१९६२ सालच्या चिनी आक्रमणा नंतर पं. जवाहरलाल नेहरू , आपण गमावलेल्या १२,००० चो. मैलाच्या भुभागाचे , न पटणारे समर्थन करीत असतांना म्हणाले , " नाहीतरी त्या जमीनीवर गवताचे एक पाते उगवत नव्हते, जमीन काही कामाची नव्हतीच. " त्यावर श्री पिलू मोदी हे गुजराथ मधील खासदार , नेहरुन्च्या , तुळतुळीत टकलाकडे पाहून म्हणाले, " आपल्याही डोक्यावर असेही काही उगत नाही, तेही आपल्या काय कामाचे ? " लोकसभेत हंशा पिकला हे सांगायला नकोच.

 लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. ( कोणत्या साली ते आठवत नाही, जाणकारानी शोधुन लिहावे ) केरळमधुन काँग्रेसचे खासदार जाफर शरीफ निवडून आले होते. पहिलाच दिवस असल्याने , खासदारांचा शपथविधी सुरु होता. जाफर शरीफ यांचे नाव पुकारले गेले आणि नेमक्या त्याच वेळेला ते बाहेर निघून गेले होते. त्यावेळी नाथ पै की मधू दंडवते कोणीतरी पटकन म्हणाले , " हमारे में एक ही तो ' शरीफ ' था , वो भी बाहर गया है '! !

 अमेरीकेतील नागरी युद्धाच्या काळातला हा एक किस्सा -

दक्षिणी राज्यांविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत उत्तरी राज्यांचा मॅक्लेलान नावाचा एक सेनापती होता. हा मॅक्लेलान आपले रिपोर्ट पाठवण्याबाबत कमालीचा आळशी होता. त्याच्या एखाद्या चकमकीचा अहवाल बर्‍याचदा महिन्याभराने लिंकनच्या हाती येत असे! वैतागून लिंकनने एकदा त्याला रोजच्यारोज डिटेल रिपोर्ट पाठवण्याचा सक्तं हुकूम सोडला.

"आज आम्ही शत्रूच्या चार गाई पकडल्या आहेत!" मोजून दोन दिवसांनी मॅक्लेलानचा संदेश आला!
"ताबडतोब दूध काढून सैनिकांना पिण्यास द्या!" लिंकानने उत्तर पाठवलं!

 सर विन्स्टंट चर्चिल हे पंतप्रधान असताना, एकदा आजारी असून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. त्यांना भेटायला विरोधी पक्षाचे काही सद्स्य हॉस्पिटलमध्ये आले होते. नेमके त्याचवेळी, एक नर्स, त्यांचा नैसर्गिक विधी उरकून, ते भांडे घेऊन चालली होती. रुममध्ये त्यावेळी उपस्थित विरोधी पक्ष सदस्याना बघून सर विन्स्टंट चर्चिल म्हणाले, "First time I am seeing my 'motion' being carried unopposed.”

 जॉर्ज बर्नाड शॉने एकदा आपल्या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाची दोन तिकीटं चर्चीलला पाठवली. सोबत एक खवचट चिठी होती.

"तुला एखादा मित्रं असलाच तर त्याच्याबरोबर नाटकाला ये!"
"तुझ्या नाटकाचा दुसरा प्रयोग झालाच, तर नक्की येईन!" चर्चीलने त्याच कागदावर खाली लिहून पाठवलं!

चर्चील आणि नॅन्सी अ‍ॅस्टर (ब्रिटनच्या पहिल्या महिला खासदार) यांच्यातला किस्सा आहे.

चर्चिल हे खूप हजरजबाबी म्हणून प्रसिध्द होते. एकदा विरोधी पक्षाच्या सदस्या चिडून त्यांना म्हणाल्या," मी जर तुमची पत्नी असते तर तुमच्या चहात विष मिसळले असते." क्षणाचाही विलंब न लावता चर्चिल उत्तरले,"मी जर तुमचा नवरा असतो तर तो चहा आनंदाने प्यायलो असतो!"

 बांग्लादेशच्या युद्धात पाकिस्तान चा न भूतो न भविष्यती असा पराभव केल्यावर फील्डमार्शल सॅम माणेकशॉ लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले होते. पंतप्रधान म्हणून इंदिराजींनि खेळलेल्या राजकीय डावपेचांबद्दल त्यांनाही यथोचित श्रेय मिळतच होते.

पंतप्रधान व सैन्यप्रमुख म्हणून दोघांचेही संबंध सलोख्याचे होते. परंतु या दिग्विजयी कामगिरीनंतर इंदिराजींच्या भोवती असलेल्या काही विघ्नसंतोषी मंडळींनी इंदिराजींचे कान भरणे सुरू केले की माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर उठाव करणार आहे.

आपल्या देशाच्या सुदैवाने इंदिराजींनी कुठलेही अविचारी पाऊल न उचलता सरळ माणेकशॉ यांना पाचारण केले व स्पष्ट शब्दांत याबाबत विचारणा केली. सॅम यांनी अगदी सहजणे उत्तर दिले.

देवाने आपल्या दोघांनाही चांगले धारदार नाक दिले आहे जे आपण दोघेही एकमेकांच्या कामात कधी खुपसत नाही व यापुढेही खुपसणार नाही.