दुष्काळ

उलटा जमाना आलारे । सेवक स्वामींचें मानीना ॥ध्रु०॥

जिकडे तिकडे टोळ माजले । दुनियाचें केलें वाटोळें । मुलुख कूल उजाड हलकल्लोळ ।

आंगावरते चमक्याचे ओळ । कुठवर घालतील हळदी बोळ । जी सांपडली तिलाच घोळ ।

घरें दारें जाळुनिया कोळ । गरिबा भोंवते माजलेत पोळ । एकामागें एक जैसे लोळ ।

ईश्वरें पैदा केले ओढाळ । नराहे खोंडया मका कडोळ । कारलीं भेंडया वांगीं पडोळ ।

किती दिवस राहील पाणी गढूळ । ओस परगणा जालारे । उलटा जमाना आलारे । सेवक स्वामी० ॥१॥

कलीमहात्म आलें उफराटें । होऊं लागलें खर्‍याचें खोटें । खाटमार ऐकलांत कोठें ? ।

ज्याला न भरवे आपलें पोटं । ते जैसे मोंगलाचें बेटे । ठेवितात फिरवून पागोटें ।

महार पोरग्याचे गळ्यांत गेठे । हुरडा खाऊन बनले लोठे । गव्हार जगली जट लंगोटे ।

त्यांना आभाळ दोनची बोटें । दे उगेच भलत्याला सोटे । वाटसरु बागेना वाटे ।

उगेच माजले गाटेगोटे । दुनयेचा फुटाणा केलारे । उलटा जमाना आलारे । सेवक० ॥२॥

धर बिगारी भलताच धरावा । ब्राम्हण शूद्र न ओळखवा । जेथील मुक्काम तेथची न्यावा ।

वस्त्रें घेऊन नागवावा । माघारें बोडकाची लावावा । तिकडून शिपाई दुसरा यावा ।

हा त्याला वाटेस भेटावा । परंतु त्याणें तोच दामटावा । परतुनि न्यावा मागल्या गांवां ।

असा कितीवेळ यावा जावा । ज्याचा गहूं हरबरा लुटावा । तोच बिगारी पुढें पिटावा ।

गांवकर्‍यांचा प्राण आटावा । कारभारी तो निघून जावा । गरीब एखादा हातीं लागावा ।

त्याच्या मतें पाटीलबावा । मारा खालीं भोत भरावा । आंगठे धरवाया लावावा ।

कळेल येवढा धोडा द्यावा । कोठें पुरलें ? ठिकाण दावा । खंडणीचा ठैराव ठरवावा ।

महाप्रळय यांना आलारे। फंदी अनंद सांगे जमाना । उलटा जमाना आलारे । सेवक० ॥३॥


कवी - अनंत फंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा