गाडा

कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर?
गाणें सुरू झालें तेव्हा चंद्र होता डोईवर,
गाणे मध्यावर आलें - चंद्र झाला रानभर,

गाणें संपले आणिक पक्षी फडाडला तमीं
आणि तसाच मिटला घरट्यांत ... अंतर्यामी.

वाट रानांतली किर्र, हुरहूर सर्वदूर,
चक्रें फिरती फिरती, करकरे चराचर,

कळ्या फुलतात येथे, पाने गर्द वाजतात,
फुलें घळतात येथे तरी पानें वाजतात,
पानें झडतात येथे तरी वारे वाजतात,
वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात.

कुणासाठी भरूं पाहे डोळां ऐसें उष्ण पाणी?
कुणासाठी झरताहे झरा गप्प ऐशा रानीं?
कुणासाठी झरताहे आयुष्य हें क्षणोक्षणीं?
कुणासाठी रस भरे सालोसाल फळांतुनी?

प्रश्न नव्हे पतंग अन्‌ खेचूं नये त्याची दोरी
आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी?

कुणासाठी, कशासाठी, कुठे आणि कुठवर
ऐंसे घोकीत घोकीत व्हावयाचे दिगंबर.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा