नका करु मला कोणी उपदेश

नका करु मला कोणी उपदेश

आदेश-संदेश देऊ नका

नका सांगू कोणी वेदान्ताच्या गोष्टी

जीव माझा कष्टी करु नका

जीवनाचे जुने शिळे तत्त्वज्ञान

किटले हे कान ऐकूनीया

काय औषधाचा झाला उपयोग

नाहीं बरा रोग होत त्याने

देवा, तूच माझा खरा धन्वन्तरी

प्रकृतीचे करी निदान तू !

अजून लागाया हवी खरी ठेच

हवा खरा पेच पडावया

अजून पुरे न उघडले डोळे

दिसाया, ’वाटोळे झाले माझे !’

बुडत्याचा पाय चालला खोलात

तरी मी भ्रमात आहे माझ्या

नाही मला झाला खरा अनुताप

मागील ते व्याप पुन्हा सुरु

होऊ दे एकदा पुरा अधःपात

नंतर तू हात देई, देवा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा