतदारपणे
मेमसाबची बॅग सांभाळली.त्या वेळी
मी हादरलो माझ्या वयासकट....
प्रिय आत्मन,
इतक्या कोवळ्या वयात,
तू
तुझी जागा ओळखायला नको होतीस....

सांगाडा

तारेत अडकलेल्या,
मुळारंभाशी संबंध तुटलेल्या
पतंगाचे काय होते?
प्रथम, संपूर्ण निरागस नेणीव
अडकल्याची;
वारा आल्यावर उडतोही मनमोर
पूर्विसारखाच
अद्न्यात हाती लीलसूत्र असल्यासारखा..
नंतर,तार वर्याशी संगनमत करुन
त्याचे ऊडण्याचे सुत्रच गायब करते तिथे
प्रस्थान त्याचा धडपडीचे;
सर्वांग फाटेपर्यंत त्याचे
हल्ले चहुबाजूंनी तारेवर
तारेची बेलाग ताकद उमगेपर्यंत...
मग, गहीरे मस्तवाल रंग फिकट होऊ लागतात,
वार गिधाडासारखा
फिकट झालेले रंगही तोडून नेतो दिगंती...
आणि एके दिवशी संध्यासमयी पहावे तो तर-
नुसता सांगाडा काड्यांचा
सांगाडा नुसत्या काड्यांचा
सांगाडा देखण्या रंगीत रुपाचा
सांगाडा हवेत झेप घेणार्याचा
सांगाडा आकाशात गर्वाने डोलणार्याचा
सांगाडा सुतावर स्वर्गाचा भरवसा ठेवणार्याचा
सांगाडा खुप अनंत खूप अनादी
"नियती भोगल्यावर
एवढेच शिल्लक रहाते" हे सांगणारा


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

ह्या फुलांचे काय करावे?

वाढदिवशी भेटीस आलेली
ही अनंत अगणित फुले...
ह्या फुलांचे काय करावे,हे
बिरबलही सांगू शकणार नाही.
कारण सर्व कारणपरंपरेच्या पलीकडचे त्यांचे 'असणे'
त्याला आमचे हेतू चिकटवता येणार नाहीत...
फुलांकडे फक्त पहा डोळे भरून.
पहा कशी असतात अस्तित्वचा मस्तित,
पहा कशी असतात स्रव्स्वी 'त्या'चीच
सदैव, झाडावर या मातीत ..
फुलण्यापुर्वी,फुलताना वा निर्माल्य झाल्यावरही
परमेश्वराला शरण गेलेल्या या कोमल पाकळ्यांनी
म्रुत्युला नगण्य केले आहे
फुलांचे काहीही करा
ती आमच्यासारखी रिक्त नाहीत
तुमच्या करण्याचे ओरखडे त्यांच्या आत्म्यावर उमटणार नाहीत.
त्यांना आपली प्रतीष्ठा जन्मत:च लाभलेली आहे.
म्हणून म्हणतो महराज,
फुलांचे काय करावे हा प्रश्न
फक्त तुमचा आहे, तसाच
सर्व उपयुक्तवाद्यांचाही , पण त्याचा
फुलांशी संबध नाही
कारण त्यांचे 'असणे' तुमच्या प्रश्नाहून अनादी आहे
तुम्हाला शब्द माहीत नव्हते
तेंव्हाही ती होती आणि
तुमचे शब्द संपतील तेंव्हाही ती
असणार आहेत - जशी होती तशी
अस्तीत्वास शरण,
अस्तीत्वमय ,
अशरण्य


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

लोकलमधला चणेवला

पाय अनवाणी पोरके असले की
दुधाचे दात पडण्यापूर्वीच डोळे
उदास,सावध होतात...
मानेवरून पट्टा घेउन
पुढे पोटावर टोपली अडकवता येते;
लाल, जांभळे कागद डकवून
तिला सजवता येते;
आपल्यालाच आपल्यापुढे
विस्तवाचे मडके धरून,
चणे विकत नेता येते.

पायच अनवाणी असले की
आपल्या चड्डीचा कडा
टांग्याचा घोड्याचा आयाळीसारख्या
कातरलेल्या असतात,
आणि आपला अतोनात मळलेला शर्ट
मोडक्या छ्परासारखा
खाली उतरलेला असतो
शर्टावर एक चित्रही असते पुनरूक्त;
एक आलीशान घोडागाडी,
आत निवांत बसलेले कुणी;
चाबूक उगारलेला हात,
आणि जीवाचा आकंताने
रनोमाळ पळणारे घोडे..


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

झाडे सत्तेवर आली की

माणसे
निरपराध झाडांवर प्राणांतिक हल्ले करतात
त्यांचे हात्पाय तोडून त्यांना
बेमुर्वतखोरपणे
उघ्ड्यावर रचून ठेवतात...
माणसांच्या राज्यात हे असेच चालायचे

उद्या झाडे सत्तेवर आली की तीही
तोड्लेल्या माणसांची हाडे
अशीच उघ्ड्यावर रचून ठ्वतील;
व्रुक्षकुळातील कुणी मेला तर
माणसांच सर्पण म्हणून उपयोगही करतील
फिरून माणसांचे राज्य येण्यापूर्वी
खुनाच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्याची कला
झाडेही आत्मसात करतील...
फक्त एकदा
त्यांचे राज्य आले पाहिजे


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

वही मोकळी करताना

कवितेची वहि गच्च भरून गेल्ये:
आता पाने सुटि करून मोकळे करायला हवीत...
काही अशी वार्यावर सोडून द्यावित
ज्यांची दूर विजनवासात गाणी होतील
काही नदीत सोडावीत
म्हणजे शब्द नव्याने वाहू लागतील
काही पाखरांना द्यावीत
त्यांचा सूर्य बुडतानाचा कोलाहल
त्यांनाच परत केल्यासारखी
काही ढगांवर डकवावीत
जी दीशा ओलांडताना
आपोआपच रुपांतरीत होतील...

नंतर
ज्यांची दूर विजनवासात गाणी होणार नाहीत
जी नाकारतील वाहणे नव्याने
ज्यांचा कुठल्याही कोलाहलाशी संबंध नाही
ज्यांना देशाच्या सीमा ओलांडायचा नाहीत
अशी काही पाने उरतीलच; ती सर्व
कुठल्याहि झाडाचा तळाशी ठेवावीत:
तुम्हीच झाडांचे बहर आहात.असे
मीच त्यंना कितीदा सांगितलेले आहे


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ