अशा रणरणत्या उन्हातही एकटा नव्हतो मी

 एक सावली माझ्या आगेमागे धावत होती सारखी

 तुझ्या आठवणीने एकटे राहूच दिले नाही मला!

 एक घर सगळ्यांचे, सारे एकाच ठिकाणचे रहिवासी

 या परक्या शहरात कुणीच नाही परके वाटत

 साऱ्यांची एक व्यथा, सारे एकाच नात्याने बांधलेले!

  कोपऱ्यातल्या सीटवर आणखी दोघे बसले आहेत

 गेले काही महिने तेही आपापसात झगडा करताहेत!

 वाटते आहे, आता कारकून सुद्धा बहुधा लग्न करणार!

  दिवस रात्र असे विखुरले आहेत

 जसा तुटला आहे मोत्यांचा हार

 जो घातला होतास तूच एकदा माझ्या गळ्यात

  काय सांगू? कशी आठवण मरुन गेली?

 पाण्यात बुडून प्रतिबिंबेही मृत झाली...

 स्थिर पाणी सुद्धा किती खोल असते?

  चला ना, बसू या गोंगाटातच, जिथे काही ऐकायला येत नाही,

 या शांततेत तर विचारही कानात सारखे आवाज करतात

 हे कंटाळवाणे पुरातन एकाकीपण सतत बडबडत असते!

 तुझ्या गावात कधीच येऊन पोहोचलो असतो –

 पण वाटेत किती नद्या आडव्या पडल्या आहेत!

 मधले पूल तूच जाळून टाकले आहेत!