स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले होते. या भ्रमण काळात त्यांना अनेक संत महापुरुष भेटले. एका संतांने त्यांना पवहारी बाबांची गोष्ट सांगितली. ती कथा पुढीलप्रमाणे होती...

प्रसिद्ध योगी पवहारी बाबा यांचे गंगा किना-यावर निर्जन ठिकाणी वास्तव्य होते. एके दिवशी रात्री बाबांच्या कुटीत एक चोर घुसला. काही भांडी, कपडे आणि एक घोंगडी हीच काय ती बाबांची संपत्ती. भांडी बांधून चोर पळण्याच्या तयारीत होता. घाई गडबडीत तो कुटीच्या एका भिंतीवर आदळला. घाबरून पळताना चोरलेले साहित्य खाली पडले.

बाबा उठले आणि चोराच्या मागे धावू लागले. खूप दूर गेल्यानंतर का होईना बाबांनी चोराला पकडलेच. घाबरलेला चोर थरथरत होता. परंतु बाबा त्याच्या चरणावर कोसळले. रडू लागले. बाबा चोराला विनवणीच्या सुरात म्हणू लागले, 'प्रभू, तुम्ही आज चोराच्या रूपात माझ्या कुटीत आलात. चुकून काही वस्तू तुम्ही तिथेच टाकलीत. कृपया त्याही सोबत घेऊन जा.'

चोराला काय करावे समजेना. बाबांच्या प्रेमाच्या आग्रहापोटी त्याने ते साहित्य स्वीकारले. बाबांनी एका गुन्हेगारातही देव पाहिला होता.

कथा ऐकवून त्या साधू पुरुषाने स्वामी विवेकानंदांना विचारले, 'तुम्हाला माहिती आहे तो चोर कोण होता.' स्वामींनी अनभिज्ञता दर्शविली. त्यावर त्यांनी सांगितले, तो चोर मीच होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा