दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी मी व्हरांड्यात बसलो होतो. तेवढ्यात, माझ्या घराच्या कंपाउंडमध्ये एक थकल्या सारखा दिसणारा परंतु, धष्टपुष्ट कुत्रा शिरला.

त्याच्या गळ्यातील पट्ट्याकडे आणि सुदृढ़ शरीराकडे पाहुन वाटते होते की, हा कुणा चांगल्या घरचा पाळीव कुत्रा आहे.

मी त्याला जवळ बोलावून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

तो शेपुट हालवत तिथेच बसून राहीला.

मी उठून घरात निघालो, तसा तोही मागोमाग हाॅल मध्ये आला आणि खिडकीशेजारील एका कोपऱ्यात शहाण्यासारखा पाय दुमडून, पुढील दोन पायात तोंड खुपसून बसला.

पाहता पाहता झोपीही गेला.

मी पण हाॅलचे दार बंद करून सोफ्यात बसून राहिलो.

तासाभराने तो उठून दाराकडे निघाला. मी ही उठून दार उघडले.

तो सरळ कंपाउंड बाहेर गेला. बहुधा, त्याच्या घरी गेला असावा!

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला तो आला.

तसाच हाॅलच्या कोपऱ्यात झोपला. तासाभराने उठून निघून गेला.

मग हे रोजचेच झाले.

तो यायचा, झोप काढायचा अाणि निघून जायचा. असे कित्येक आठवडे झाले.

मला उत्सुकता लागुन राहिली, हा नेमका कुणाचा आहे ?

मी एके दिवशी त्याच्या पट्टयात एक चिठ्ठी लिहुन अडकवली,
"तुमचा कुत्रा माझ्याकडे रोज येऊन झोप काढतो, हे तुम्हाला माहीत आहे का?"

दुसऱ्या दिवशी पुन्हा रोजच्याच वेळेला तो कुत्रा आला. पण, यावेळी त्याच्या पट्ट्याला एक चिठ्ठी दिसत होती. मी ती काढून वाचू लागलो.....

"टॉमी एक चांगल्या घरचा कुत्रा आहे. इथे माझ्या सोबतच राहातो. पण, माझ्या बायकोच्या अखंड वायफळ बडबडीला कंटाळून, थोडीशी तरी झोप मिळावी म्हणून रोज तुमच्याकडे येतो....उद्यापासुन मी पण त्याच्या सोबत येत जाऊ का ?
चिठ्ठी लावून कळवणे!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा