हरवलेल्या संवेदना...

पैसा खुळखुळतोय, पण माणुसकी हरवत चालली आहे. वाटेल तशी वाहने धावत आहेत
आणि अपघात वाढत आहेत; पण जखमींना मदत करण्याची प्रवृत्ती संपत चालली आहे.
समृद्धी येऊनही आपल्या संवेदना, भावना जणू गोठल्या आहेत. कधी जागं होणार
आपल्यातलं "माणूसपण'?

"जखमी तरुणाला लोटले मृत्यूच्या खाईत' ही बातमी वाचली आणि मन सुन्न झाले.
मनात विचार आला, 23 वर्षांचा तरुण मुलगा गेला. त्याच्या कुटुंबीयांवर
आकाशच कोसळले असेल. त्याच्या आई-वडिलांची काय अवस्था झाली असेल? जी मुलं
गाडी चालवीत होती, ती नक्कीच धुंदीत असतील. त्यांच्याच वयाच्या एका
मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याचं त्यांना काहीच वाटलं नसेल का?
बिचारा जखमी अवस्थेतही त्या मुलांजवळ मदत मागत होता, आपल्या आईला फोन
करायला सांगत होता; तरीही त्या निष्ठुरांना त्याची कीव आली नाही. "या
जागी आपण असतो तर!' असा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. निष्ठुरपणे
त्याला जखमी अवस्थेत निर्जन ठिकाणी सोडून सर्व जण पसार झाले.

अशा तऱ्हेच्या घटना अनेक ठिकाणी अनेक वेळा घडत असतात. त्या वेळी
प्रत्येकाच्या मनात चीड निर्माण झालेली असते; पण नंतर त्यांचा शोध,
चौकशी, पुरावे यामध्ये वेळ जातो, तोवर लोकं विसरून जातात. मग वाटतं, या
अशा गुन्हेगारांना कधी शिक्षा होणारच नाही. स्वत:ला आधुनिक म्हणविणाऱ्या
लोकांमध्ये संवेदना, माणुसकी हरवत चालली आहे, फसवणूक लुबाडणूक वाढत आहे.
माणसाकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे लहान वयातच गाड्या चालवणे, व्यसनाच्या
आहारी जाणे, नियमांचे उल्लंघन करणे या गोष्टी अफाट वाढल्या आहेत. धुंदीत
गाड्या चालवून दुसऱ्यांचे जीव घेतात, मदतीसाठी कुणी हाका मारल्या तर
दुर्लक्ष करतात, त्यामुळे कित्येक जीव उपचाराअभावी मृत्यू पावतात. काही
बातम्या वाचून अंगावर शहारे येतात. छोटी छोटी मुलं गाडीच्या चाकाखाली
चिरडली जातात, ज्येष्ठ नागरिक ठोकरले जातात. गाडी चालविणाऱ्या
प्रत्येकाच्या मनात ही भावना निर्माण झाली पाहिजे, की या मुलांच्या जागी
उद्या आपली मुलंही असू शकतील, या वृद्धांच्या जागी आपले आई-वडील असू
शकतील. वाहन चालविणाऱ्या प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, की
प्रत्येकाचीच कुणीतरी घरी वाट पाहत असतं त्यामुळे प्रत्येकानेच सावधानता
बाळगायला पाहिजे. पण असं होत नाही. आपण "माणूस' आहोत, हेच सर्व जण विसरत
चालले आहेत. आपल्यापेक्षा पशुपक्षी बरे! त्यांना भावना आहेत. एखादा पक्षी
मेला तर त्याचे नातलग एकमेकांना हाका मारून लगोलग भोवती गोळा होतात. जखमी
असेल तर काळजी घेतात; पण आपण माणसे आहोत याची जाणीवही उरली नाही. पूर्वी
असं नव्हतं. दुसऱ्याच्या जाण्यानंही, दुःखानंही डोळे पाणावत असत; पण आज
सगळंच हरवलंय. हीच का आमची आधुनिकता?

आज प्रत्येक माणसागणिक घरात वाहन आहे. ही चैन नसून, गरज आहे. पण या अशा
बेफाम गाड्या चालविणाऱ्यांचाही सुळसुळाट वाढला आहे. आज मला वाटतं,
प्रत्येक घरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की संध्याकाळी सर्व जण
घरात सुखरूप परत आले की आजचा दिवस पार पडला म्हणून परमेश्‍वराचे आभार
मानत असतील. स्त्री ही ममतेचा सागर असते असं म्हणतात. तीच स्त्री आज
मुलीचा गर्भ आहे म्हणून तिला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकत आहे, मग
कुठं हरवली संवेदना?

म्हणून माणसांप्रमाणे संवेदना जागृत ठेवा; व्यावहारिक न होता भावनिक होऊन
जागा. आज गरज आहे संवेदना जपण्याची... माणुसकी जपण्याची...

संध्या गावित...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा